मेल्यावर स्वर्गाची अपेक्षा करण्यापेक्षा स्वच्छतेतून गावाला स्वर्ग बनवा - मिलिंद व्‍यवहारे



संत गाडगेबाबा स्‍वच्‍छता पालखीतुन हिमायतनगरात प्रबोधन 


नांदेड(अनिल मादसवार)निसर्गाने मानव जातीला सर्वकाही भरभरून दिले आहे. त्यामध्ये स्वच्छ हवा, पाणी, अन्न, फुले, फळे, आदींचा समावेश आहे. परंतु आपण आपल्या बेजबाबदार कृतीमधून निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा नाश करीत आहोत. मेल्यावर स्वर्ग मिळावा अशी अपेक्षा आपण सर्व करीत असतो. परंतु मेल्यानंतर स्वर्ग मिळण्याची अपेक्षा करण्यापेक्षा संत गाडगेबाबांनी दिलेल्या स्वच्छतेच्या प्रेरणेला महत्व द्यावे
आणि सामाजिक बांधिलकीची जान ठेवून आपल्या गावातच स्वर्ग निर्माण करावे असे आवाहन जिल्‍हा कार्यक्रम समन्‍वयक तथा जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे यांनी केले. 


ते दि.05 रोजी हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु, सोनारी, सरसम बु. इंदिरानगर, हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात उपस्थितांना प्रबोधन करताना बोलत होते. याप्रसंगी वरील गावातील ग्रामस्‍थांनी संत गाडगे बाबांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत जी.प.चे समाजशास्‍त्रज्ञ महेंद्र वाठोरे यांची उपस्थिती होती. राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे महाराज मिशनच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा स्वच्छता स्मृती पालखी रथाचे हिमायतनगर तालुक्यात आगमन होताच पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव यांच्या हस्ते संत गाडगे महाराज याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी विलास गंगावणे, विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर, साईनाथ चिंतावार यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी प्रबोधन करताना व्यवहारे म्हणाले कि, स्वच्छता अभियानचे खरे मानकरी संत गाडगेबाबा असून, महाराष्‍ट्र शासनाने 1950 रोजी स्‍वच्‍छतेच्‍या प्रचार प्रसिध्‍दीसाठी वाहन उपलब्‍ध करुन दिले होते. आज हिमायतनगर येथे दाखल झालेल्या याच वाहनातून संत गाडगेबाबा यांनी राज्‍यतील गावो - गावी जावून प्रबोधन केले होते. त्यांनी स्वच्छतेच्या प्रसार आणि प्रचारासाठी वापरलेले वाहन स्‍मृती वाहन म्‍हणून पालखीव्‍दारे महाराष्ट्र राज्‍यातील गावा - गावात प्रबोधन केले जात आहे. आपल्याला मिळालेला मानव जन्म हा सर्वश्रेष्ठ असून, निसर्गाने दिलेल्या सुख - सुविधांचा उपभोग आपल्याला घ्यावयाचा आहे. परंतु त्यासाठी आपले आरोग्य हे निरामय असणे आवश्यक आहे. यासाठी एसी मतभेद बाजूला ठेवून एक गाव - एक परिवार हि संकल्पना आचरणात आणून सांडपाणी व्यवस्थापन, घरोघरी शौचालय बांधकाम व वापर, स्वच्छ शाळा, अंगणवाडी, गाव परिसर आणि आपले घर स्वच्छ सुंदर व प्रदूषण मुक्त बनवून आमलात आणावे. जेणे करून मानवतेचा संदेश देणारे समाजसुधारक संत गाडगेबाबा यांनी दिलेल्या प्रेरणेचे सार्थक करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भोकर, हिमायतनगर, किनवट तालुक्यातील संबंधित गावातील प्रमुख, महिला मंडळ, नागरिक व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 


संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छतेचा रथ मुबई येथून मा. पंकजाताई मुंडे यांनी उदघाटन करून सुपूर्त केले असुन 22 जिल्ह्यातुन स्वच्छतेचा हा रथ चालत आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर, हिमायतनगर तालुक्यात स्वच्छतेच प्रबोधन करून हा रथ किनवटकडे रवाना झाला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी