साखरपुड्यात शुभविवाह

मुलगी पहायला आले आणि लग्न लावून नेले...


हिमायतनगर(अनिल मादसवार)
महागाई, व खर्चाच्या प्रथेला बाजूला सारत तालुक्यातील मौजे सिरंजणी येथे दि.१९ रविवारी एका नवदाम्पत्याचा साखरपुड्यात शुभविवाह संपन्न झाला आहे. या लग्न सोहळ्याचे अनुकरण सर्वांनी करणे काळाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त करीत वधू - वरास शुभेच्छा दिल्या आहेत.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, इस्लापूर नजीकच्या इरेगाव येथील कु.गंगासागर विठ्ठल पेंटेवाड हिच्या सोयरीकीची जबाबदारी सिरंजणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव उप्पलवाड यांच्याकडे त्यांच्या बहिणीने सोपविली होती. परिस्थिती गरीब असल्याने मामाने भोकर तालुक्यातील नांदा येथील युवक नरसिंगु भोजन्ना कुंटलवाड यांची निवड केली होती. ठरल्याप्रमाणे दि.१९ रविवारी सिरंजणी येथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने वरपक्षाकडील नातेवाईक व वधू पक्षाकडील नातेवाईक सकाळी १० वाजता एकत्र जमले. चहा - फराळाने     मुलगी पाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. मुलाने मुलीस पसंती दर्शविल्याने लगेच साखरपुडा टिळा लावण्याचे ठरविले. त्यासाठी टेंट, बैण्डबाजा, जेवणा बरोबर अन्य साहित्य जुळविण्याची लगबग मुलीच्या मामाने सुरु केली होती.


दरम्यान गरीब कुटुंबातील मुलीच्या साखरपुड्यासाठी मामाकडून केला जाणारा सर्व खटाटोप पाहता, वरपित्याने नवरदेव व नातेवाईकांशी चर्चा करून साखरपुड्यात शुभमंगल लावण्याचा प्रस्ताव ठेवला. वाढती महागाई, नातेवाईकांची सोय, वाहने, वेळ यावर होणारा सर्व खर्चाचा ताळमेळ पाहता वधू पक्षाच्या लोकांनी सुद्धा यास दुजोरा दिला. आणि काही तासातच रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पुरोहिताला पाचारण करून साखरपुड्याच्या कार्यक्रमात शुभमंगल सावधान करण्यात आले. अत्यंत साध्या पद्धतीने नवदाम्पत्य एक दुसर्याच्या गळ्यात माळा घालून विवाह बंधनात बांधल्या गेलेत. या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित झालेले माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, जी.प.सदस्य सुभाष राठोड, जनार्धन ताडेवाड, बाबुराव बोड्डेवार, विकास पाटील, गणेश शिंदे, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते नारायण करेवाड, यांच्यासह अनेकांनी नव वधू - वरास नांदा सौख्यभराच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी