गुणवत्ता विकास दुस-या टप्प्याला सुरुवात

डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास
अभियानाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात

नांदेड (अनिल मादसवार) नांदेड जिल्हयात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त गेली वर्षभर विविध उपक्रम जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात शिक्षण विभागाला मोठे यश मिळाले आहे. चालू शैक्षणीक वर्षातही या अभियानाच्या दुस-या टप्प्याला 15 जुन 2016 पासून सुरुवात करण्यात येणार आहे.

यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई आनंदराव गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या बैठकीत शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हयातील सर्व गट शिक्षणाधिकारी तसेच प्रत्येक तालुक्यातून 5 शालेय समितीचे अध्यक्ष तसेच सक्रीय सदस्य यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठकीत शाळेच्या वेळा शालेय व्यवस्थापन समितीने ठरविणे, जे शिक्षक अत्यंत गुणी व मेहनती आहेत त्यांची बदली करु नये अशा शिक्षकांची नांवे शालेय व्यवस्थापन समितीकडून घेऊन शासनास पाठविणे, ज्या शिक्षकांबद्दल शिकविण्याच्या बाबतीत तक्रार किंवा अडचणी आहेत त्यांची नांवे शालेय व्यवस्थापन समितीकडून शासनास पाठविणे, दर महिण्याच्या शेवटच्या शनिवारी पालकसभा घेणे. पालकांनी विद्यार्थ्यांचा रोज एक तास अभ्यास घेणे, रोज रात्री 7 ते 9 या दरम्यान टि.व्ही. बंद करण्याची अंमलबजावणी यशस्वीपणे करणे, 5 वी व 8 वी वर्ग असलेल्या शाळेतील प्रत्येक मुलांना शिष्यवृत्ती परिक्षेत बसवून तो उत्तीर्ण होईलच अशी तयारी करुन घेणे, उन्हाळयात शाळा वातानुकूलीत करणे करणे किंवा डेसर्ट कूलर बसविणे, जिल्हास्तरावर जिल्‍हा गुणवत्ता नियोजन अनौपचारीक मंडळ स्थापन करणे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियान टप्पा दुसरा याचे केंद्र प्रमुख यांच्याकडून नियोजन करण्यात येत आहे यांसह आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. ही बैठक 15 जुन रोजी जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी 2 वाजता होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी दिली आहे.  
  
पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशाचा उत्सव साजरा होणार- संजय बेळगे
                                     
नांदेड(प्रतिनिधी)दिनांक 15 जुन रोजी शाळांना सुरुवात होणार असून जिल्हा परिषदेतील शाळा प्रवेशाचा उत्सव साजरा करुन सर्व मुलांचे गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली.

15 जुन पासून सर्व शाळा सुरु होत असून पाच ते सहा वर्ष वयोगटातील सुमारे 69 हजार 574 प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असून सर्व विद्यार्थ्यांचे शाळास्तरावर गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. आज मंगळवार दिनांक 14 जुन रोजी सकाळी सात वाजता सर्व क्षेत्रीय अधिका-यांसह शिक्षकांचे शाळेत आगमन होऊन प्रवेश पात्र बालकांची यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर शाळा व ग्राम पंचायतीच्या फलकावर ही यादी प्रदर्शित करण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी साडेसात दरम्यान लाऊडस्पिकरवरुन सर्व बालकांना 15 जुन रोजी शाळेत पाठविण्याची विनंती करण्‍यात येणार आहे. तसेच दोन तीन शिक्षकांचे गट तयार करुन गृहभेटीसह पदयात्रा काढण्यात  येणार आहे. यात सरपंच, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, युवक बचतगट, ज्येष्ठ नागरीक आदींचा सहभाग घेण्यात येणार आहे. गृहभेटीनंतर सकाळी नऊ वाजता शाळा आणि शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. यातही युवक, गावकरी तसेच महिला बचतगटांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

15 जुन रोजी प्रवेशपात्र बालकांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. गावातील वार्डा-वार्डातून देशभक्‍तीपर गीते व नारे देत बालकांची प्रभातफेरी काढण्यात येईल. प्रभातफेरीनंतर शाळा व्‍यवस्थापन समितीच्या उपस्थितीत मुलांना मोफत पाठयपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. वर्षभर शंभर टक्‍के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देऊन एकही विद्यार्थी शाळाबाहय राहणार नाही याची सर्वांना प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. दरम्यान शाळा प्रवेशाचा उत्साह साजरा करतांना शाळा परिसरात रांगोळी टाकून वर्ग सजावट केली जाणार आहे. शाळेत येणा-या सर्व विद्यार्थ्यांना नविन शैक्षणीक वर्षाच्‍या शुभेच्छा देऊन, पुष्‍प देऊन त्यांचे स्‍वागत करण्यात येणार आहे. या उपक्रमात गावस्‍तरावरील सर्व समित्या, महिला बचतगट व नागरीकांनी सहभाग घेऊन हा उत्सव साजरा करावा असे आवाहन शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी