प्राध्यापकाला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या

एनएसयूआयच्या अध्यक्षाला सक्तमजुरीसह 17 रोख दंड 

नांदेड (एनएनएल) यशवंत कॉलेजमधील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापकाला एका विद्यार्थ्याला चुकीचा प्रवेश द्यावा यासाठी जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या एनएसयुआय च्या अध्यक्षाला नांदेडचे सहावे जिल्हा न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि 17 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाच्या रकमेतील दहा हजार रुपये प्राध्यापक बिऱ्हाडे यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


दि.18 जुलै 2007 रोजी यशवंत महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.रामा नागोबा बिऱ्हाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली की, 16 जुलै 2017 रोजी यशवंत महाविद्यालयात स्पॉट ऍडमिशन देण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रक्रियेत कला शाखेत पदवी प्राप्त विद्यार्थी प्रशांत रावनराव यकुंडे याला प्रवेश द्यावा म्हणून एनएसयुआयचे अध्यक्ष बालाजी प्रल्हाद पावडे आले. त्या विद्यार्थ्याला पदवीमध्ये 362 गुण होते आणि  गुणक्रम यादीत त्याचा नंबर प्रवेशासाठी पात्र नव्हता. त्याबाबतची अडचण प्रा.रामा बिऱ्हाडे यांनी बालाजी पावडेला सांगितली. पण बालाजी पावडे कोणत्याही परिस्थितीत ऍडमिशन द्या असे सांगत होता. दुपारी बारा वाजता ऍडमिशनची प्रक्रिया समाप्त झाली. सर्व प्राध्यापक व इतर मंडळी जात असताना यशवंत कॉलेजच्या मोकळ्या जागेत बालाजी पावडेने प्रा.बिऱ्हाडेला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली. मारहाणीला इतर प्राध्यापक आणि कॉलेजचे इतर कर्मचारी यांनी थांबवले त्यानंतर तेंव्हाचे प्राचार्य एन.व्ही. कल्याणकर यांना ही माहिती देण्यात आली. आपली मानसिक परिस्थिती नसल्याने प्रा.रामा बिऱ्हाडे यांनी दि.18 जुलै 2007 रोजी तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिसांनी याबाबत भारतीय दंड विधानाची कलम 353, ऍट्रासिटी कायद्याची कलमे यासह गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास तेंव्हाच्या पोलीस उपअधीक्षक सुनीता सोळुंके आणि नंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांनी केला. सन 2007 मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचे दोषारोपपत्र पोलिसांनी सन 2014 मध्ये दाखल केले. जिल्हा न्यायालयात हा खटला सुरु झाला. या खटल्यात सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले गेले. उपलब्ध पुराव्याआधारे न्यायाधीश वाघमारे यांनी बालाजी प्रल्हाद पावडे (35) यास दोषी मानले. शिक्षा देताना कलम 294 नुसार आणि ऍट्रासिटी कायद्यानुसार शिक्षा देण्यात आली त्यात तीन वर्ष सक्तमजुरी आणि 17 हजार रुपये रोख दंड ठोठावण्यात आला. या खटल्यात सुरुवातीच्या काळात सरकार पक्षाच्या वतीने ऍड.अनिल औंढेकर यांनी काम पाहिले. तसेच पुढे या खटल्याचे सादरीकरण ऍड.संजय देशमुख यांनी केले. आरोपी बालाजी पावडेच्या वतीने ऍड.प्रवीण आयाचित यांनी काम केले. दंडाच्या 17 हजार रकमेतील दहा हजार रुपये प्रा.रामा नागोबा बिऱ्हाडे यांना देण्यात यावेत, असे आदेश न्यायाधीश वाघमारे यांनी केल्याची माहिती ऍड.संजय देशमुख यांनी दिली.या प्रकरणातील शिक्षा ३ वर्षाची असल्याने न्यायालयाने  बालाजी प्रल्हाद पावडे यास आजतरी जामीन दिला आहे.आता  बालाजी प्रल्हाद पावडेला उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अपील करावे लागणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी