सत्ताधाऱ्यांच्या खोट्या आश्वासनाला वैतागून गावातील तरूणांनी रस्त्यावरील खड्डे बुजविले

हिमायतनगर (एनएनएल) भोकर - किनवट राज्य महामार्गावर असलेल्या खडकी फाटा दीपनगर ते खडकी बा. या चार किलोमीटर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. त्यांच्या आश्वासनाला वैतागलेल्या खडकीच्या वाहनधारक युवक व गावकर्यांनी गांधीगिरीच्या मार्गातून रस्त्यावरील खड्डे बुजवून नेत्यांच्या नाकर्तेपणाचा निषेध केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बा. हे गाव सरसम बु. जिल्हा परिषद गटात येणारे असून, येथील जिल्हा परिषद सदस्या सौ.ज्योतनाताई जोगेंद्र नरवाडे ह्या आहेत. हिंगोली लोकसभेचे खा.राजीव सातव, तर हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आ. नागेश पाटील असून, विरोधी गटात माजी आ. माधवराव पाटील जावळगावकरांसह, माजी खा. सुभाष वानखेडे यांच्यासह तालुक्यात विविध पक्षाचे अनेक नेते आहेत. एवढेच नवे तर गेल्या अनेक वर्षांपासून खडकी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद गट हे काँग्रेसच्या ताब्यात आहे. असे असताना आजी - माजी पुढाऱ्यासह या खंडीभर नेत्यांपैकी एकही नेत्याचे खडकी फाटा दीपनगर ते खडकी बाजार या दोन कि.मी. रस्त्याकडे लक्ष दिले नसल्याचे या गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, खड्डेमय रस्त्याने जाणे जीवघेणे ठरत आहे. परिणामी रस्त्याने ये - जा करताना वाहनाचे पाटे तुटणे, दुचाकी चालकांना मानेचे, कमरेचे, पाठीचे, स्पॉंडिलायटीज सारखे आजार जडत आहेत. एवढेच नव्हे तर रस्त्याने ये - जा करणारी दोन वाहने एका ठिकाणी आली कि रस्ता पार करणे जिकरीचे झाले आहे. यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात घडले असून, अनेक महिला - पुरुषांना आपले हात - पाय गमवावे लागले आहेत.

मागील निवडणुकीत अनेक पुढाऱ्यांनी बेंबीच्या देठापासून ओरडून आश्वासन देऊन मते लाटली. मात्र   मतदारांच्या समस्याकडे लक्ष देण्याचे सोडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपली पोळी भाजून घेणारे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह स्थानिक हुजरेगिरी करणारे नेत्यांना खडकी वासीय नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे येथील तरुनांनी अपघाताचे वाढते प्रमाण व वाहनाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गांधीगिरीचा मार्ग अवलंबून खडकी बाजार येथील बबन जाधव, तानाजी सोळंखे, गजानन ठाकरे, कलीम पठाण, वाशीम पठाण, अशोक उट्टलवाड, विनोद जाधव, पांडू नागनवाड, बालाजी जाधव, शरद हानवते, प्रविण पवार, राजू जाधव, विनोद जाधव, नितीन वछेवाड, विलास माळवदे यासह अनेक तरूणांनी व अॅटो चालकांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजविले. त्यासाठी लागणारे वाहण गावातील टॅक्टर मालक देविदास पाटील यांनी चालकासह इंधन भरून देऊन सहकार्य केले. त्यामुळे हा रस्ता खड्डेमुक्त झाला असला तरी, याकडे संबंधित राजकीय पुढार्यांनी लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. गावकऱ्यांच्या पुढाकारातून युवकांनी केलेल्या श्रमदानाच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. परंतु स्थानिक नेत्यांच्या नाकर्तेपणाबाबतही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी