खून प्रकरणातील आरोपीने बोलावली पत्रकार परिषद; पोलिसांनी आपले आगमन दाखवताच ठोकली धूम

नांदेड(खास प्रतिनिधी)फेब्रुवारी महिन्यात बाफना टी पॉइंटवर झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपी दोन माळी बंधूंना पकडण्यासाठी पोलिसांनी आज लावलेल्या फिल्डींगमध्ये ते अडकले नाहीत. आरोपीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत मोठ्या सन्मानाने उपस्थित राहिलेले पत्रकार मात्र आपल्या नांग्या टाकून परत फिरले. असा हा प्रकार बुधवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडला.

नांदेड शहराच्या बाफना टी पॉइंटवर दि.21 फेब्रुवारी 2016 रोजी सतेंद्रसिंघ संधू नावाच्या 30 वर्षीय युवकाचा खून झाला. त्या खून प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली. याच प्रकरणात रोशनसिंघ बाबुसिंघ माळी आणि त्याचा लहान भाऊ अजितसिंघ बाबुसिंघ माळी या दोघांचे आरोपी म्हणून नाव होते. या खुन प्रकरणाचे दोषारोपपत्र कायद्याच्या प्रक्रियेनुसार 90 दिवसात दाखल झाले. दोषारोपपत्र दाखल करताना तीन अटक आरोपी आणि तीन फरार आरोपी ज्यात दोन माळी बंधूंचे नावे आहे, असे ते सहा लोकांविरुध्द दोषारोप दाखल झाले. 19 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मित्रनगर भागात 21 फेब्रुवारी 2016 च्या दिवशी खून झालेला सतेंद्रसिंघचा भाऊ हरजिंदरसिंघ उर्फ रिंदा संधू याने माळी बंधूंचा सर्वात लहान भाऊ बच्चितरसिंघ बाबुसिंघ माळी याचा खून केला. त्यानंतर 36 तासात याच रिंदाने अटक असलेल्या तीन आरोपींचा जिवलग मित्र अवतारसिंघ उर्फ मन्नू गाडीवाले याचा यात्रीनिवास येथे एका कार्यक्रमात रात्री 11 वाजता खून केला.

यानंतर पोलिसांनी 21 फेब्रुवारी 2016 च्या खुन प्रकरणातील आरोपी रोशनसिंघ आणि अजितसिंघ यांच्या घरासमोर पोलिसांचा पहारा लावला. सर्वसाधारणपणे अशा प्रकारे 25 पोलिसांचा पहारा कोठे असेल त्यावर देखरेख करण्यासाठी पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी असणे आवश्यक आहे पण असा कुणीच अधिकार तेथे हजर नव्हता. आज दुपारी दिड वाजेच्या सुमारापासून पोलिसांच्या गाड्यांचा ताफा माळी कुटुंबाच्या घरासमोर वाढत गेला. पोलीस निरीक्षक राजू तासीलदार, सतीश गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि असंख्य पोलीस कर्मचारी माळी कुटुंबियांच्या घरात जाण्याचा प्रयत्न करीत होते. तेंव्हा माळी कुटुंबातील महिलांनी पोलिसांना घरात येण्यापासून मज्जाव केला. त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी महिला पोलिसांची एक मोठी फौज बोलावली. आणि नंतर घरात प्रवेश केला. पण या दरम्यान अजितसिंघ आणि रोशनसिंघ हे दोन्ही भाऊ त्यांच्या घरामागे असलेल्या नाल्याच्या रस्त्यातून निघून गेले होते.

दरम्यान आज पळून गेलेला आरोपी रोशनसिंघ याने आज सकाळी पत्रकार परिषदेचे निमंत्रण पाठविले. आपला बंधू मयत बच्चितरसिंघ माळी याच्या खून प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावर रोशनसिंघ माळीच्या नावासमोर डॉक्टर लावलेले आहे. वेळ दुपारी दोन वाजताची निश्र्चित होती. काही  हौशी पत्रकार या पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रोशनसिंघ माळीने बोलविलेल्या ठिकाणी गेले पण त्याअगोदरच तेथे पोलिसांचा भला मोठा ताफा पाहून रोशनसिंघ माळी कोठे आहेत हे विचारण्याची हिंमत पत्रकारांमध्ये शिल्लकच राहिली नाही. बच्चितरसिंघ माळीच्या खुनाच्या दिवशी तेथे केलेल्या एका पत्रकारावर जिवघेणा हल्ला आणि इतर पत्रकारांना अर्वाच्च शिवीगाळ करणाऱ्या माळी कुटुंबियांच्या पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांनी आपला जीव ओतावा याचे आश्र्चर्य व्यक्त होत आहे. एकूणच पोलिसांनी आज दोन माळी बंधूंना पकडण्यासाठी मोठी जबर फिल्डींग लावली होती पण पोलिसांना यश आले नाही आणि माळी कुटुंबियांनी बोलाविलेली पत्रकार परिषद आपसुकच संपुष्टात आली. पुन्हा एकदा मागील दोन दिवस बंद असलेला एक विषय नांदेडकरांच्या चर्चेसाठी पुन्हा सुरु झाला आहे.




Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी