डॅा. शंकरराव चव्हाण रुग्णालयात अत्याधुनिक सी.टी. स्कॅन

आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तापुर्ण सुविधा
क्षमता वाढीसाठी सरकारकटीबद्ध - नड्डा


नांदेड (अनिल मादसवार) आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तापुर्ण सुविधा आणि त्यांच्या क्षमता वाढीसाठी सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज येथे केले. विष्णुपूरी येथील डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अत्याधुनिक सी.टी. स्कॅन, डी.आर आणि सी. आर. यंत्राचे लोकार्पण समारंभात श्री. नड्डा बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार रामविचार नेताम, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार डी. पी. सावंत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. दिलीप म्हैसेकर, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॅा. प्रविण शिनगारे,  महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. पी. टी. जमदाडे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. नड्डा म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयात जास्तीत जास्त सुविधा देण्यात याव्यात, त्याद्वारे जास्तीत जास्त लोकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात. ते स्वस्थ आणि सुखी व्हावेत अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने महाविद्यालय अत्याधुनिक अशी यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्याचे मोठे समाधान आहे. एकूणच आरोग्य क्षेत्राबाबत केंद्र सरकार चिंतनशील अशा पद्धतीने धोरण राबविते आहे. भारतातील आरोग्य सुविधांमध्ये आणि या क्षेत्रातील कामांमध्ये गुणात्मक बदल झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केले आहे. विशेषतः प्रतिबंधात्मक लसीकरणांच्या मोहिमांचे कामाची आंतरराष्ट्रीयस्तरावर दखल घेतली जात आहे. देशाचा खंडप्राय विस्तार-आकार आणि विविधतेचे आव्हान स्विकारून दुर्गम ते अतिदुर्गम आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी प्रयत्न केला जातो. यात आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सरकारच्या धोरणानुसार राबविण्यात आलेल्या इंद्रधनुष्य या लसीकरण मोहिमेत सात टक्क्यांनी प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भारतातील आरोग्य समस्यामुळे होणाऱ्या मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेने वेगाने घटत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 

राष्ट्रीयस्तरावरील आरोग्य विज्ञान संस्था, तसेच सुपरस्पेशालिटी सुविधांचेही विकेंद्रीकरणासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच त्यांनी जिल्हास्तरावर निदान आणि औषधांसाठी तसेच डायलेसीस सारख्या उपचारांसाठीही नाममात्र दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण असल्याचेही श्री. नड्डा यांनी सांगितले. शासकीय  वैद्यकीय  महाविद्यालयात सुपरस्पेशालिटी  सुविधा देण्याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. सुरवातीला धन्वंतरी पूजन झाले. अधिष्ठाता डॅा. जमदाडे यांनी प्रास्ताविक केले. माजी मुख्यमंत्री तथा खासदार श्री. चव्हाण यांनी आपल्या भाषणात डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाची वैशिष्ट्ये आणि आरोग्य सुविधांच्या दृष्टीने महत्त्व स्पष्ट करून या आरोग्य संकुलासाठी प्रधानमंत्री ग्रामस्वास्थ योजनेंतर्गत भरीव पाठबळ, तसेच सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केली. याप्रसंगी व्यासपीठावर संतुकराव हंबर्डे, संतोष वर्मा, मनोज पांगरकर, डॅा. अजित गोपछडे, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले आदींचीही उपस्थिती होते. डॅा. एस. आर. वाकोडे यांनी आभार मानले. तत्पुर्वी रुग्णालयातील सीटी-स्कॅन विभागातील अत्याधुनिक यंत्र कक्षाचेही श्री. नड्डा यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.त्यांनी या विभागाची पाहणीही केली. याप्रसंगी आमदार सुभाष साबणे यांचीही उपस्थिती होती. लोकार्पण समारंभासमहाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरीक आदींची उपस्थिती होती.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी