होणार किती मतांची कमाई?

नेत्यांत झाली दिलजमाई.. होणार किती मतांची कमाई?


प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यात अखेर दिलजमाई झाली आहे. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकरांचे वडील यांचे घनिष्ठ संबंध. पण काळाच्या ओघात राजकीय महत्त्वाकांक्षांमुळे या दोघांमध्ये आलेले वितुष्ट शुक्रवारी दूर झाले आहे. अशोकरावांच्या विरोधकाला भाजपा जवळ करीत होती. मुखेडचे राठोड बंधू मुंडेच्या गळाला लागले होते.मुदखेडमध्ये भाजपा सोडून कांग्रेस मध्ये आलेले मुदखेड नगरपरिषदेचे  माजी नगराध्यक्ष राम चौधरी स्वगृही परत आले होते.आणि काही महिन्यापूर्वी भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेलेले भाजपाचे माजी खासदार डी.बी. पाटील ह्यांना पुन्हा पक्षात घेऊन गोपीनाथ मुंडे यांनी नांदेड लोकसभेची पुन्हा उमेदवारी दिल्याने ,राष्ट्रवादीनेच नांदेड जिल्ह्यातून कांग्रेसला संपविण्यासाठी आपला मित्र भाजपात पाठविला आहे अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. १३ तारखेच्या गोपीनाथ मुंडे यांच्या  नांदेड दौऱ्यात आणखी काही  राष्ट्रवादीचे शिलेदार मुंडे यांच्या जाहीर सभेत भाजपात प्रवेश करतील असे सांगण्यात येत असताना दहा तारखेला अशोक चव्हाणांसाठी प्रचाराला आलेल्या शरद पवारांनी अशोकरावांची अवघडलेली स्थिती आपल्या डोळ्यांनी बघितली होती. जे कांग्रेसचे हुकमी मुस्लीम मतदार होते ते सभेतून उठून जात होते. आणि अशोक चव्हाण यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि हास्य खरेखुरे नसून उसने आहे हे राजकारणात  मुरलेल्या पवारांना ओळखायला वेळ लागला नाही आणि त्यांनी अशोक चव्हाण यांना अस्वस्थ करीत नांदेडला मुक्काम करून रात्रीतून कांग्रेसच्या बाजूने हवा वळविण्याचा उद्योग तत्काळ सुरु केला. बहुदा नांदेडला येण्याआधीच पवार व अशोक चव्हाण यांच्यात या कथित दिलजमाई संदर्भात चर्चा झाली असावी आणि म्हणूनच त्यांनी नांदेडला  मुक्काम करून प्रतापरावांना त्यांच्या घरी जाऊन आघाडी धर्म पाळण्याचे आदेश दिले. त्याआधी अशोक चव्हाण यांनीही आपल्या बाजूने प्रयत्न सुरु ठेवले होते.

मोदीच्या त्सुनामी लाटेत आपला विजय वाहून जाता काम नये, यासाठी अशोक चव्हाण यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा पराभव करण्यासाठी बंडखोर उमेदवार वसंतराव चव्हाण यांना निवडुन आणून बापूसाहेबांना पाच वर्षांच्या  राजकीय वनवासात पाठविण्यात यश मिळविले होते त्यावेळी अशोक चव्हाण यांच्याकडे सत्तेची  पावर होती. पण दरम्यान ते स्वत:च आदर्शचे निमित्त होऊन विजनवासात गेलेले असल्याने या निवडणुकीत त्यांनी आपले राजकीय पुनर्वसन होण्यासाठी अथक परिश्रम करून आणि अनेक डावपेच खेळून प्रचंड विरोध असताना लोकसभेचे तिकीट मिळविले असल्याने त्यांच्यासाठी ही लोकसभेची निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. आणि या निवडणुकीत प्रखर मोदीलाट असताना, राष्ट्रवादीचे शिलेदार भाजपला छुपी रसद पुरवित असलेले दिसत आसताना एकेक खिंड लढवून विजय मिळवायचा तर आधी बापूसाहेब गोरठेकर यांना त्यांनी आपल्या बाजूने प्रचारात आणले आणि मागच्या विधानसभेत प्रभावाने  सुंभ जाळला असला तरी पीळ कायम असणारे प्रताप पाटील जोपर्यंत आपल्या बाजूने येत नाहीत तोपर्यंत विजयासाठी अनुकूल वातावरण होणार नाही याची तीव्र जाणीव झाल्यानेच  अशोक चव्हाणांनी शरद पवारांची मदत घेत आघाडीचा धर्म पाळण्याच्या हेतूने का होईना प्रताप पाटील यांना आपल्या प्रचारात सोबत आणलेअसल्याचे चित्र दिसत आहे.  

चिखलीकर आणि चव्हाण यांच्यातली वर्चस्वाची लढाई अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. पण निवडणुकांच्या निमित्ताने  झालेल्या या दिलजमाईने  चव्हाणांची बाजू काहीसी  भक्कम झाली हे मान्य करावे लागते. एकेकाळी राजकीय संघर्षातून चिखलीकरांच्या समर्थकांनी शंकर आण्णा यांच्या रालीत सहभागी झालेल्या अशोक  चव्हाणांच्या दिशेने  चप्पलही भिरकावली  होती. नेत्यांची युती झाली तरी कार्यकत्यांचे मनोमिलन होत नाही, असा संदेश काल देण्यात आला. एकेकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रताप पाटील-चिखलीकर 'प्रायव्हेट लिमिटेड काँग्रेसचा' आरोप करीत चव्हाण यांच्यापासून काही वर्षांपूर्वी दुरावले. श्री. चव्हाण यांच्यापासून दुरावलेल्यापैकी बहुतांश नेत्यांनी अन्य पक्षांचा आश्रय घेत आपले अस्तित्व निर्माण केले; परंतु श्री. चिखलीकर यांनी मित्रमंडळाच्या माध्यमातून स्वत:चे अस्तित्व तर निर्माण केलेच; शिवाय काँग्रेसचे सहयोगी आमदार असूनही वेगवेगळ्या प्रकरणांत अशोकरावांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रतापाला बळ देण्याचे लातूरकरांनी काम पार पाडले. ज्या ज्या वेळी चिखलीकर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत मागतील; त्या त्यावेळी लातूरकरांनी सढळ हाताने त्यांना रसद पुरविली.

श्री. चव्हाण यांच्या जिल्ह्य़ात त्यांच्याच एका जुन्या समर्थकाला लातूरहून पाठबळ मिळाल्याने चव्हाण-चिखलीकर वाद विकोपाला गेला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नांदेड मतदारसंघाच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वाना सोबत घेण्याचा निर्धार केलेल्या श्री. चव्हाण यांनी प्रतापरावांशी हातमिळवणी केली. 'झाले गेले विसरून जा आणि मदत करा,' असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन करताच श्री. चिखलीकर यांनी शेवटच्या टप्प्यात हाताला साथ दिली आहे . राजकारणात " कोणी कायम शत्रू तर कोणी कायम मित्र नसतो " हे वचन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोहा-कंधार भागात प्राबल्य असलेल्या माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सोबत कॉंग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांची 'दिलजमाई' झाली असली कार्यकर्त्यांमधील राजकीय वैर  येत्या पाच दिवसात संपूष्टात येईल असे वाटत नाही. अगदी या नेत्यांच्या घरातील मतेही कांग्रेसला पडतील की नाही याची शंका वाटते आहे. म्हणूनच ही दिलजमाई प्रताप पाटलांसाठी भविष्यात 'आमदारकीच्या तिकीटाची कमाई' ठरणार असली तरी विद्यमान आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासाठी 'राजकीय खाटाई' तरणार आहे. अशोक चव्हाण यांनी दोघानाही न्याय देऊ असे म्हटले असले दोघातील राजकीय हाडवैर पाच दिवसात मिटेल याची खात्री देता येत नाही. कारण काल पेठवडज येथील दिलजमाईच्या सभेतही धोंडगे आणि चिखलीकर यांनी एकमेकांसाठी 'वाघ' आणि 'लांडगे' असे शब्द वापरले आहेत. 

मागच्या निवडणुकीत बापूसाहेब गोरठेकर आणि प्रतापपाटील चिखलीकर यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या अशोक चव्हाणांना प्रताप पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर हे कसे विसरू शकतात? याचा बोधच अद्याप कार्यकर्त्यांना झाला नाही.१९९९ मध्ये कांग्रेस पक्षात असताना कांग्रेस पक्षाकडेच असलेल्या कंधार -लोहा विधानसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मागतील होती तेंव्हा अशोक चव्हाणांनी खेळी करून २००४  मध्ये कंधार-लोहा मतदार संघ राष्ट्रवादीकडे देऊन टाकला होता आणि राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शंकरअण्णा धोंडगे यांनी ही निवडणूक लढविलीहोती. त्यावेळी प्रताप पाटील चिखलीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. आणि त्या निवडणुकीत आपल्या बळावर विजय संपादन केला होता. सन २००४ मध्ये अपक्ष आमदारांची गरज सरकार स्थापण्यासाठी होती. म्हणून आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कृपाछत्राखाली प्रताप पाटील चिखलीकर यांनी सरकारला पाठिंबा दिला. आमदार झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांचे प्रस्थ आणखीन वाढले होते. 

सर्वजन अशोकराव यांच्या पावर समोर नतमस्तक झालेले असताना प्रताप पाटलांचे  बंडखोर  राजकारण अशोकरावांच्या डोळ्यात काटा बनून सलत होते. त्यांना संपविण्याचे सूडाचे राजकारण अशोक चव्हाण खेळत असले तरी प्रताप पाटील चिखलीकर त्यांच्या डावपेचांना त्यांना पुरून उरले होते. नांदेड महानगर पालिका निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोकभारती पक्षाच्या माध्यमातून मनपामध्ये उमेदवार उभे केले होते. याही परिस्थितीत प्रताप पाटील चिखलीकर यांनी लातुर्कारांचे सहकार्य घेऊन अशोक चव्हाणांना बेजार केले होते. २००९ ची निवडणूक येण्यापूर्वी लोहा येथे माजी आमदार रोहिदास चव्हाण मुलीचे  लग्न झाले. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी त्या लग्नाला जवळपास एक दिवसांचा वेळ दिला होता. आणि त्या लग्नातील प्रत्येक बाबीची देखरेख अशोक चव्हाण करत असलेले जनतेने पाहिले आहे. आपल्या चारचाकी वाहनांच्या शो रूममधून एक नवी कोरी करकरीत गाडी रोहिदास चव्हाणांच्या मुलीला भेट दिली होती. त्याच दिवशीच प्रताप पाटील चिखलीकर यांचे २००९  मधील भवितव्य ठरले होते. २००९ मध्ये कंधार-लोहा मतदार संघ कॉंग्रेसला सुटावा आणि काँग्रेसने आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी आपल्या जीवाची मुंबई करत प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याचे काम अशोक चव्हाण यांनी केले होते. तरी पण न डगमगता पुन्हा प्रताप पाटील चिखलीकर विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले पण अशोक चव्हाणांची खेळी यशस्वी ठरली. आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पराभव झाला . प्रताप पाटील चिखलीकर यांचा एक-एक मोहरा अशोक चव्हाण आपल्या तंबूत आणला तरी पण प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या अस्मितेला तडा जावू दिला नाही. 

त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत अशोक चव्हाणांचे सर्वात प्रिय अमरनाथ राजूरकर यांना विरोध करण्याचा प्रयत्न एकट्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला होता. तेंव्हा अशोक चव्हाणांनी त्यांच्याशी मिळते घेतले होते आणि  पुढे प्रताप पाटलांनीही आपल्या मुलाचे प्रवीण पाटलाचा सभापती रोहन समारंभ चव्हाणांच्या कृपेनेच पदरात पडून घेतला होता. आपल्या सत्तेच्या पत्रावळीवर अशोकरावानी प्रतापरावानाही द्रोण मांडू दिला होता. त्यामुळेच सध्या प्रवीण पाटील चिखलीकर हे जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य खात्याचे सभापती आहेत. 

नुकतीच लोहा नगर पालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत सुद्धा प्रताप पाटलांचे अस्तित्व संपविण्यासाठी अशोक चव्हाणांनी रोहिदास चव्हाण यांच्यासोबत एक ' गुप्त खलबत ' केले परिणामी तुला ना मला घाल मनसेला या पद्धतीने महाराष्ट्रात मनसेचा झेंडा लोह नगर परिषदेवर फडकला त्यात राज ठाकरे यांच्या पेक्षा अशोक चव्हाणांचे कर्त्तृत्व  मानले जाते. आज देशात मोदीची लाट आहे भले भले कांग्रेस पुढारी आणि केंद्रातील मंत्री धास्तावलेले असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभेचे आव्हान स्वीकारले आहे. अशा वेळी लोकसभेने भाजपाचे खाते पुन्हा उघडले गेले आणि महायुतीची पावर वाढली तर दोन्ही कांग्रेसच्या हाती कटोरा येणार आहे.ही गोष्ट दूरदृष्टी असणारे शरद पवार यांना उमगल्याने आता भांडत बसण्याची हे वेळ नाही आता जर आघाडीचा धर्म पाळला नाही तर विधानसभेच्या वेळी आणखी बिघाडी वाढणार आहेत. या आधी राजकारणाच्या पटलावर एकमेकांचे विरोधक असणारे शरद पवार आणि शंकरराव चव्हाण आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्यात अडचणीत विरोधी पक्षाला मात देण्यासाठी दिलजमाया झाल्याचा इतिहास आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती काल शुक्रावारी ११ एप्रिल रोजी झाली आहे.   

हीच दिलजमाई शेजारच्या हिंगोली लोकसभा मतदार संघात झाली असते तर कांग्रेसचे बळ तिथेही वाढले असते पण शरद पवार नांदेडला आलेले असताना सूर्यकांता पाटील मात्र बाहेर गावे गेल्या होत्या. शरद पवार प्रताप पाटलांना आघाडीचा धर्म पाळायचा आदेश देता आहेत मग हिंगोली मतदार संघात सूर्यकांता पाटील यांना ते असा आदेश का देत नाहीत? तिथे त्यांचा रिमोट कंट्रोल का चालत नाही? अजितदादा सूर्यकांता ताईला या आघाडी धर्मावर काहीच कसे बोलत नाहीत ? या प्रश्नाची उत्तरे मतदारांना मिळाली असती तर बरे झाले असते....... "अभी नही तो कभी नही लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना चव्हाण यांनी ' डॅमेज कंट्रोल ' मोहीम सुरू केली. आधी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यापाठोपाठ गोरठेकरांचे मित्र असलेल्या प्रतापरावांशीही दिलजमाई झाली आणि आघाडे धर्माचे पालनही झाले भाजपचे डी. बी. पाटील यांचे ' कमळ ' कोमेजल्याचे जाणवत असले तरी ही कथित दिलजमाई अशोक चव्हाण यांच्यासाठी किती मतांची कमाई करते ही गोष्ट आगामी १७ तारखेला ठरणार असून निकालावर या दिलजमाईचा नक्की काय परिणाम होईल हे जाणण्याची उत्सुकता आम्हाला लागली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी