नांदेडच्या विकासाला गवसणी घालण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करु - पालकमंत्री खोतकर

महाराष्ट्र दिन ध्वजवंदनाचा शानदार समारंभ संपन्न 

नांदेड, अनिल मादसवार.......  
नांदेडच्या विकासाच्या अमर्याद संधीना गवसणी घालण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करू या, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते झाले, ध्वज वंदनानंतर ते संदेशपर भाषणात बोलत होते.

पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शानदार संचलन आणि उत्साहात समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार-जवळगावकर, नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौर सौ. शैलजा स्वामी, आमदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव,  विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी, आदींचा समावेश  होता.

आपल्या शुभेच्छापर संदेशात पालकमंत्री खोतकर म्हणाले की, पावसाने दिलेली साथ आणि जलयुक्त शिवार अभियानासारख्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे जिल्ह्यात चांगले पाणीसाठे निर्माण करता आले आहेत. जलयुक्त शिवार अभियान हे लोकचळवळीमुळे यशस्वी झाले. त्यात नांदेड जिल्हावासियांनी दिलेले योगदान निश्चितच गौरवास्पद आहे. आगामी खरीप हंगामात 7 लाख 72 हजार 575 हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत आहे. त्यासाठी बियाणे, खते पुरेशी उपलब्ध व्हावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. पीक पद्धतीत सुनियोजित बदलाबाबतही आता शेतकरी बांधवांनी जागरूक रहावे लागेल. यातूनच शेतीपूरक उद्योग आणि शेतीला पशूपालन व्यवसायाचीही जोड मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठीही प्रयत्न सुरु आहे. त्याअंतर्गतच सुरु असलेल्या ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहिमेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. विष्णुपूरी प्रकल्पाचे थकीत चाळीस कोटींचे वीज बील माफ करून सिंचनासाठी पाण्याच्या दोन पाळ्या देण्यात आल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

पालकमंत्री खोतकर यांनी जिल्ह्यातील विविध उपक्रमांचा गौरवाने उल्लेख केला. त्यामध्ये कॅशलेस व्यवहारासाठीचा डिजीधन मेळावा, पुरवठा विभागाची पीडीएमएमएस प्रणाली, उज्ज्वल नांदेड उपक्रम तसेच शहर सौंदर्यीकरणासाठीच्या आमदार हेमंत पाटील यांच्या बोलक्या भितींच्या उपक्रमाचा तसेच नांदेडहून सुरु झालेल्या पुर्ववत विमान सेवा यांचा समावेश होता.  ते म्हणाले की, शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रस्त्यांचे सदृढ जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत पश्चिम नांदेडमध्ये रेल्वे ओव्हरब्रीजचा प्रकल्प महत्त्वपुर्ण ठरेल. नांदेड जिल्ह्यात कृषी, औद्योगीक, पर्यटन अशा अनेकविध क्षेत्रात विकासाच्या अमर्याद संधी आहेत. त्यांना गवसणी घालण्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार अभियानातील जिल्ह्यातील कामांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील दानशूर घटकांनी पुढे यावे , असे आवाहनही श्री. खोतकर यांनी यावेळी केले.



समारंभात सुरवातीला पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले, तसेच राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री खोतकर यांनी संचलन पथकांचे निरीक्षणही केले. परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील आणि सेकंड परेड कमांडर पोलीस उपनिरीक्षक शामराव राठोड यांच्या नेतृत्वात सशस्त्र पोलीस पथकाच्या तीन प्लाटूनसह, महिला पोलीसांचे पथक, जलद कृती दल, शहर वाहतूक शाखा, गृहरक्षक दलाच्या पुरूष व महिलांचे पथक, अग्नीशमन दल, पोलीस वाद्यवृंद, श्वान पथक, बॅाम्ब शोधक व नाशक पथक, मार्क्स मॅन, वज्र वाहन, अग्नीशमन दल, बुलेट रायडर संचलनात सहभागी झाले. पालकमंत्री खोतकर यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांच्याशीही संवाद साधला, तसेच त्यांची आस्थेवाईक विचारपूस करून, त्यांना शुभेच्छाही दिल्या. व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन केले.

पोलीस कवायत मैदान, क्रीडा संकुलाचे नामकरण संपन्न

---------------------------
ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय समारंभानंतर पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते नवीन पोलीस कवायत मैदानाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदान असे नामकरण करण्यात आले. या नामकरणाच्या कोनशीलेचे अनावरण पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर याच प्रांगणातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच्या इंद्रधनु पोलीस क्लबचेही उद्घाटन करण्यात आले. जुन्या पोलीस कवायत मैदानाचे श्री गुरु गोबिंदसिंघजी क्रीडा संकुल असे नामकरण करण्यात आले आहे. त्या कोनशीलेचही पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी वाहतूक पोलीसांसाठीच्या तीन अद्ययावत मोटारी तसेच दोन व्हॅन्सचे उद्घाटनही पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. ‍जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे यांनी या सर्व उपक्रमांबाबत प्रास्ताविक केले.

ध्वजवंदन समारंभात विविध पुरस्कार, पारितोषिकांचे वितरण

--------------------
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झाले. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर झालेल्या या समारंभात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील घटकांना पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते पुरस्कार, पारितोषीके प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, क्रीडाक्षेत्र, ग्रामविकास क्षेत्रातील विविध ग्रामपंचायती, तसेच युवा पुरस्कारांचा समावेश होता.

या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार-जवळगावकर, नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौर सौ. शैलजा स्वामी, आमदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी, आदींचा समावेश  होता.

पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे आणि पारितोषिकांचेही वितरण झाले. हे पुरस्कार पुढीलप्रमाणे – आदर्श तलाठी पुरस्कार – बी. डी. कुराडे- पिंपळगाव महादेव, ता. अर्थापूर. पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र – अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, पोलीस उपअधीक्षक विश्र्वेशर नांदेडकर, पोलीस निरीक्षक माणिक बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट भारती, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तरोडेकर, विठ्ठल जाधव, चालक पोलीस हवालदार रमाकांत शिंदे, पोलीस हवालदार गोविंद जाधव, पोलीस नाईक देविकांत देशमुख, दत्तराव जाधव, सुभाष आलोने. यावेळी जिल्हा परिषदेच्या स्मार्ट ग्राम अंतर्गत स्मार्ट ग्रामपंचायतींना पुरस्कारांचेचे वितरण झाले. संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदींनी हे पुरस्कार स्विकारले.  त्यामध्ये समावेश असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे- ग्रामपंचायत झरी (ता. लोहा), ग्रामपंचायत चिंचोली (ता. कंधार), ग्रामपंचायत हिब्बट (मुखेड), नागराळा (देगलूर), शेळगाव गौरी (नायगाव), खतगाव (बिलोली), बामणी थडी (धर्माबाद), गोरठा (उमरी), नागेली (मुदखेड), लहान (अर्धापूर), कोटतीर्थ (नांदेड), टेंभुर्णी (हिमायतनगर), निचपूर (किनवट), लांजी (माहूर), आष्टी (हदगाव).उत्कृष्ट खेळाडू- पारस गंगालाल यादव (जलतरण), रम्शा कलिमोद्यीन फारुखी (बॅडमींटन), कलिमोद्यीन फारुखी (बॅडमींटन). गुणवंत क्रीडा संघटक- प्रा. डॉ. बळीराम लाड. राज्य पोलीस शुटींग स्पर्धेतील दोन सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य पदक विजेते पोलीस कॉ. शंकर भारती. जिल्हा  युवा पुरस्कार- शिवशंकर मुळे, जिल्हा युवा पुरस्कार संस्था- कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा कुंचेली ता. नायगाव. या सर्व पुरस्कार व पारितोषीक विजेत्यांना पालकमंत्री खोतकर यांनी प्रमाणपत्र, स्मृतीचिन्हा तसेच रोख स्वरुपातील पारितोषीके प्रदान करुन शुभेच्छाही दिल्या.

भूमी अभिलेख कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

---------------------
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील नूतन इमारतीचे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार-जवळगावकर, आमदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. शेलार, कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत, तहसिलदार किरण अंबेकर आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते फीत कापून तसेच दिप प्रज्वलाने उद्घाटन संपन्न झाले. पालकमंत्री खोतकर यांनी इमारतीतील विविध शाखांची पाहणी केली. नागरिकांच्या सुविधेसाठी अद्ययावत इमारत उपलब्ध झाल्याबाबत व त्यातील सोयी-सुविधांबाबत समाधानही व्यक्त केले. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. व्ही. एस. निकम यांनी यावेळी स्वागत केले व आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी