चोरट्यास नागरिकांनी पकडले

घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास नागरिकांनी पकडले.... केले पोलिसांच्या स्वाधीन 

हिमायतनगर(प्रतिनिधी)गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील नागरिकांची झोप उडविणाऱ्या चोरट्यांच्या टोळीपैकी एकाला शहरातील युवक व नागरिकांनी दोन तासाच्या मेहनतीने पकडले. दरम्यान पळून जाण्यास अपयशी झालेल्या चोरट्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याचे अन्य साथीदार ऑटोसह पळून जाण्यात यशस्वी झाले. जखमी चोरट्यास रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले असल्याने अद्याप तरी त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

हिमायतनगर शहरात गेल्या सहा महिन्यापासून गाढ झोपेतील महिलांचे मनी मंगळसूत्र, कुलूप बंद घरफोडी करून सोने- चांदी सह रक्कम लंपास करणे, आणि गाढ झोपेतील नागरिकांच्या घरात घुसून चोरी करणे या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच नागरिक हैराण झाले असून, यास पोलिसांचा नाकर्तेपणा जबादार असल्याचा आरोप केला जात आहे. तर पोलिसावर विसंबून न राहता चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता नागरिकांनी सतर्कता बाळगली आहे. असाच काहींसा प्रकार दि.०५ जून च्या मध्यरात्री १२ ते ३ वाजेच्या दरम्यान घडला. रुख्मिणी नगर कोर्नर वर असलेल्या वार्ड क्रमांक ११ च्या नगरसेविका सौ.अनुसयाताई डाके यांच्या घराच्या तिसर्या मजल्याच्या माठीमागून चोरटा घरात शिरला. सर्व जन गाढ झोपेत असल्याचे पाहून दुसर्या मजल्यावरील घरात प्रवेश करण्यासाठी काळे वस्त्र परिधान केलेला चोरटा पायरयाद्वारे घरात उतरत होता. दरम्यान नगरसेविकेचे पतीराज हे लघुशंकेसाठी बाथरुमला जाउन बाहेर आले असता चोरटा व त्यांची नजर एकमेकाला भिडली. आता आपली काही खैर नाही हे जाणून चोरट्याने थेट दुसर्या मजल्यावरून मुख्य रस्त्यावरील सिमेंट रोडवर सिनेस्टाईलने रोडवर उडी मारली. यात तो चोरट्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली, तरीदेखील न थांबता त्याने धूम ठोकली. आरडा ओरडा होताच रुख्मिणी नगर व आजूबाजूच्या परिसरातील युवक न नागरिक जमा झाले. वादळी वार्याने संपूर्ण शहर अंधारात असल्याने चोरट्यास शोधणे कठीण होते. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून चोरट्याच्या हैदोसाने त्रस्त झालेल्या सर्वच नागरिकांनी संपूर्ण परिसर हाती बैटर्या घेऊन शोध घेतला. दोन - अडीच तासाच्या प्रयत्नानंतरही चोरट्याचा काहीच शोध लागला नाही. 

त्यानंतर चोरटा पसार झाल्याचे समजून सर्व जन झोपण्यासाठी गेले. त्यानुसार श्री डाके हे सुद्धा विद्दुत पुरवठा गुल झालेला असल्याने सहपरिवार तिसर्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. त्यावेळी गच्चीवरून कोणीतरी अज्ञात युवक खाली बसून मोबाईलवर मला मार लागला न्यायला लवकर ऑटो घेऊन या असे बोलत असल्याचे ऐकू आले. त्या दिशेने पहिले असता अंधारात मोबाईलची बैटरी चमकत असल्याने त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना व काही युवकांना दूरध्वनीवरून बोलाविले. यावेळी त्यास नेण्यासाठी समोरून एक ऑटो व काहीजण येत होते. परंतु  नागरीकांच घोळका पाहून ऑटोतील अन्य चोरटे साथीदार पसार झाले. मात्र जखमी झालेल्या त्या चोरट्या युवकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी काहींनी तर पोलिसांना नाकर्ते पनाबाबत खडे बोल सुनावल्याने पोलिसांचीही बोलती बंद झाली होती. सदर चोरट्याची पोलिसांनी कसून चौकशी करून हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस आणाव्यात. आणि त्याच्या सोबतच्या अन्य साथीदाराला पकडून नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी पोलिस स्थानकात जमून केली. घटनेबाबत नागरिकांची तक्रार देऊन मध्यरात्री ४ वाजता माघारी फिरले. सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुरेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत. 

पोलिसांचा नाकर्तेपणा उघड 
----------------------
या घटनेनंतर काहींनी पोलिसांना पाचारण केले पोलिसाची गाडी सूचना देऊनही अर्धा तास उशिराने आली. त्यावेळी प्रथम पोलिस गाडी सायरन देत बस स्थानकाजवळ आली, त्यानंतर रुख्मिणीनगर भागात सायरन न लावता फिरली. परंतु गाडीतूनच बैटरि मारत पोलिस गस्त करून माघारी फिरली. त्याच वेळी जर पोलिसांनी गाडीतून उतरून परिसरातील चप्पा - चप्पा शोध घेतला असता तर जखमी चोरट्यासह त्याचे अन्य साथीदार ताब्यात आले असते. असा प्रश्न या निमित्ताने नागरीकातून विचारला जात आहे.  

मला... पोलिसात द्या परंतु कृपा करून मारू नका
--------------------------
दोन तासाच्या मेहनतीने चोरट्यास नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. त्यावेळी तो पोपटासारखा बोलू लागला... मी इंदिरानगर सरसम बु. येथील रहिवाशी असून,माझे नाव विकास गुंडेकर आहे, माझ्या सोबत आणखी दोघे - तिघेजण व एक ऑटो चालक आहे. मी चोरीच्या उद्देशाने दिवसभर फिरून परिसर पहिला. त्यानंतर ९ वाजता शहरात आलो.. चौपाटीत व्हिडीओ बघितला. त्यानंतर ११ वाजता चोरीच्या कामाला लागलो. अगोदर लिंबाच्या झाडाला शिडी लाऊन चढलो.. त्यानंतर झाडावर शिडी ठेवून वर चढून घरात उतरलो. लोक मागे लागल्याने माझ्या सोबतचे चोरीसाठी वापरण्यात येणारे हत्यार येथील विहिरीत फेकून दिले असे सांगून... या अगोदरही मी अनेक चोर्या केल्या  असल्याची कबुली त्याने नागरीकासमक्ष दिली. मला... पोलिसात द्या परंतु कृपा करून मारू नका अशी विनवणी केली. 

याबाबत पोलिस उपनिरीक्षक गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, नागरिकांनी पकडून दिलेल्या त्या युवकाचा पाय फ़ैक्चर झाला असल्याने त्याच्यावर नांदेडला उपचार सुरु आहे. अन्य दोन संशयिताना आम्ही ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरु आहे. उपचारानंतर त्या जखमी युवकाच्या जबाबानंतर वरिष्ठच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे ते म्हणाले.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी