जनतेच्या विकासाचा पैसा वापरणाऱ्या कोमवाडची पोलीस कोठडी वाढली

कोमवाडची पोलीस कोठडी तीन दिवसांसाठी वाढली
नांदेड(प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी याने त्वरित करोडपती होण्याच्या नादात जिल्हा परिषदेतील जनतेच्या विकासाचा पैसा वापरल्याची नविन माहिती पोलीस दलाने आज मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर करुन उत्तम आनंदा कोमवाड याची मागितलेली वाढीव पोलीस कोठडी न्यायाधीश एस. एन. सचदेव यांनी तीन दिवसासाठी मंजूर केली आहे.

प्रारंभिक तक्रारीनुसार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामविकास उत्तम आनंदा कोमवाड यांनी १ कोटी १८ लाख ८२ हजार रुपये जे जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्यात उपलब्ध होते त्या निधीच्या आधारावर हा निधी विकास शर्मा आणि प्रियंका शर्मा यांच्या नावावर वेगवेगळ्या दिवशी हस्तांतरीत केला. आरटीजीएस माध्यमाने वर्ग केलेला हा पैसा त्वरित प्रभावाने त्या खात्यात जात असतो. २१ जून २०१६ रोजी ग्रामविकास खात्यात १ कोटी ३३ लाख ६८ हजार १४९ रुपये जमा होते. त्यातील १ कोटी १८ लाख ८२ हजार रुपये उत्तम कोमवाडने प्रियंका आणि विकास शर्मा यांच्या  नावावर हस्तांतरीत केले. 

या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शांताराम काळभोर यांच्या तक्रारीवरुन ६ ऑगस्ट रोजी हा गुन्हा दाखल झाला. कोमवाडने हे पैसे २२ जून ते १९ जुलै या दरम्यान इतरांच्या खात्यात वर्ग केले होते. ग्रामपंचायतीच्या विकासासाठी व उत्पादक स्वरुपाच्या कामासाठी जमा असलेला हा निधी उत्तम कोमवाडने एका ब्रिटीनमधील नागरिकाशी मॅसेंजरवर झालेल्या संवादातून वर्ग केला, अशी नविन कथा पोलिसांनी आणली. त्यानुसार जॉनने एका जंगली बियाण्यांपासून लस तयार होते आणि ते त्याच कारखान्यात काम करतात विशेष म्हणजे ते जंगली बियाणे भारतातील कर्नाटक व केरळ या राज्याच्या जंगलात मिळते. त्या बियाचे नाव कॉबीडो असे आहे. भारतातील प्रियंका शर्मा व विकास शर्मा हे त्या बियाण्यांचा व्यवसाय करतात त्यांना पूर्ण माहिती आहे. जसे तुम्हीत्यांना पैसे देताल तसे ते तुम्हाला बियाणे देतील. त्या आधारावर उत्तम कोमवाड या उच्चशिक्षित व वर्ग १ च्या अधिकाऱ्याने ५० ग्रॅमच्या पाकीटाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १ लाख ६० हजार दर पाकीटाला आहे या आमिषाला बळी पडून १ कोटी १८ लाख ८३ हजार रुपये या प्रियंका शर्मा आणि विकास शर्माच्या खात्यावर जमा केले. आणि त्यामुळेच जिल्हा परिषदेमधला आरटीजीएस घोटाळा घडला आहे. थोड्या दिवसांमध्ये त्वरित करोडपती होण्याच्या नादात उत्तम कोमवाडने जनतेचा  पैसा जंगली बियाण्यात वापरला. आणि स्वतः करोडपती होण्याचा मार्ग शोधला. मुळात सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी असणारा हा पैसा बायजीचा माल समजून कोमवाडने वापरला.

याबाबत न्यायालयात सादरीकरण करताना सरकारी वकील ऍड. रमेश लोखंडे यांनी आरोपी उत्तम कोमवाडला घेवून दिल्लीला जाणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि त्यासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. आरोपी उत्तम कोमवाडचे वकील ऍड.उमेश मेगदे यांनी दिलेले पैसे हे बॅंक खात्यात जमा आहेत आणि त्या माणसांना पकडण्यासाठी माझ्या आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. युक्तीवाद ऐकून मुख्यन्यायदंडाधिकारी एस.एन. सचदेव यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कोमवाडला तीन दिवस म्हणजेच १३ ऑगस्ट २०१६ पर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी