“योजना समाधानाची -वाटचाल आत्‍मविश्‍वासाची”

आत्महत्त्या रोखण्यासाठीचे अभियान, 2 मार्च पासून सुरवात
शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी नांदेडच्या जिल्हा प्रशासनाचे विशेष समुपदेशन अभियान


नांदेड(अनिल मादसवार)जिल्‍ह्यामध्‍ये शेतक-यांचे मनोबल उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समुपदेशन अभियानाची आखणी केली आहे. या अभियानाची सुरवात सोमवार 2 मार्च, 2015 पासून होणार आहे. ग्रामीण भागामध्‍ये विशेषत: ज्‍या परिसरामध्‍ये शेतकरी आत्‍महत्‍यांचे प्रमाण जास्‍त आहे अशा परिसरामध्‍ये शेतकरी व शेतमजूर कुटूंबाचे मनौधैर्य वाढविण्‍यासाठी त्‍यांचे समुपदेशन करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे. याकरिता अध्‍यात्‍मीक संदर्भाचा आधार आणि विविध योजनांची माहिती यासह शेतकऱ्यांचा आत्‍मविश्‍वास वाढविण्यासाठी योजना समाधानाची - वाटचाल आत्‍मविश्‍वासाची शेतकरी आत्‍महत्‍या थांबवण्‍यासाठी विशेष समुपदेशन अभियान सुरु करण्यात येत आहे.  सुवर्ण जयंती राजस्‍व अभियानांतर्गत समाधान योजनेत या अभियानाचा समावेश असेल, असे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

जिल्‍हाधिकारी धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाच्‍या माध्‍यमातून शेतक-यांचे प्रबोधन करीत शासनाच्‍या विविध योजनांची माहिती देऊन तशा सुविधा त्‍यांना उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे व त्‍याचबरोबर शासन व शासकीय यंत्रणा आपल्‍या सोबत असून कुठल्‍याही अडचणी, संकटांना न घाबरता खंबीरपणे परिस्थितीवर मात करावी हा संदेश शेतक-यांपर्यंत पोहचवला जाणार आहे. जिल्ह्यात 2012 मध्‍ये जिल्‍हयात 39 शेतक-यांनी, 2013 मध्‍ये 46 शेतक-यांनी आत्महत्त्या केल्याची आकडेवारी आहे. दुर्दैवाने ही संख्या 2014 मध्‍ये 117 वर पोहचली आहे. यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्‍ह्यातील किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगांव, बिलोली या तालुक्‍यामध्‍ये अधिक आहे. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने अभियानाचे नियोजन केले आहे.

या शेतकरी आत्‍मविश्‍वास जागृती अभियानात पहिल्या टप्प्यात प्रत्येक उपविभागातील एक गाव निवडण्यात आले आहे. कार्यक्रम दोन ट्प्‍यात घेण्‍यात येईल. पहिल्‍या टप्यामध्‍ये आध्‍यात्मिक तसेच मानसशास्‍त्रीय संदर्भाचा आधार घेत जीवन यशस्वी जगण्‍या संदर्भात मार्गदर्शन करण्‍यात येईल, समुपदेशन करण्‍यात येईल. यामध्‍ये समाजातील कांही मान्‍यवर व्‍यक्‍तींची मदत घेण्‍यात येईल त्‍याचबरोबर यशस्‍वी शेतक-यांची यशोगाथा त्‍यांचेच मुखातून सांगण्‍यात येईल. या अभियानात अध्यात्मिकस्तरावरून समुपदेशन व्हावे यासाठी संत तुकडोजी महाराज संस्थानाचे डाँ. उद्धव गाडेकर यांचे किर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय प्रगतीशील शेतकरी डाँ. शिवाजी शिंदे यांच्यासह शेतीत उत्तमोत्तम प्रयोगशीलता राबवणारे शेतकरी, शेतीनिष्ठ आणि तज्ज्ञांची व्याख्याने, अनुभव कथन असे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमासोबतच शासनाच्‍या महत्‍वाच्‍या विभागाच्‍या शेतक-यांना उपयुक्‍त असलेल्‍या योजनांची माहिती देणारी तालुकास्‍तरीय किंवा जिल्‍हास्‍तरीय अधिकारी त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या विभागाच्‍या योजनांचा पूर्ण अभ्‍यास करुन माहिती देण्‍याकरिता हजर ठेवण्‍यात येईल. शासनाच्‍या विविध विभागाच्‍या उदा. कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुग्‍धव्‍यवसाय विभाग, सहकार विभाग, आरोग्‍य विभाग या सारख्‍या महत्‍वाच्‍या विभागाच्‍या अधिका-यांकडुन योजनांची माहिती उपस्थितांना देण्‍यात येईल. त्‍याचबरोबर शक्‍य झाल्‍यास कांही माहिती पत्रक किंवा अर्ज इत्‍यादीचे वाटप त्‍या ठिकाणी केले जाईलआरोग्‍य विभागा मार्फत आरोग्‍या संदर्भातील योजना सांगून आरोग्‍य तपासणीसाठी कार्यक्रम सुध्‍दा त्‍या ठिकाणी घेतले जाईल.

कार्यक्रमाच्‍या जबाबदारीचे वाटपही विविध स्तरावर केले जाणार आहे. जेणेकरून विविध घटकांचा सहभाग वाढेल. त्या-त्या मंडळातील किंबहुना तालुक्‍यातील, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित राहतील. वेगवेगळ्या विभागाच्‍या वेगवेगळया योजनांची मदत माहिती दर्शविणारे स्‍टॉल, कांही माहिती पत्रिका इत्‍यादी व्‍यवस्‍था केली जाणार आहे.  ग्रामीण रुग्‍णालयाचे अधिक्षक त्‍याचबरोबर तालुक्‍यातील वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य, त्‍या बरोबरच कांही स्‍वयंसेवी संस्‍था व खाजगी डॉक्‍टर्स यांची मदतीने त्‍या ठिकाणी आरोग्‍य तपासणी शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी