तुळसी विवाह



तुळसी विवाहास आजपासून प्रारंभ.....

कार्तिक महिना प्रारंभ झाला की वेध लागतात ते म्हणजे तुळसीच्या लग्नाचे. मग पंधरा दिवस अगोदरपासून तुळसी वृंदावन सजविण्यासाठी लक्ष दिले जाते. तुळसीचा मामा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो ऊस लग्नाच्या पूर्वसंध्येला रुसलेला दिसून आला. 

तुळसीचा विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी केला जातो. विवाहात तुळस ही वधू आणि कृष्ण हा वर असतो. ऊस हा 'मामा' म्हणून आपली भूमिका बजावतो. दरवर्षी स्त्रीया आषाढी एकाशीला तुळसीचे रोप लावून तिचे संगोपन करतात. पंधरा दिवस अगोदरपासून तुळसीवृंदावन सजविले जाते. त्यावर राधा-दामोदर असे लिहून चारही बाजूला रांगोळी काढली जाते. यानंतर पाच किंवा सात उसांचा मांडव तयार केला जातो. ऊस, झेंडूची फुले, चींच, आवळा आदी तुळसीसमोर चौरंगावर ठेवली जातात. स्वस्तिक काढून त्यावर कृष्ण व राधाची मूर्ती ठेवली जाते. सायंकाळी सूर्य मावळल्यावर मणीमंगळसूत्र, ओटीचे सामान आदी साहित्यांसह विवाह विधीनुसार मंगलाष्टकांसह पार पाडला जातो. नंतर चौरंग किंवा पाटावर मांडलेल्या राधा-दामोदरची आरती करुन आलेल्या मंडळींना प्रसाद दिला वाटण्यात येतो. विवाहाच्या पूर्वसंध्येला ५0 रुपयाला पाच ऊस विकल्याचे दिसून आले. २३ नोव्हेंबर रोजी तुळसी विवाहास प्रारंभ झाला असून २५ नोव्हेंबर रोजी विवाहाची समाप्ती होणार आहे. 


औषधी वनस्पती तुळशीला मानाचे स्थान 
--------------------- 
तुळसीला मानाचे स्थान आहे, कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. तुळस अंगणात किंवा बालकणीत असल्यास हवा शुद्ध राहते. तुळस ही कफनाशक व पाचक असून सर्दी, पडसे, खोकला, दमा आदी विकारावर ती गुणकारी अशीच आहे. तुळसीची पाने, आले व गूळ याचा काढा करुन पिल्यास जळजळ किंवा पित्त होत नाही. कोलायटीस, अंग दुखणे, सर्दी, पडसे, डोकेदुखी यावर तुळस ही गुणकारी आहे.उचकी लागल्यास तुळसीची पाने खावीत, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी तुळस उपयुक्त आहे, असे जुणे-जाणते सांगतात. वृंदावनी, विश्‍वपूजिता, पुष्पसारा, कृष्णजिवनी अशा अनेक नावांनी तुळसीला ओळखले जाते. तुळसीला एक विशिष्ट सुगंध असून ती तीन ते चार फूट इतकीच वाढू शकते. त्यामुळे अंगणात किंवा बालकणीत तुळस लावली जाते. कृष्ण तुळस आणि पांढरी तुळस असे दोन प्रकार असून यापैकी कृष्ण तुळस ही औषधी म्हणून परिचित आहे. तुळसीचे औषधी गुण आणि धार्मिकता यामुळे वारकरी संप्रदायात तिला मानाचे स्थान आहे. अशी माहिती पुरोहित कांता गुरु वाळके यांनी नांदेड न्युज लाईव्हशी बोलताना दिली. ......... अनिल मादसवार

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी