स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाभार्थ्यांची लूट...जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरातील काही स्वस्त धान्य दुकानदाराकडून गोर - गरीब लाभार्थ्यांची लूट केली जात असून, शासन दरापेक्षा जादा रक्कम आकारली जात असल्याची ओरड रेशकार्डधारकातून केली जात आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन पुरवठा विभाग व लाभार्थ्यांची लूट करणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून मुसक्या आवळाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

हिमायतनगर तालुक्यात ५२ ग्रामपंचायती असून, या सर्व गाव, वाडी, तांड्यात राहणाऱ्या लाभार्थ्यांना शासनच्या अन्न सुरक्षा, शेतकरी, अंत्योदय योजनेतून गहू - ३ रुपये किलो, तांदूळ २ रुपये किलो, साखर १३.५० किलो या रास्त भावात वितरीत करण्यासाठी ७३ दुकानदारांना परवाने देण्यात आलेले आहेत. प्रती महिना शहर व ग्रामीण भागातील रेशन कार्डधारकांना लागणाऱ्या धान्याचे मंजूर नियतन व दुकानदारांनी मागणी केल्यानुसार चालान भरल्यानंतर धान्य पुरवठा करण्याचे काम पुरवठा विभागाचे आहे. पुरवठा विभागाचा कारभार पारदर्शक चालवा यासाठी विद्यमान तहसीलदार व संबंधित नायब तहसीलदार यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी खुद्ध अनेकदा कार्यालयात येत नसल्यामुळे पुरवठा विभागाच्या कारभारावर त्यांची वचक राहिलेली नाही. त्यामुळे ऐन दुष्काळी परीस्थित धान्य व केरोसीन वितरण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होताना दिसून येत आहे. याचा नाहक फटका सर्वसामान्य गोर- गरीब रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. याचे उदाहरण दार महिन्या पंधरा दिवसाला समोर येत असताना देखील पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी जनतेच्या समस्यांकडे कानाडोळा करून स्वतःची तुंबडी भरण्यात धन्यता मानत असल्याने धान्य वितरक निर्ढावले असल्याचा अनुभव लाभार्थ्यांना येत आहे.

असाच काहींशी अनुभव गेल्या काही महिन्यापासून शहरातील रेशनधारक लाभार्थ्यांना येत असून, तालुक्यात गोरगरीब रेशन धारकांना रेशन वितरण करताना दुकानदाराकडून जादा रक्कम आकारली जात असल्याचा तक्रारीचा मेसेज सध्या व्हाटस अपवरून व्हायरल झाला आहे. शहरातील राजकीय वरद हसत असलेल्या काही रेशन दुकानदारांनी शासकीय दरानुसार पावती देऊन त्याच पावतीच्या मागून 20 ते 30 रुपये जादा दर आकारून लाभार्थ्यांची लूट सुरु केली आहे. असे प्रत्येक रेशन कार्ड धारकांसोबत घडत असल्याने गोर - गरीब लाभार्थ्यांची एक प्रकारे पिळवणूक केली जात आहे. जादा रक्कम कश्याची विचारणा केल्यास हमालीचे आहे..असे सांगून रेशन घ्याचे तर घ्या अन्यथा घेऊ नका आशिया शब्दात बोलून लाभार्थ्यांना अपमानित करीत आहेत. हा प्रकार एकापुरता नसून शहरातील अनेक दुकानदार असत कित्ता गिरवीत असून, रेशन वितरण प्रणालीत हमालीच्या नावाखाली लूट करणाऱ्या शहरातील स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करवून त्याचे परवाने निलंबित करून बचत गटाकडे कारभार सोपवावा अशी मागणी केली जात आहे.  

नवीन राशन कार्ड वाटपात सावळा गोंधळ 

हिमायतनगर येथील तहसील पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्याच्या मनमानी कारभारामुळे नवीन रेशन कार्ड धारकांना अडचणीचा सामना करत आर्थिक फटका सोसावा लागत आहे. शासनाने नवीन लाभार्थ्याना तात्काळ कार्डचे वितरण करून धान्य पुरवठा करण्याचे आदेशित केलेले असताना रेशन तर सोडाच शिधापत्रिका देण्यातही टाळाटाळ चालविली जात आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे केवळ ३० ते ४० रुपये फीस असताना देखील रेशन कार्डसाठी चक्क ५०० रुपये मोजावे लागत असल्याचे लाभार्थी सांगत आहेत. पैसे न दिल्यास रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाच्या चपला झिजवाव्या लागत असून, हा सर्व प्रकार पुरवठा विभागाचे अधिकारी - कर्मचारी व काही दलालामार्फत करून लुट करत असल्याने पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ आता चव्हाट्यावर येत आहे. या प्रकाराकडे जिल्हाधीकारी सुरेश काकांनी, जळ पुरवठा अधिकारी व तालुक्याच्या विद्यमान आमदार महोदयांनी लक्ष देऊन पुरवठा विभागातील मनमानी कारभाराच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणीही केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी