गावाला स्वर्ग बनवा.

मेल्यानंतर स्वर्गाची अपेक्षा करण्यापेक्षा जिवंतपणी गावाला स्वर्ग बनवा...झरिकर


हिमायतनगर(अनिल मादसवार)निसर्गाने मानव जातीला सर्वकाही भरभरून दिले आहे. त्यामध्ये स्वच्छ हवा, पाणी, अन्न, फुले, फळे, आदींचा समावेश आहे. परंतु आपण आपल्या बेजबाबदार कृतीमधून निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा नाश करीत आहोत. मेलवर मला स्वर्ग मिळावा अशी अपेक्षा आपण करितो. परंतु मेल्यानंतर स्वर्ग मिळण्याची अपेक्षा करण्यापेक्षा जिवंतपणे सामाजिक बांधिलकीची जान ठेवून आपल्या गावातच स्वर्ग निर्माण करा असे आवाहन स्वच्छतेचे पुजारी, अग्रणी समाजसेवक माधवराव पाटील झरिकर यांनी केले. ते निर्मल भारत अभियानामध्ये राज्य समितीत पात्र ठरलेल्या गावातील नागरिकांना प्रबोधन करण्यासाठी आले असता बोलत होते .

याप्रसंगी गावात आलेल्या प्रबोधन यात्रेचे जवळगाव, वाघी, खडकी बा, येथील गावकर्यांनी जंगी स्वागत केले. गावाच्या पाहणीनंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले कि, मानव जन्म हा सर्वश्रेष्ठ असून, निसर्गाने दिलेल्या सुख - सुविधांचा उपभोग आपल्याला घ्यावयाचा असेल तर, आपले आरोग्य हे निरामय असणे आवश्यक आहे. यासाठी गाव- गावात असलेले गट - तट बाजूला ठेवून एक गाव - एक परिवार हि संकल्पना आचरणात आणून सांडपाणी व्यवस्थापन, घरोघरी शौच्चलय बांधकाम व वापर, स्वच्छ शाळा, अंगणवाडी यासह गाव परिसर स्वच्छ सुंदर व प्रदूषण मुक्त बनवून गावाला स्वर्ग बनवा असेही ते म्हणाले. सर्वच क्षेत्रामध्ये मुलापेक्षा मुली अग्रेसर असताना मुलीना अपवाद वगळता दुय्यम पदाची वागणूक देवून तिच्यावर अन्याय करणे हि बाब आपल्याला भूषणावह नाही. त्यामुळे मुलींना सुद्धा स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेवू द्या. गर्भातच तिची हत्या करू नका असेही ते म्हणाले.

निर्मल ग्राम भारत अभियान हा केंद्र व महाराष्ट्र शासनाचा संयुक्त उपक्रम असून, हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव, वाघी, खडकी बा. हि गावे निवडण्यात आली आहेत. येथील ग्रामस्थांना प्रबोधन व मार्गदर्शन करण्यासाठी स्वच्छता दूत माधवराव पाटील यांचा हिमायतनगर तालुक्यात विशेष दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर, वाघीचे सरपंच सौ.लताबाई शिवाजीराव देवसरकर, उपसरपंच पुंजाराम कदम, खडकीचे सरपंच पांडुरंग गाडगे, उपसरपंच कावळे, ग्रामसेवक भगवान वडपत्रे, बी.एन.खांडरे, पत्रकार कनब पोपलवार, प्रेमकुमार धर्माधिकारी, अंगणवाडी कार्यकर्ती, यांच्यासह ग्रामस्थ बहुसनखेने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी