चारकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांचा हिमायतनगरात उडाला बोजवारा

समारोपाला लावलेली वृक्ष गेली वाळून...!

हिमायतनगर (एनएनएल) हिमायतनगर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या तीनही परिमंडळात लावण्यात आलेल्या शेकडो वृक्षांचे जतन करण्यात वनविभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी कुचराई केल्यामुळे लावलेली अर्ध्याहून अधिक वृक्ष महिन्याभरातच वाळून गेली आहेत. परिणामी हिमायतनगर तालुक्यात चारकोटी वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा उडाल्याने शासनाचा कोट्यवधींचा खर्च वाया गेल्याने शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवडीचे स्वप्न भंगण्याजोगे चित्र दिसत आहे.

राज्यातील वनाच्छादनाचे प्रमाण सध्या १६ टक्के इतके आहे. वस्तुत: ३३ टक्के वृक्षाच्छादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी जवळपास ४०० कोटी वृक्ष लावावे लागतील. ३३ टक्के वृक्षाच्छादनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सुरुवात म्हणून २०१६ मध्ये १ जुलै रोजी २ कोटी ८३ लाख वृक्ष राज्यभरात लावण्यात आले. पुढील तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. यावर्षी ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले असून, २०१८ मध्ये १३ कोटी तर २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यंदा सण २०१७ च्या पावसाळी खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या ०१ जुलै ते ०७ जुलै पर्यंत संपूर्ण राज्यभरात चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यासाठी वृक्ष लागवडी संबंधित वनविभागाच्या संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱयांच्या देखरेखीखाली या मोहिमेत शालेय, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच समाजातील सामाजीक सेवाभावी संस्था, संघटना यांना सामावून घेऊन वृक्ष लागवड योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. नांदेड येथील वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या उद्देशानुसार वृक्ष लागवाड करण्यात आल्याचे सांगून, तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीला प्रत्येकी ३६४ वृक्ष लागवड मजुरांच्या हस्ते करण्यासाठी एकूण १८ हजार ९२६ वृक्ष वितरित केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस.डोके यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर संपन्न झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या समारोपदिनी दिली होती. प्रत्यक्षात मात्र बहुतांश ग्रामपंचायतीने ५० ते १०० वृक्ष लागवड करून हात झटकले. काही ग्रामपंचातीने तर वृक्ष लागवड करण्यात स्वारस्य दाखविले नसल्याचे चित्र तालुक्यात अनेक ठिकाणी दिसून येत आहे. ज्यांनी वृक्ष लागवड केली त्यांनी केवळ फूट - दीडफूट खड्डे करून झाडे लावल्याचा कांगावा केल्यामुळे  महिन्याभरातच अनेक झाडे मृत झाली आहेत. परिणामी मोठा गाजा - वाजा करून करण्यात आलेल्या शासनाच्या कोट्यवधी रुपयाच्या खर्चातून लावलेल्या वृक्ष लागवडीचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र हिमायतनगर तालुक्यात दिसून येत आहे. 


वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन उभारण्यात आलेल्या तालुक्यातील सरसम बु, दुधड, वाशी आदी ठिकाणच्या रोपवाटीकेतून चिमण साग, जांभूळ, मोह, चिंच, सिसू, आवळा, बोर, करंज, इत्यादी प्राजातीची रोपे वाहतुकीने आणून हिमायतनगर शहरात अल्प दारात रोपविक्री केंद्रे उभारण्यात आली होती. तसेच दुधड, सोनारी, टाकराळा जंगल परिसरात जवळपास १२ हजार रोपे खड्डे खोदून लागवड करण्यात आली. तसेच हिमायतनगर येथील तहसील परिसरात शेकडो वृक्षाची लागवडीचा कार्यक्रम आ. नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर  यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आला होता. तहसील परीसरात लावण्यात आलेल्या त्यासह जंगल परिसरात लावलेल्या झाडांची संगोपन करण्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनपाल व वृक्ष लागवड केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी कुचराई केल्यामुळे महिन्याभरातच ४० टक्के वृक्ष वाळून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. 

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वृक्षतोड वाढली 
हिमायतनगर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस.डोके यांच्या जबाबदारीवर हिमायतनगर, सरसम बु, पोटा बु. या तीन परिमंडळाचा कारभार ३ वनपाल, ८ वनरक्षक, ४ वनमजुरांच्या माध्यमातुल चालविला जात आहे. हिमायतनगर परिमंडळात वाशी, सरसम परिमंडळात दरेसरसम, पवना, दुधड, वाळकेवाडी, पोटा बु.परिमंडळातील पोटा, वाई तांडा, टाकराळा, भोंडानी तांडा यासह तेलंगणा सीमेवर असलेल्या बॉर्डरवरून गेल्या काही महिन्यापासून सागवान, गहरी, सिसम, चंदन आदी मौल्यवान वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल करून तेलंगणातील माफिया तस्करी करत आहेत. याबाबतची माहिती संबंधितांना असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तसेच शासनाकडून केल्या जाणाऱ्या वृक्ष लागवडीचा फायदा कोणाला..? असा सवाल पर्यावरण प्रेमी नागरिक विचारीत आहेत.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी