तिकिटाअभावी प्रवाश्याना करावा लागतो विनातिकीट प्रवास

रेल्वेप्रबंधकानी लक्ष देण्याची मागणी

हिमायतनगर (एनएनएल) मुदखेड - किनवट दरम्यान हिमायतनगर पासून ३ किमीवर असलेल्या मौजे खडकी बा. येथील रेल्वे स्थानकावर गेल्या महिन्या भरापासून रेल्वे तिकीटाची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी येथील प्रवाश्याना विनातिकीट प्रवास करून रेल्वे प्रशासनाच्या कार्यवाहीचा सामना करून आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे. तर रेल्वेचेही मोठे नुकसान होत असून, तात्काळ येथील रेल्वेस्थानकांवर तिकीट उपलब्ध करून द्यावेत. अशी मागणी ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

श्रावण मासाच्या काळात हिन्दू सण - उत्सवाची रेलचेल सुरु आहे. त्यामुळे महिला आपल्या बकुटुंबासह माहेरी येण्याची ओढ सुरु आहे. खडकी बा. येथील रेल्वे स्थानकावर पेसेंजर गाडयांना थांबा असल्याने प्रवाश्याना कमी खर्चात नांदेड, किनवट, आदिलाबाद, परळी, औरंगाबाद आदींसह अन्य गावांना प्रवास करणे सुलभतेचे आहे. त्यामुळे या गाडीला प्रवाश्यांची मोठी गर्दी असते, मात्र गेल्या महिन्याभरापासून रेल्वे विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे प्रवास करण्यासाठी जाव्या लागणाऱ्या रेल्वे स्थानकांवर  तिकीट मिळत नाही. याबाबत स्टेशन मास्तरला विचारणा केली असता तिकीट संपल्याचे सांगितले जाते. याबाबतचा अहवालही वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु अद्याप येथे तिकीट उपलब्ध झाले नसल्याने प्रवाश्याना विना तिकीट प्रवास करावा लागत आहे. येथील स्थानक हे तेलंगणा - विदर्भाच्या सीमेवर आहे, तसेच या स्थानकांवर या परिसरातील बोरी, चाथरी, विरसनी, वाघी, पिंपरी, कामारी, दिघी, टेम्भूर्णी, पावनमारी, घारापुर, सरसम बु, किरमगाव, आदींसह अन्य ५ ते ७ गावातील नागरिकांचा संपर्क या रेल्वे स्थानकांशी येतो. त्यामुळे रेल्वेच्या वेळेस प्रवाश्यांची गर्दी होऊन तिकिटाचा खपही मोठा होतो. बहुतांश प्रवाशी प्रामाणिक असून, तिकीट काढण्याची इच्छा असताना देखील केवळ तिकीट उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव विनातिकीट प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुले- बाले घेऊन प्रवास करणाऱ्या माता भगिनीं, वयोवृद्धांना प्रवासादरम्यान रेल्वे तिकीट नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या तपासणी अधिकाऱ्याच्या कार्यवाहीचा सामना करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच प्रशासनाचेही यामुळे मोठे नुकसान होत असल्याने रेल्वेचे उत्पादन घटणार आहे. हि बाब लक्षात घेता नांदेड रेल्वे डिव्हिजनचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. अखिलेशकुमार सिंह यांनी लक्ष देऊन ताबडतोब खडकी बा.रेल्वे स्थानकावर तिकीट उपलब्ध करून प्रवाश्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी सरपंच गजानन यलकदरे, उपसरपंच देविदास सूर्यवंशी, माजी सरपंच पांडुरंग गाडगे, पंजाब सूर्यवंशी, श्यामसुंदर नारखेडे, शे.मुजीब सर, दिलीप ठोंबाळे यांच्यासह गावकऱ्यातून केली जात आहे.   

तिकिटे मिळेपर्यंत प्रवाश्याची पर्यायी व्यवस्था करा - पांडुरंग गाडगे 

मागील चार- पाच वर्षांपूर्वी तिकीट संपण्याचा प्रकार खडकी बा.रेल्वे स्थानकावर झाला होता. तेंव्हा रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तिकीट उपलब्ध करून दिले. मात्र यावर्षी तिकीट संपून महिना उलटला तरीसुद्धा अजून तिकीट आले नाहीत. हिमायतनगर रेल्वे स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन  चौकशी केली असता सिकंदराबादला तिकीट छापून येतात असे त्यांनी सांगितले. मात्र तेथील प्रिंटिंग मशीन खराब झाल्याने तिकिटे छपाईचे काम लखनौ येथे पाठविल्याचे स्टेशन मास्तर यांनी सांगितले. मात्र अजूनही तिकिटे उपलब्ध झाले नसल्याने तिकिटे मिळेपर्यंत प्रवाश्याना पर्यायी व्यवस्था करून द्यायला हवी अशी मागणी येथील माजी सरपंच पांडुरंग गाडगे यांनी केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी