रेती कार्यवाही गुलदस्त्यात

विदर्भातील रेती दादाकडून मराठवाड्याच्या हद्दीत उत्खनन... कार्यवाही गुलदस्त्यात  
हिमायतनगर(अनिल मादसवार)नांदेड - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील हिमायतनगर तालुका हद्दीत विदर्भातील वाळू दादांनी घुसखोरी केली असून, तब्बल ४ किलो मीटरपर्यंत उत्खनन करून रेतीची विल्हेवाट लावली आहे. महसुल व पोलिस प्रशासनाच्या अधिकार्यांनी याचा जायमोक्यावर पंचनामा करूनही, तहसीलदार यांच्या उदासीन धोरणामुळे या प्रकरणाची कार्यवाही अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरीकातून केला जात आहे.  

विदर्भ - मराठवाड्याच्या बोर्डरवरून पैनगंगा नदी वाहते. गेल्या खरीप हंगामात अल्प प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे आजघडीला पैनगंगा नदी पूर्णतः कोरडी पडली आहे. परिणामी नदीतील रेतीचे राजरोसपणे उत्खनन करून रेती माफिया व मह्सुलचे अधिकारी कर्मचारी आपली पोळी भाजून घेत आहेत. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर हद्दीत येणाऱ्या दिघी, घारापुर, पळसपूर, रेणापूर (बेचिराख), मंगरूळ, वारंगटाकळी, कौठा, एकम्बां या ८ पैकी एकाहि वाळू घाटाचा अधिकृत लिलाव महसूल विभागाने केला नाही. तर विदर्भातील उमरखेड हद्दीत येणाऱ्या एका घाटाचा लिलाव झाला असल्याचे सांगितले जात आहे. याच संधीचा फायदा घेत बोरी, चाथारी, ब्राम्हणगाव येथील काही वाळू दादांनी शेकडो ट्रेक्टरच्या सहाय्याने मराठवाड्याच्या हद्दीत घुसखोरी करून रात्रंदिवस वाळूचा अमाप उपसा करीत आहेत. अवैध्य रीत्या उत्खन व वाहतूक करून खाजगी, शासकीय बांधकाम करणार्यांना अव्वाच्या सव्वा दराने विक्री करीत आहेत. यामुळे शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसुल बुडत चालला आहे. परिणामी पर्यावरांची मोठी हानी होत असून, यामुळे नदीकाठावरील गावकर्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

या वाळू दादांना कोण्या नागरिकांनी विचारणा केली असता, विदर्भातील रेती घाटाचा लिलाव झाल्याचे सांगितले. जात आमच्याकडे परवाना आहे असे सांगून मराठवाडा हद्दीत उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. एवढेच नव्हे तर लिलावाच्या पावत्या सुद्धा बनावट पद्धतीने तयार करून हा गोरखधंदा केला जात असल्याचे दिघी येथील पर्यावरण प्रेमी नागरिक सांगत आहेत. या अमाप उपस्यामुळे नदीपात्रात मोठमोठाले खड्डे पडले असून, असाच प्रकार चालू राहिला तर पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास पाण्याच्या प्रवाहाने नदीचा बांध फुटून जाण्याची शक्यता नाकारत येत नाही. या भीतीपोटी दिघी येथील नागरिकांनी महसूल विभागाकडे तोंडी चौकशीची मागणी केली होती. त्यावरून आठ दिवसापूर्वी महसूलचे तलाठी शिंदे व हिमायतनगरचे पोलिस निरीक्षक सुरेश दळवे यांनी दिघी गावाजवळील रेती घाटची पाहणी केली. यावेळी मराठवाडा हद्दीतून हजाराहून अधिक ब्रास रेतीचे उत्खनन केल्याचे आढळून आले आहे. तसा पंचनामा गावकर्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. परंतु आजवर महसुल विभागाने याबाबत कोणतीही फिर्याद दिली नसल्याने विदर्भातील वाळू दादांवरील हजारो ब्रास रेती चोरीची कार्यवाही गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.

तसेच पैनगंगा नदीवरील अन्य रेती घाटावरून सुद्धा राजकीय वरदहस्त असलेल्या काही वाळू दादांनी तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्याशी मिलीभगत करून पावसाळ्यापूर्वी वाळूचा बेसुमार उपसा करून साठेबाजी करण्यावर जोर दिला आहे. या वाहनांना वाहतुकीचा परवाना नसताना थेट शहरातील बांधकामावर आणून वाळूचा गोरखधंदा केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यातील एकही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तर शहरात रेतीची वाहतूक करणारे वाहने, बांधकामाच्या ठीकानावरील वाळूची ढिगारे, आणि नदीकाठावरील काही रान - शिवारात साठवून ठेवलेली वाळू आली कुठून असा प्रश्नही नागरिक विचारीत आहेत.

याबाबत तलाठी श्री शिंदे यांच्याशी विचारण केली असता ते म्हणाले कि, विदर्भातील ठेकादाराने अंदाजे ५०० ब्रास अनधिकृत उत्खनन केलेले आहे. याचा पंचनामा अहवाल नागरिक व पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आला असून, तहसीलदार साहेबाकडे दाखल केला आहे. पुढील कार्यवाही ते करून संबंधित ठेकेदारास प्रथम नोटीस आणि दंड न भरल्यास पोलिस कार्यवाहीचा सामना करावा लागेल.

दिघी घाटावरील रेती उत्खनन बाबत काय कार्यवाही झाली अशी विचारणा तहसीलदार श्री गजानन शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून केली असता, ते हैलो हैलो... म्हणाले आणि मी प्रवासात आहे. मला तुमचा आवाज येत नाही असे म्हणून फोन बंद केला.

याबाबत पोलिस निरीक्षक सुरेश दळवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, दिघीच्या घाटावर मोठ्या प्रमाणात आपल्या हद्दीतून उत्खनन झाले. याबाबत तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यापैकी कोणीही आमच्याकडे तक्रार दिली नाही त्यामुळे कार्यवाही करण्यात आली नाही. त्यांनी फिर्याद दिल्यास अमल वाळू माफियावर कार्यवाही करण्यास काहीच अडचण नाही. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी