कृषी जगत

विमाकंपनीच्या डैमेजड सॉफ्टवेयरमुळे शेतकऱ्यांना फिरावे लागले माघारी 

पहिला दिवस लाठीचार्ज, 
दुसरया दिवशी रिकाम्या हाताने परतले  
हिमायतनगर (अनिल मादसवार) प्रधानमंत्री पिकविम्याचा पहिला दिवस लाठीचार्जने सुरु झाला, दुसऱ्या दिवशी विमा कंपन्यांचे सॉफ्टवेयर डॅमेज झाले. त्यामुळे भर पावसात उभ्या राहीलेल्या रांगेतील शेतकऱ्यांना माघारी फिरावं लागलं. शासनाच्या पिकविम्याचा फायदा शेतकऱ्यांना कि विमा कंपन्यांना..? असा सवाल करत तिसऱ्या दिवशीपासून तरी विमा स्वीकारावा, आणि विम्याची मुद्दत वाढवून देऊन सुटीच्या दिवशीही बैंक चालू ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रधानमंत्री पीकविमा भरण्यासाठीची अन्तीम तारीख दोन दिवसावर येऊन ठेपली असताना बैंकेत शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. बुधवारी पोलिसांनी रांगेतील शेतकऱ्यावर लाठीचार्ज केल्याचे शासनाकडून शेतकऱ्यांना नक्षलवाद्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा रोष व्यक्त करत शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. सायंकाळी हे प्रकरण शांत झाल्याने दि.२७ गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच बैन्केसमोर महिला -पुरुष शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी गर्दी केली होती. पावसाची रिमझिम व सणासुदीचा दिवस असताना देखील शेतकरी रांगेत उभे होते. वाढत वाढत जवळपास ५०० ते ७०० मीटर पर्यंत पीक विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची रांग लागली. परंतु अचानक शासनासोबत करार केलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स, ओरिएन्टल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, रिलायन्स जनरल इन्शुरन्स आदी विमा कंपन्यांचे ऑनलाईन चालणारे युटिलिटी सॉफ्टवेयर हिमायतनगर येथील बैंकेत संगणकातून ऑफलाईन झाले. त्यामुळे पीकविमा स्वीकारण्यात अडचण निर्माण झाली. सकाळचे ११ वाजले तरी बैंक पीकविमा स्वीकारत नसल्याने एकच गोंधळ उडाल्यामुळे बैंक प्रशासनाची भंभेरी उडाली होती. कालच्या सारखा प्रकार पुन्हा उद्भवू नये म्हणून राजकीय नेते व पत्रकार मंडळींनी बैंक अधिकाऱ्याशी संवाद साधून मुंबई येथील पीकविमा कंपनीच्या कार्यालयाशी दूरधवनीवरून संपर्क केला. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज सायंकाळपर्यंत रिवाइज युटिलिटी ऐक्टिव्हेशन होणार आहे, त्यामुळे पीकविमा स्वीकारन्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील असे सांगितले. तसेच एसबीआयचे क्षेत्रीय अधिकारी अविनाश एत्तम यांच्याशी यासांदर्भात चर्चा केली. मात्र या विमा कंपनीच्या गलथान कारभारामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना फुकटचा वेळ वाया घालवावा लागत आहे. त्यातच तलाठ्यांची मनमानी यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. कसेबसे कागदपत्रांची जुळवाजुळव केली तरीदेखील पिकविम्याची कामे होत नसल्याने पिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांसाठी कि विमा कंपन्यांसाठी..? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आणि गुरुवार पासून पीकविमा स्वीकारला नाही तर लोकशाहि मार्गाचा अवलंब करण्याचा इशाराही दिला आहे.
तीन काउंटर सुरु करून विमा स्वीकारणार 
विमा कंपनीने दिलेली माहिती बैंकेचे कर्मचारी प्रबोधन भावसार यांनी बैंकेबाहेर थांबलेल्या शेतकऱ्यांना सांगून उद्या गुरुवार पासून पिकविम्याचे प्रस्ताव स्वीकारले जातील. शेतकऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी अधिकचे दोन असे तीन काउंटर सुरु करून शेतकऱ्यांच्या कामाना प्राधान्य देण्यात येईल. एकही शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. मात्र शेतकऱ्यांनी देखील आम्हाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.
मुदत वाढून सुटीच्या दिवशीही बँका सुरू ठेवा  
बैंकेच्या रांगेत उभे राहूनही पीक विमा घेतला जात नाही, त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून, शेतकऱ्यांची हि अडचण तात्काळ सोडवावी अशी मागणी करत बीजेपीचे तालुकाध्यक्ष विजय नरवाडे यांनी तहसीलदार वगवाड यांच्याशी दूरधवनीवरून संपर्क केला. आणि शहरातील सर्वच बैंकांना पीकविमा स्वीकारण्याचे आदेश देऊन पीक विमा भरतांना होणारी गर्दी लक्षात घेता सुटीच्या दिवशीही बँका सुरू ठेवण्यात यावेत अशी मागणीही केली.
एसबीआयच्या शाखा व्यवस्थापकाचे पदरिक्त 
गेल्या दोन महिन्यापूर्वी हिमायतनगर येथील एसबीआय बैन्केतील शाखा व्यवस्थापकाचे पद रिक्त झाले आहे. त्यांची बदली झाल्यानंतर येथे कोणीही अधिकारी मिळाला नसल्याने येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकही अनुभवी अधिकारी नाही. त्यामुळे बैंक व्यवहारात अडचणी निर्माण होत असून, तातडीने येथे सक्षम अधिकारी नियुक्त करून ग्राहक व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी केली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box