हिंगोली लोकसभा

हिंगोली लोकसभा मतदार संघात खा.वानखेडेना सातवांचे कडवे आव्हान 
मोदीची लाट तारून नेणार.. कि डुबविणार...!



हिमायतनगर(अनिल मादसवार)हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, नामांकन अर्ज भरण्याचे कार्य सुरु झाले आहे. त्यानंतर लगेच प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून, दोन्ही प्रमुख पक्षाकडून तूल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने हिंगोलीत शिवसेना - काँग्रेस अशी जोरदार टक्कर होणार आहे. या काट्याची लढतीत विजयश्री मिळविण्यासाठी खा.सुभाष वानखेडे यांच्यासमोर सातवांचे कडवे आव्हान उभे आहे. यातून वानखेडेना मोदीची लाट तारून नेणार.. कि डुबविणार...? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.    

एकेकाळी परंपरागत काँग्रेसकडे असलेला हिंगोली लोकसभा मतदार संघ युतीच्या काळात मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिश्यात आला होता. त्यावेळी श्रीमती सूर्यकांताताई पाटील विजयी होऊन केंद्रीय मंत्री झाल्या होत्या. गत २००९ च्या निवडणुकीत विद्यमान खा. सुभाष वानखेडे यांनी तत्कालीन खा. सुर्यकांताताई यांचा पराभव करून भगवा फडकाविला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खा. वानखेडे यांचा पराभव करून पुन्हा राष्ट्रवादीचा झंड रोवण्यासाठी सूर्यकांता पाटील कंबर कसली होती. परंतु मागील निवडणुकीत हिंगोलीची जागा पडल्यामुळे या जागेवर परंपरागत काँग्रेस ने आपला हक्क गाजवीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे तत्कालीन खासदार सूर्यकांता पाटील यांचा काँग्रेस मित्र पक्षाने राजकीय बळी घेतल्याची चर्चा सुरु झाली. निराश झालेल्या सुर्यकांताबाई सध्या चूप बसल्या असल्या तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र चलबिचल झाले आहेत. 

याच हिंगोलीच्या जागेवर काँग्रेसने नवीन चेहरा म्हणून आ.राजीव सातव यांना उमेदवारी दिली आहे.  तर महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खा.सुभाष वानखेडे हे दुसर्यांदा निवडणूक रिंगणात उभे आहेत. या ठिकाणची उमेदवारी सुभाष वानखेडे यांना देण्यात आल्यामुळे हि निवडणूक अत्यंत सहजरीत्या जिंकता येईल असे त्यांना वाटते आहे. मात्र काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले राजीव सातव हे प्रतिस्पर्धी उमेदवार असल्यामुळे वानखेडे यांना २०१४ ची हि लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

तर राष्ट्रवादी काँग्रेस मधील एड.शिवाजी माने हे सुद्धा लोकसभा निवडणूक लढवीण्यासाठी इच्छुक होते, परंतु शेवटच्या क्षणात हिंगोलीची जागा कॉग्रेसला सुटल्याने त्यांचाही हिरमोड झाला. त्यामुळे सूर्यकांता पाटील आणि शिवाजी माने यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी हि उघडपणे दिसत असल्याने काँग्रेसच्या उमेदवारांची दोखेदुखी वाढवणारी ठरली आहे. हि परिस्थिती ओळखून नुकतेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हिंगोली येथे कार्यकर्ता मेळावा घेवून शक्ती प्रदर्शन घडून आणले, हि निवडणूक देशाचा विकास या मुद्यावर लढविली जाणार असल्याने याचा फायदा काँग्रेसला होईल असा त्यांचा दावा आहे. परंतु येथे जाती पातीचे राजकारण आडवे येत असल्याने खुद्द काँग्रेस मध्ये सुरु असलेली गटबाजी हि निवडणूक रिंगणात उभे असलेल्या उमेदवारास अडचणीची ठरून याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवारास होण्याची शक्यता वर्तवीली जात आहे.

तर महायुतीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना मोदीच्या लाटेमुळे विजयश्री खेचून आणण्यास मदत मिळण्याची अशा आहे. आजवर वानखेडे यांनी १४०० हून अधिक गावांना भेटी दिल्या आहेत. जवळपास १.५ ते ०२ लाख मताधिक्याने निवडणूक जिंकू असा त्यांचा दावा आहे. परंतु शिवसेनेत सुरु झालेली अंतर्गत गटबाजी यामुळे नाराज असलेले दिग्गज नेते वानखेडे यांच्या विजयात अडसर ठरण्याची शक्यता आहे. एकंदरीत हिंगोली लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि शिवसेना असा थेट सामना होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.  

हिंगोली मतदार संघावर जातीय समीकरणाची पकड  

हिंगोली लोकसभा मतदार संघात हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा, हिंगोली, कळमनुरी या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या तालुक्याचा समावेश आहे. दहा लाख मतदार संखेच्या मतदानावर या लोकसभा मतदार संघाची स्थापना गात निवडणुकीच्या वेळी करण्यात आली होती. आज या मतदार संघात १३ लाख मतदार संख्या झाली असून, अर्ध्याहून अधिक मतदार हे हिंगोली जिल्ह्यातील आहेत. जातीय समीकरणाची पकड या मतदार संघावर असून,  यात ०३ लाख मतदार हे मराठा समाजाचे, ०२ लाख मतदार बंजार समाजाचे, अनुसूचित जातीचे ०१ लाख, धनगर - हटकर ५० हजार आणी इतर बहुजन समाजाचे २.५ लाख, उच्च वर्णीय व नौकारदार असे मिळून ०२ लाख मतदार असे एकूण १३ लाख मतदारंची संख्या आहे.    

आजवर होऊन गेलेले खासदार 

हिंगोली लोकसभा मतदार संघाची स्थापना झाल्यापासून कै.विलास गुंडेवार( एक वेळा), कै.उत्तमराव राठोड( दोन वेळा), कै.चंद्रकांत पाटील ( एक वेळा), एड.शिवाजी माने ( एक वेळा), श्रीमती सूर्यकांता पाटील ( दोन वेळा), सुभाष वानखेडे या मराठा समाजच्या शिलेद्दारानी दिल्लीच्या तख्त गाजविला आहे. या ठिकाणी उमेदवार निवडून आणायचं असेल तर परंपरागत जातीय समीकरणानुसार मराठा किंवा बंजारा समाजाचा उमेदवार देण्यावर भर दिला जातो. यावेळी मात्र या जागेवर काँग्रेसने  हक्क गाजून माली समाजाचा उमेदवार दिला आहे. तर शिवसेनेने मराठा समाजाचाच जुन्या चेहर्याचा उमेदवार रिंगणात उतरविला आहे. या भागात मनसे, बसपा, आप, समाजवादी, यासह अन्य कोणत्याही पक्षाने अद्यापतरी आपले उमेदवार जाहीर केले नाही. त्यामुळे या दोन प्रमुख गटात काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी