विद्यार्थी गणवेशापासून वंचित

अजूनही जिल्हा परिषदेचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित
नांदेड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील जवळपास तीन हजारांच्या जवळ विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाले नसल्याने केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केली आहे.

शनिवारी दि.२ रोजी  शिक्षण व आरोग्य समितीची मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला १२ सदस्यांपैकी ११ सदस्य उपस्थित होते. यावेळी मालेगाव येथील मुख्याध्यापक एच.एस. कार्ले यांच्या निलंबनावरून नागोराव इंगोले यांनी प्रश्न उपस्थित केला असता सौ. जयश्री पावडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये बळवंतराव पाटील बेटमोगरेकर आणि उपशिक्षणाधिकारी शिवाजी खोडे यांचा समावेश आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सभापती बेळगे यांनी दिले. याच बरोबर आरोग्य विषयाच्या बाबतीत सध्या पावसाळा सुरू असून साथीचे रोग उद्‌भवू नयेत म्हणून आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

जिल्ह्यात जि.प. शाळेअंतर्गत १ लाख ६४ हजार ८०३ विद्यार्थी शिक्षण घेतात. शासनाच्या मोफत शिक्षण कायद्यांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकणाऱ्या मुलींना व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येतो. यातील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाले नाहीत. याचे नेमके काय कारण असा प्रश्न उपस्थित करून तत्काळ केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी बैठकीत दिल्या आहेत. 

केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांवर कारवाई व्हावी - सभापती बेळगे

जि.प.च्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील असतात. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी शेतकऱ्यांचे असून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पुस्तके शासनाकडून उपलब्ध करून दिली असतानाही मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांच्या निष्काळजीपणामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित रहावे लागत आहे. केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षण सभापती बेळगे यांनी दिली. 

विद्यार्थ्यांची निदर्शने
मुख्याध्यापक निलंबित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण सभापती यांच्या दालनासमोर निदर्शने करून निलंबनाची कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी सभापतींच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.

विद्यार्थी संख्या वाढल्याने गणवेश अपुरे- शिक्षणाधिकारी सोनटक्के
गणवेश खरेदी करीत असताना विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन खरेदी केली जाते. पण पहिलीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पहिलीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोजली जाते. पण यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक झाली आहे. कारण सध्या जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या प्रमाणात डिजिटल करण्यात आल्याने याचा फायदा झाला आहे. यामुळे गणवेश अपुरे पडले असले तरी विद्यार्थ्यांना लवकरच देण्यात येतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी