वडगावात आगडोंब....

वडगावात आगडोंब....
१० शेतकर्याचे घरांचे ११ लाखाचे नुकसान 
शेती व गृहउपयोगी साहित्य खाक झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर...
शाससाने तातडीची मदत देऊन हातभार लावावा...


हिमायतनगर(अनिल मादसवार) अगोदरच निसर्गाच्या लहरीपणाने भिकेला लागलेल्या शेतकऱ्यांच्या घरांना दि.०६ च्या मध्यरात्री अचानक आग लागली. या घटनेत १० शेतकऱ्यांच्या घरादारासह संपूर्ण गृह उपयोगी साहित्य भस्मसात झाले. पावसाभावी शेतातील पिके वाळू लागली...आता काय खावे आणि कुठे राहावे असा हुंदके देऊन प्रश्न उपस्थित केला. आणि उघड्यावर आलेल्या कुटुंबातील माउलीने आगीत जळलेले अन्नधान्य गोळा करणे सुरु केल्याचे विदारक चित्र हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव ज.येथे पहावयास मिळाले आहे. या आगडोंबात ३ भावकीतील १० अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जवळपास ११ लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे. दैव बलवत्तराने जाग आली म्हणून आमचे व पशु प्राण्यांचे जीव वाचू शकलो अश्या प्रतिक्रिया हताश झालेल्या कुटुंबातील महिलांनी नांदेड न्युज लाईव्हच्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केल्या.  

गेल्या १५ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाळा सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात पेरलेल्या पिकांना जागविण्यासाठी बळीराजा पोटाला चिमटा देत कुटुंबासह धडपड करीत आहे. अश्याच चिंतेत असलेल्या तालुक्यातील वडगाव ज.येथील शेतकरी दि.०५ रोजी दिवसभर घाम गाळून देवाकडे पाऊस पडण्याची विनंती करत घरी परतले. सायंकाळी घरी आल्यानंतर भाकरीचा घास मोडून विश्रांती घेतली. अचानक १२ वाजेच्या दरम्यान घरांना आग लागून पेट घेतल्याचे जाणवले. अचानक घडलेल्या घटनेने घरातील सर्व शेतकरी कुटुंबासह उठून बाहेर आले. तर काही शेतकर्यांनी आपले पाळीव पशु - प्राणी वाचविण्यासाठी धडपड चालविली. तर काहींनी घराला लागलेली आग विजाविण्याचा प्रयत केला. परंतु पाणी टंचाई असल्याने शेतकर्यांना शेतातून पाईप लावून पाणी आणावे लागले. दरम्यान सुरु अससेल्या वार्याने येथील १० घरांना आपले लक्ष केले. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने या आगडोंबाच्या घटनेत कोंबड्या, अन्नधान्य, ग्रह उपयोगी साहित्य, कपडे लत्ते, टीन- पत्रे, जनावरांचे वैरण, खते, शेती उपयोगी साहित्य, नगद रक्कम, मालमत्तेची कागदपत्रे आदी जळून भस्मसात झाले आहे. या घटनेने १० शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या अचानक घडलेल्या घटनेने शेतकरी कुटुंब पूर्णतः हताश झाले असून, आता काय खावे, कुठे राहावे असा सवाल करत आहेत. आगीच्या घटनेने नुकसानीत कुटुंबियांना शासनाने तातडीने मदतीचा हातभार लावावा अशी मागणी गावकरी व शेतकरी बांधवांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच महसुलचे तलाठी श्री पी.जी.माने यांनी घटनास्थळी सकाळी ९ वाजता भेट देवून जळीत घटनेचा पंचनामा पोलीस पाटील बालाजी ताडकुले व गावकरी पंचासमक्ष केला. या घटनेत येथील शेतकरी गंगाधर मारोती माळसोठे - ९० हजार, लक्ष्मण मारोती माळसोठे - ०२ लाख ८५ हजार, हुलाजी सखाराम तुपेकर - ०२ लाख ४६ हजार, आनंदराव सखाराम तुपेकर - ०२ लाख ४० हजार, सखाराम तोलाजी तुपेकर - १४ हजार, मारोती नारायण शिंदे - ७८ हजार, बालाजी राजाराम शिंदे - ४३ हजार, राजाराम नारायण शिंदे - २७ हजार ५००, ग्यानबा पुंजाराम पावडे - १० हजार, रामेश्वर ग्यान्बाराव पावडे ०८ हजार असे एकूण १० शेतकरी कुटुंबाचे १० लाख ४१ हजार ५०० रुपयाचे नुकसान झाले आहे. तसेच पोलिसांच्या वतीने श्री कांबळे यांनी येथे भेट देवून घटनेची माहिती घेतली.   

तालुक्यासाठी अग्निशमन बंबाची आवश्यकता
-----------------------------
हिमायतनगर तालुक्याचे ठिकाण असून, तालुक्यात एकूण ५३ ग्रामपंचायती आहेत. यात एकूण ७८ हून अधिक गावे -वाडी तांडे असून, आजवर अनेक ठिकाणी अचानक व शोर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या बर्याचश्या घटना घडल्या. परंतु येथे अग्निशमन दलाचे बंब  नसल्याने आगीच्या घटनावर मात करणे कठीण झाले आहे. अशी घटना आघाडल्यास किनवट - ६० कि.मी., हदगाव -४५ कि.मी, भोकर ४० कि.मी.दूरवर असल्याने त्यांना पाचारण केल्या नंतर पोचेपर्यंत मोठे नुकसान झाल्याचा अनुभव तालुक्यात मागील काळात घडलेल्या घटनेवरून आला आहे. आज हिमायतनगर येथे अग्निशमन दलाचा बंब असला असता तर तातडीने आगीच्या घटनेवर उपाय होऊन शेतकऱ्यांचे झालेले नुकसान टळले असते अश्या प्रतिक्रिया या घटनास्थळी उमटल्या आहेत. 
                                                                 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी