'सैराट' प्रमाणे मराठवाडी बोलीत चित्रपट आवश्यक - प्रा. मिथुनचंद्र चौधरी

नांदेड (अनिल मादसवार) 'सैराट' ज्याप्रमाणे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील बोलीवर आधारलेला आहे. त्याप्रमाणे मराठवाडी बोलीत चित्रपट निर्माण करणे आवश्यक आहे. समाज, संस्कृती आणि चित्रपट अधिक प्रभावी बनवण्यासाठी संवेदनशील मने लागतात, असे मत 'सैराट'चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक तसेच पणजी येथील डॉन बास्को महाविद्यालयातील जनसंवाद विभागाचे समन्वयक
प्रा. मिथुनचंद्र चौधरी यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाने आयोजित केलेल्या सत्रारंभ व्याख्यानात मांडले.

पुढे बोलतांना चौधरी म्हणाले की, समाजात वावरत असतांना आपले डोळे, कान आणि मन जागरूक ठेऊन समाजातील प्रश्नाकडे अधिक डोळसपणे पहिले पाहिजे. चित्रपट समाजाचा आरसा असतो त्यामुळे चित्रपटातून अधिकाधिक वास्तविकता पुढे आणली पाहिजे. 'सैराट'च्या अंताविषयी बोलतांना ते म्हणाले की, आपण आजही तशाच प्रवृत्तीचे आहोत म्हणून सैराटचा शेवट तसा आहे. सैराट हा समाजाचा अनुभव आहे, एक घुसमट आहे ती नागराज मंजुळे यांनी त्यातून दाखवली आहे. आपण कोणत्याही गोष्टीचे कौतुकच केले पाहिजे असे नाही. तर कठोर समीक्षाही केली पाहिजे. तसेच आवाज नसलेल्या लोकांचा आवाज झाला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी स्वतःचे अनुभव सांगताना म्हणाले की, 'बलुतं' वाचल्यानंतर मला समाजातील विषमता अधिक प्रखरपणे जाणवू लागली त्यामुळे मी समाजाकडे डोळसपणे पहायला शिकलो. यावेळी त्यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांनी लघुपट, चित्रपट या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी दिलखुलास संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर हे होते. अध्यक्षीय समारोपात बोलतांना डॉ विद्यासागर म्हणाले की, माध्यमामध्ये भाषेचे उपयोजन अधिक प्रमाणात झाले पाहिजे. त्यासाठी योग्य व चपखल शब्दांची आवश्यकता असते. शब्दांचे योग्य ठिकाणी उपयोजन करून भाषेची गोडी वाढू शकते. तसेच लोकांनी भाषेच्या न्यूनगंडातून बाहेर पडले पाहिजे. 

प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन डॉ पृथ्वीराज तौर यांनी, तर आभार डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी मानले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. सुहास पाठक, डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. नीना गोगटे, डॉ. अनंत राऊत, डॉ. आदिनाथ इंगोले आदींसह विद्यापीठ परिसरातील तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. ५  



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी