पैनगंगेला महापूर...

नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्यात... 
विदर्भ - मराठवाड्याचा एक संपर्क तुटला तर दुसरा बंदच्या मार्गावर

     
हिमायतनगर (अनिल मादसवार) चार दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेला महापूर आला असून, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. तर गांजेगाव पुलावरून ५ ते ६ फुट पाणी वाहत असल्याने विदर्भ - मराठवाड्याचा संपर्क दोन दिवसापासून तुटला आहे. तर हिमायतनगर - उमरखेड मार्गावरील बोरी पुलाखालून पाणी जात असल्याने हा मार्ग सुद्धा बंद होण्याची शक्यता बळावली आहे.  

पाण्याचा प्रवाह असाच वाढत राहिला तर नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदी काठावरील घारापुर, कामारी - डोल्हारी, कोठा, एकंबा, सिरपल्ली, बोरगडी, धानोरा ज, यासह विदर्भातील गावाला पुराचा धोका होण्याची शक्यता आहे. महापुराचा फटका नदी, नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टर शेतीला बसला असून, पाण्याची पातळी तास - तासाने वाढत असल्याने अन्य काही गावाला पुराचा संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळपासून पाऊस थांबला असला तरी पाण्याचा प्रवाह चालूच असून, ढगाळ वातावरण असल्यामुळे पुन्हा पाऊस होण्याचीच शक्यता वर्तविली जात आहे. वृत्त लिहीपर्यंत तालुक्यात कोणतीही वित्त अथवा जीवित हानी झाली नाही. परंतु पैनगंगेला आलेल्या पुराची स्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांनी नदी काठावरील गावकर्यांना तहसीलदारच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा दिला असून, स्थानिक तहसील गजानन शिंदे, मंडळ अधिकारी राठोड यांच्यासह सर्व तलाठी बांधवाना स्थानिकला तळ ठोकून राहावे असे आदेशित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

वरील ठिकाणी पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने शेतकरी व नागरिकांचा जीव टांगणीला आला आहे. वरिष्ठांच्या सूचनेनंतर महसूल विभागाचे पथक अद्याप कार्यरत झाले नसल्यामुळे नदीकाठावरील गावकर्यांची चिंता वाढली असून, सन २००६ साली अश्याच महापुराने तालुक्यातील कामारी, घारापुर, डोल्हारी, पळसपूर, सिरपल्ली, एकंबा, कोठा तांडा, कोठा ज, बोरगडी तांडा नंबर - ०१ व तांडा नंबर - ०२, विरसनी, दिघी, यासह अन्य गावातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तर अनेक गावातील नागरिकांना स्थलांतरित करून, अन्न व निवार्याची सोय प्रशासनातर्फे करण्यात आली होती. तीच परिस्थिती 2016 साली पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत आहे. 

याबाबत तहसीलदार गजानन शिंदे यांच्याशी संपर्क साधून पुरस्थितीबाबत यंत्राना सक्रिय आहे काय..? असे विचारले असता नाही नाही...काहीच नाही, अजून काहीच नाही... पुराचा धोकाच नाही, पाऊस नाही... वरून पाणी येणार नाही, त्याच्यामुळे घाबरायचे काही कारण नाही असे म्हणून फोन बंद केला. यावरून येथील तहसीलदार महाशयांना नदीकाठावरील नागरिकांच्या सुरक्षेबाबत काहीच देणे घेणे नाही असे स्पष्ट दिसून येत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी