भाषेचे संवर्धन म्हणजे राष्ट्राचे संवर्धन !

राजर्षीच्या लेखन कार्यशाळेत डॉ. अच्युत बन

नांदेड (एनएनएल) चीन-जपानसारखे देश आपली स्वत:ची भाषा टिकवूनच प्रगत झाले आहेत. आपल्या भाषेचे संरक्षण-संवर्धन करणे म्हणजे पर्यायाने राष्ट्राचे संवर्धन करणे असते, असे प्रतिपादन मराठीतील महत्त्वाचे प्रवासवर्णनकार डॉ. अच्युत बन यांनी केले. येथील राजर्षी शाहू विद्यालयात आयोजित लेखन कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. सुरेश सावंत हे होते. यावेळी उपमुख्याध्यापक एस. आर. कुंटूरकर, ऍड. अंजना गव्हाणे (बोखारे), टी.एन. रामनबैनवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. बन पुढे म्हणाले की, मला जग जाणून घेण्याची अनिवार ओढ असल्यामुळे मी आतापर्यंत 44 देशांचे पर्यटन केले असून स्वत:ला अभिव्यक्त करण्याच्या ऊर्मीतून माझी प्रवासवर्णनवर 15 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रत्येक देशाला जसा भूगोल असतो, तसा इतिहासही असतो. मी पेशाने डॉक्टर असलो, तरी मला सामाजिक शास्त्रांची आवड असल्यामुळे मला विविध भूभाग सतत खुणावत असतात. सजग वाचकांकडून मिळणाऱ्या उत्साहवर्धक प्रतिक्रिया हे लेखकासाठी टॉनिक असते, असे सांगून डॉ. बन पुढे म्हणाले, की वाचन माणसाला समृद्ध बनविते, परिपूर्ण माणूस बनविते. माझ्या वाचनवेडाने मला लेखनासाठी प्रवृत्त केले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

डॉ. सुरेश सावंत यांनी डॉ. अच्युत बन यांचा प्रवासी पक्षी आणि माणूसवेडा माणूस अशा शब्दांत परिचय करून दिला. डॉ. बन यांच्या वैद्यकीय सेवेला 29 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यशाळेच्या पूर्वार्धात डॉ. बन यांनी आपली जडणघडण, वाचनाचे महत्त्व, वैद्यकीय सेवेतील अनुभव, परदेशपर्यटन व प्रवासवर्णन लेखनाच्या प्रेरणा, लेखनप्रक्रिया इ. विषयी कथन केले. विद्यार्थ्यांनी डॉ. बन यांची प्रवासवर्णने आधीच वाचलेली असल्यामुळे कार्यशाळेच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांनी लेखकाला विविध कल्पक प्रश्न विचारले. त्यातून डॉ. बन यांचा लेखनप्रवास आणि जीवनप्रवास उलगडत गेला. केवळ एकतर्फी भाषण न देता प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून वक्ता आणि श्रोत्यांच्या संवादातून ही कार्यशाळा उत्तरोत्तर रंजक आणि उत्कंठावर्धक होत गेली. दोन तास चाललेल्या ह्या कार्यशाळेत विद्यार्थी अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन सहभागी झाले होते. जिंदगी कैसी है पहेली हे गीत सादर करून डॉ. बन यांनी कार्यशाळेचा समारोप केला. डॉ. बन यांनी म. म. द. वा. पोतदार यांची मराठी भाषाविकासविषयक अष्टसूत्री विद्यार्थ्यांना भेट दिली. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी