नालीमुळे भक्तांना सहन करावा लागतो त्रास

लकडोबा मंदिरासमोरील उघड्या नालीमुळे भक्तांना सहन करावा लागतो त्रास 
हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर असलेल्या भगवान लकडोबा मंदिरासमोर नालीचे बांधकाम झाले नसल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या नागरिक भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक नगरपंचायतीने लक्ष देवून तत्काळ नालीचे बांधकाम करावे अशी मागणी महिला - पुरुष भक्त मंडळीतून केली जात आहे.

हिमायतनगर शहर हे देवी देवतांचे शहर म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते. त्यामुळे शहराला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. तरीसुद्धा शहरातील अनेक पुरातन मंदिरांची दुरवस्था कायम आहे. असेच शहरातील परमेश्वर मंदिराकडून जाणार्या रस्त्यावर लकडोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिरात अनेक कोरीव शिलालेख व अनेक देवी देवतांच्या मुर्त्या आहेत. येथील मंदिरात नेहमीचा भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. तसेच लागण सोहळे, अमावस्या, पोर्णिमा सन उत्सवात परिसरातील नागरिक भजन कीर्तन, आदी उत्सव साजरे करतात. हि बाब लक्षात घेत गत वर्षी मंजूर झालेल्या निधीतून मंदिराच्या सभागृहाचे काम सुरु असून, ते काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. परंतु मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी ३ ते ४ फुट अशी भली मोठी नालि आहे. सदर नालीतून  शहरातील घाण पाणी वाहते तर अनेकदा नाली तुंबल्याने साचून राहत आहे. पावसाळ्यात तर हि नालि तुडुंब भरल्याने परिसरातील राहणाऱ्या घरामध्ये याचे पाणी घुसून अनेकांना नुकसान सहन करावे लागते. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नालीतील घाण पाण्यातून पाय बुडवून दर्शनासाठी जावे लागत आहे. परिणामी मंदिराचा परिसर दुषित होऊन पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. हि बाब लक्षात घेता नगरपंचायतीने या नालीचे बांधकाम करणे गरजेचे होते. परंतु यासाठी निधीची तरतूद नसल्याचे सांगण्यात येत असले तरी मंदिर सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास आले असताना देखील नालीच्या बांधकामाकडे कुणीच लक्ष दिले नसल्याची खंत  परिसरातील भाविक भक्त व नागरिक बोलून दाखवीत आहेत. आगामी पावसाळ्यापूर्वी सदर नालीचे बांधकाम पूर्ण करून भक्तांना दर्शनासाठी होणारी अडचण दूर करावी अशी रास्त मागणी नागरीकातून केली जात आहे. 

प्रथम प्राधान्य लाकडोबा चौकातील नाली व 
रस्त्याचे कामास देऊ - अ.अखिल 

याबाबत नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांच्याशी विचारण केली असता ते म्हणाले कि, शहरातील अनेक वस्तीतील ड्रेनेज नाल्या, रस्ते याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी निधी मंजूर होताच प्रथम प्राधान्य लाकडोबा चौकातील नाली व रस्त्याचे कामास देऊन १६ - १७ च्या बजेटमधून पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी