तलाठी एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर तलाठी संजय मेहूणकर एसीबीच्या जाळ्यात
संपत्तीची चौकशी होणार...

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे खडकी बा. येथील एका शेतकर्याचा शेतीचा फेरफार करण्यासाठी ३ हजारची लाच घेताना खडकी बा.सज्जाचा तलाठी संजय मेहूणकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना दि.२५ सोमवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या कार्यवाहीने तलाठी, ग्रामसेवकासह अधिकारी - कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.  

खडकी बा.येथील तक्रारदार यांनी आईच्या नावे खरेदी केलेल्या ७२ गुंटे शेत जमिनीचा फेरफार करण्यासाठी कागदपत्रासह तलाठी संजय मेहूणकर यांच्याकडे दि.०१ मे रोजी प्रस्ताव दिला होता. नेहमीप्रमाणे सुरुवातीला फेरफार करण्यासाठी टाळाटाळ केली, त्यानंतर फेरफार कामासाठी तलाठी महाशयांनी तक्रारकर्त्यास ३ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. त्यांच्या मागणीला हो म्हणून सदर शेतकरी युवकाने दि.१५ रोजी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागीय कार्यालय येथे रीतशीर तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिस अधीक्षक यांच्या सूचनेने सदर तक्रारीची पूर्व पडताळणी केल्यानंतर सदर तलाठ्याने लाचेची मागणी केल्याच सिद्ध झाले. लाचखोर तलाठ्यास जाळ्यात अडकविण्यासाठी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. मात्र संपर्कातून सदर तलाठ्याने दिलेली वेळ चुकविल्याने जवळपास दोन - तीन वेळा एसीबीचे प्रयत्न असफल झाले. तरीही हार न मानता लाचखोर तलाठ्यास जेरबंद करण्यासाठी एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२५ सोमवारी सकाळी ४ वाजल्यापासून खडकी बा.शेतशिवारात सापळा रचून लाचलुचपत विभागाचे पथक थांबले होते. दरम्यान तलाठी संजय मेहूणकर यांनी नंदीग्राम रेल्वेने हिमायतनगर गाठून तक्रारकर्त्या शेतकरी युवकास फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी परमेश्वर मंदिर ते खडकी बा. पानदान रस्त्यावरील शेतशिवारात फेरफार करण्यासाठी मागणीप्रमाणे ३ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अखेर तलाठ्यास जेरबंद केले आहे.

हि कार्यवाही यशस्वी करण्यासाठी गेल्या आठवड्यापासून एसीबीचे पथक परिश्रम घेत होते. मात्र चतुर  लाचखोर तलाठी हा फोनवर लाच मागत होता, तर प्रत्यक्षात पैसे घेण्यास नाकारत होता. अखेर दि.२५ रोजी सकाळी ४ वाजल्यापासून सापळा रचून लाचखोर तलाठ्यास रंगेहात पकडले अशी माहिती एसीबीच्या अधिकार्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना दिली. सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक व पोलिस उपअधीक्षक मोहमंद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जी.एस.राहिरे, पी.आर.पौळ, पोहेको. चंद्रकांत कदम, पो.ना.विठ्ठल खोमणे, पोको.सतीश गुरुतवाड, चापोना.अनिल कदम यांनी केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी-कर्मचारी शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर आलेेले एसएमएस,व्हिडीओ क्लीप असल्यास ती घेवून लाच लुचपत प्रतिबंधक विभागात यावे व तक्रार करावी. तसेच एखाद्या कोणी शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी अपसंपदा संपादित केली असेल तर त्याची माहिती लाच लुचपत विभागात द्यावी व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागातील टोल फ्री क्रमांक १०६४, कार्यालयाचा क्रमांक ०२४६२-२५३५१२ आणि पोलिस उपअधीक्षक मोहम्मद पठाण यांच्या मोबाईल क्रमांक ९८२३२०६८७७ वर संपर्क साधून माहिती देता येईल, असे कळविले आहे. तसेच माहिती अधिकार कायद्याने प्राप्त असलेल्या माहितीच्या कागदपत्रांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी त्यावरून सुद्धा भ्रष्टाचार करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल होतो. तेव्हा माहिती अधिकारावर काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्राप्त माहितीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करावी असे आवाहन मोहमंद पठाण यांनी केले आहे.

संपत्तीच्या चौकशीतून घबाड उघड होणार..!
--------------
लाचखोर तलाठी संजय मेहूणकर यांनी अतिवृष्टीच्या काळात खडकी बा.घारापुर, रेणापूर भागातील नुकसान ग्रस्त शेतीच्या सर्वेत मोठा घोळ केला आहे. त्यामुळे खरे नुकसानग्रस्त लाभार्थी मदतीपासून वंचित राहिलेल्या अनेकांनी तक्रारी देवून उपोषण मांडले होते. यासह अनेकांनी जमीन शेती फेरफार प्रकरणाच्या तक्रारी वरिष्ठाकडे दिल्या होत्या. परंतु महसुलचे वरिष्ठ अधिकारी या लाचखोर तलाठ्यास अभय देत राहिल्याने आजवर त्याने मोठी माया गोळा केली असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. असाच प्रकार चालविला जात असताना एका शेतकऱ्याच्या चाणाक्ष बुद्धीने या तलाठ्यास एसीबीच्या जाळ्यात अडकविले. त्यांनतर पथकाने तलाठ्याच्या हिमायतनगर येथील रूमची झडती घेत, आजूबाजूला विचारपूस केली. तसेच नांदेड येथील त्यांच्या घराची झडती घेवून संपत्तीची चौकशीसाठी वरिष्ठांना कळविले आहे. लाचखोर तलाठी मेहूणकर यांच्या सह कुटुंबाच्या खाते पुस्तक व अन्य कागद पत्राची सखोल चौकशी व झाडाझडाती घेतल्यास गोर - गरिबांच्या मुंड्या मोडून जमवलेले मोठे घबाड उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही अश्या संतप्त प्रतिक्रिया खडकी बा येथील अनेकांनी पोलिस स्थानक परिसरात बोलून दाखविले आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी