५९ लाखाचा गुटखा जप्त

देगलूर नाका भागातील गोदामावर छापा;
५९ लाखाचा गुटखा जप्त  


नांदेड(खास प्रतिनिधी)शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा अवैधरित्या विक्री सुरु असून परराज्यातून येणारा गुटख्याचे प्रमुख केंद्र नांदेड ठरले असल्यामुळे या धंद्यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. विविध सामाजिक संघटना व अनेक पक्षांनी गुटखा बंद करावा अशी मागणी करुन देखील त्याकडे अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हा शाखा, पोलिस प्रशासन त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. सोमवारी झालेल्या कार्यवाहीत तब्बल ५९ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. 

नांदेड शहर हे गुटखा विक्रीचे केंद्र बनले असून परराज्यातून येणा-या गुटख्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक होत आहे आणि मग येथूनच नांदेड जिल्ह्यातील तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये या गुटख्याचे वितरण होत आहे. किंबहुना पर जिल्ह्यात देखील येथूनच गुटख्याचा पुरवठा होत आहे. देगलूरनाका भागात शेख अफजल हा गेल्या अनेक महिन्यापासून गुटख्याची साठवणूक करीत होता व येथूनच आपले जाळे त्याने पसरविले होते. लाखो रुपयांचा गुटखा त्याने गोदामात ठेवला होता. गुटखा बंद करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी जिल्हाधिका-यांची भेट घेवुन केली होती. या शिष्टमंडळाला जिल्हाधिका-यांनी गुटख्यावर कारवाई होईल असे आश्वासन देखील दिले होते. दुपारी ३ वाजता अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने देगलूरनाका भागातील शेख अफजल यांनी साठवणूक केलेल्या गोदामावर संयुक्तरित्या छापा टाकून ५० लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला. यात जरनीगंधा, गोवा, पानमसाला, सितार, आरएमडी आदींचा समावेश आहे. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करुन आरोपींला अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान जिल्ह्यात गुटखा बिनदिक्कतपणे सुरु असून पानटपरीवर सहजपणे गुटखा उपलब्ध होत आहे. यासंदर्भात कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे कायदा असूनही कायद्याची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई होत आहे त्यामुळेच लहान पानटपरी धारकांपासून ते मुख्य एजन्टापर्यंत या कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या गटख्याची विक्री वाढत असून तरुणपिढी या गुटख्याच्या व्यसनाधिन होत आहे. आता जिल्हाधिका-यांनीच अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी