मन की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदी :


मन की बातच्या या विशेष कार्यक्रमात आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. बराक ओबामा आपल्यासोबत आहेत. गेले काही महिने मी तुमच्याबरोबर मन की बात करत आहे. मात्र आज देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जणांनी प्रश्न विचारले आहेत. यातले बहुतांश प्रश्न राजकारणाशी संबंधित आहेत, परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहेत, आर्थिक धोरणांशी संबंधित आहेत, तर काही प्रश्न मनाला भिडणारे आहेत आणि मला वाटतं की आज या प्रश्नांना स्पर्श केल्यानं आम्ही देशातल्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकू आणि म्हणूनच पत्रकार परिषदांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत किंवा बैठकांमध्ये चर्चेला येणारे विषय आहेत, त्याऐवजी ज्या मनातून निघणाऱ्या गोष्टी आहेत, त्या पुन्हा पुन्हा सांगितल्या किंवा गुणगणल्या तरी एक नवीन ऊर्जा मिळते आणि त्या दृष्टीकोनातून मला वाटतं की हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. तुम्हाला माहित आहे, काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, "बराक" चा अर्थ कायतेव्ही मी जरा शोधून पाहिले की "बराक" चा अर्थ काय आहेतर स्वाहिली भाषा जी आफ्रिकी देशात प्रचलित आहे, त्यात "बराक" चा अर्थ आहे "ज्याला आशिर्वाद मिळाला आहे" तो. मला वाटते की बराक या नावाबरोबर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना दिलेली ही मोठी भेट आहे. एका गोष्टीचा मला आनंद झाला की आफ्रिकी देशांमध्ये उबंतु आफ्रिकी महान उबंतुच्या प्राचीन विचारांचं अनुकरण करत आले आहेत. हे विचार मानवतेमध्ये एकतेचे विचार आहेत. आणि  ते म्हणतात, "I am because we are" मी आहे कारण आपण आहोत. मला वाटते, काळाचे अंतर आहे, सीमांचे अंतर आहे, मात्र तरीही तोच भाव जो भारतात आपण म्हणतो "वसुधैव कुटुंबकम्" तोच भाव दूर आफ्रिकेच्या जंगलात देखील दिसून येतो. हा केवळ मोठा वारसा आपल्या मानव जातीकडे आहे. जो आपल्याला जोडून ठेवतो. जेव्हा आपण महात्मा गांधींबाबत बोलतो, तेव्हा मला हेन्री थोरो यांची आठवण येते, ज्यांच्याकडून महात्मा गांधींनी  आज्ञाभंगची शिकवण घेतली. जेव्हा आपण मार्टिन ल्यूथर किंग यांचा उल्लेख करतो किंवा ओबामा यांचा उल्लेख करतो, तेव्हा त्यांच्या तोंडूनदेखील महात्मा गांधींचा आदरपूर्वक उल्लेख ऐकायला मिळतो. याच गोष्टी आहेत ज्या जगाला जोडून ठेवतात. आज बराक ओबामा आपल्यासोबत आहेत. मी सर्वप्रथम त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत आणि नंतर प्रश्नांची उत्तरं द्यावीत. मला जे प्रश्न विचारण्यात आले आहेत त्यांची उत्तरे मी देईन आणि बराक यांच्यासाठी जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं ते देतील. मी बराक ओबामा यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा :

नमस्कारसर्वप्रथम मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, या दौऱ्यात माझे आणि माझी पत्नी मिशेलचं मनापासून आदरातिथ्य केल्याबद्दल. तसेच मला भारतीय जनतेला सांगायचे आहे की भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभाला उपस्थित राहणारा  पहिला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष या नात्याने सहभागी होताना मला किती आनंद झाला आहे. मला सांगण्यात आले आहे की भारतीय पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्तपणे रेडिओवरून केलेले हे पहिलेच भाषण आहे. तर अल्प कालावधीत आपण मोठा इतिहास घडवत आहोत. हा कार्यक्रम ऐकणारे देशभरातले श्रोतेहो, तुमच्याशी थेट संवाद साधणे खूपच विस्मयकारक आहे. आत्ताच आम्ही चर्चा करून आलो, ज्यात आम्ही शिक्कामोर्तब केले की भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार आहेत कारण आपल्यात इतक्या गोष्टी समान आहेत. भारत-अमेरिका हे दोन्ही देश लोकशाहीप्रधान देश आहेत, त्यांच्या अर्थव्यवस्थांमध्ये नवीनता आहे, मानवाला सक्षम बनवण्यासाठी समर्पित असे दोन वैविध्यपूर्ण समाज आहेत. भारतीय अमेरिकन नागरिकांनी आपण जोडलेलो आहोत, ज्यांचे स्वत:चे कुटुंब आहे आणि जे भारताची परंपरा पुढे चालवित आहेत. मला पंतप्रधानांना सांगायचे आहे की दोन्ही देशांमधील नाते अधिक बळकट करण्याच्या तुमच्या वैयक्तिक कटिबध्‍दतेचे मला कौतुक वाटते.

पंतप्रधान मोदी यांनी देशातील दारिद्रय दूर करण्यासाठी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, वीजपुरवठा, स्वच्छ ऊर्जा पुरवठ्यासाठी तसेच पायाभूत आणि शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रयत्न करताना जी ऊर्जा दाखवली आहे, त्याबद्दल अमेरिकेतली जनता फारच उत्साहित आहे. कारण ज्याप्रकारचे प्रयत्न मी अमेरिकेत करतो, तशाच प्रकारचे प्रयत्न पंतप्रधान मोदी इथे करत आहेत. मग ते युवकांना सर्वोत्तम शिक्षण असो, सामान्य माणसाला त्याने केलेल्या श्रमाचे वेतन असो किंवा आरोग्याची काळजी असो. प्रश्न समस्या त्याच आहेत. हे सर्व करताना गांधीजींच्या शिकवणीची आठवण येते. ते म्हणायचे की देव सर्वत्र आहे आणि म्हणूनच सेवेच्या माध्यमातून आपण देवाला शोधायचा प्रयत्न करायला हवा आणि हेच आपल्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे. या संबंधांप्रती मी वचनबध्द असल्याचे प्रमुख कारण म्हणजे ही मूल्ये आहेत. मला खात्री आहे की या मूल्यांची कास धरून भारत आणि अमेरिका जागतिक मंचावर एकत्र आले तर केवळ आपल्या लोकांना लाभ होणार नाही तर संपूर्ण जगात समृध्दी, शांतता नांदेल आणि भविष्य अधिक सुरक्षित होईल. आज तुमच्याबरोबर सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी :

बराक, पहिला प्रश्न विचारला आहे मुंबईहून रिनल आणि राज यांनी आणि उत्तराखंडमधल्या डेहराडून येथील आलोक भट यांनी. आलोक हे चार्टर्ड अकाऊटंट आहेत आणि त्यांना एक लहान मुलगी आहे.
त्यांचा प्रश्न आहे की, साऱ्या जगाला माहित आहे की तुमचे तुमच्या मुलींवर किती प्रेम आहे. तुमच्या मुलींना भारताबाबतचे तुमचे अनुभव तुम्ही कसे सांगालत्यांच्यासाठी तुम्ही काही इथे खरेदी करणार आहात का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा :

खरे सांगायचे तर त्यांनाही भारतात यायची खूप इच्छा होती. भारताबद्दल त्यांना उत्सुकता आहे. मात्र दरवेळी जेव्ही मी भारत दौऱ्यावर आलो, तेव्हा त्यांची शाळा सुरू होती आणि त्यांना शाळा बुडवायची नव्हती. आणि माझी मोठी मुलगी मलिआ हिची परीक्षा नुकतीच पार पडली. भारताच्या संस्कृती आणि इतिहासाबद्दल त्यांना आदर आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा तसेच गांधीजींच्या अहिंसावादी तत्त्वांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. म्हणूनच मी परत जाईन, तेव्हा त्यांना सांगेन की तुमच्या कल्पनेतील भारताइतकाच हा देश भव्य आहे आणि मला खात्री आहे की पुढल्या भारत दौऱ्याच्या वेळी त्या नक्कीच मागे लागतील. कदाचित माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नाही पण नंतरही त्यांना इथे यायला नक्कीच आवडेल. आणि मी नक्कीच त्यांच्यासाठी खरेदी करणार आहे. मला स्वत:ला दुकानांमध्ये जाता येणार नाही, पण माझे पथक माझ्यासाठी खरेदी करेल आणि यासाठी मी मिशेलचा सल्ला घेईन कारण तिला मुलींच्या आवडीनिवडी अधिक चांगल्या ठाऊक आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी :

बराक म्हणाले की ते मुलींना घेऊन येतील. माझे तुम्हाला निमंत्रण आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात या आणि राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही या, भारत तुमचे आणि तुमच्या मुलींचे स्वागत करायला उत्सुक आहे. महाराष्ट्रातल्या पुण्याहून सानिका दिवाण हिने मला प्रश्न विचारला आहे. तिने विचारले आहे की, तुम्ही "बेटी बचाओ, बेटी पढाओ" अभियान सुरू केले आहे. यातही तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मदत मागितली आहे कासानिका, तू चांगला प्रश्न विचारला आहेस. भारतात असमान लिंग गुणोत्तरामुळे मोठी चिंता सतावत आहे. एक हजार मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. आणि याला कारण आहे मुलगा आणि मुलगी यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन, जो दोषपूर्ण आहे. राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्याकडे मी मदत मागेन किंवा न मागेन, त्यांचे जीवन हेच प्रेरणादायी आहे.  ज्या प्रकारे ते आपल्या मुलींचे संगोपन करत आहेत, ज्या प्रकारे आपल्या दोन्ही मुलींचा त्यांना अभिमान वाटतो, ते कौतुकास्पद आहे. आपल्या देशातही अनेक ठिकाणी अनेक जण भेटतात, ज्यांना मुलगे नाहीत, फक्त मुलीच आहेत आणि ते मोठ्या अभियानाने आपल्या मुलींना वाढवतात, त्यांचा सन्मान करतात हीच मोठी प्रेरणा आहे. ही प्रेरणाच आपली मोठी शक्ती आहे, असे मी मानतो. तुम्ही प्रश्न विचारलात त्यावर मी  म्हणेन की, "मुलगी वाचवणं, मुलीला शिकवणं" हे आपले सामाजिक कर्तव्य आहे, सांस्कृतिक कर्तव्य आहे, मानवी जबाबदारी आहे. ती आपण पार पाडायला हवी.

बराक, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. अहमदाबाद येथील डॉक्टर कमलेश उपाध्याय यांनी ई-मेल द्वारे प्रश्न विचारला आहे. तुमची पत्नी स्थूलपण आणि मधुमेह यांसारख्या आरोग्याच्या आधुनिक समस्यांचे निराकरण करण्याच्या दिशेने व्यापक सामाजिक कार्य करीत आहे. भारतात देखील या समस्या वेगाने वाढत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही दोघे भारतात येऊन या समस्यांवर काम करणार काबिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स यांनी भारतात स्वच्छतेसंबंधी काम सुरू केले आहे, तुम्ही मधुमेह आणि स्थूलपणाच्या आजारासाठी काम करणार का?

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष  बराक ओबामा

स्थूलपणासहित अन्य आरोग्यविषयक समस्यांवर व्यापक पध्दतीने काम करण्यासाठी सरकारी आणि बिगर सरकारी संघटनांबरोबर भागीदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या संदर्भात मिशेल करत असलेल्या कामाचा मला अभिमान वाटतो. आज आपण जगभरात स्थूलपणाशी संबंधित अनेक प्रकार पाहतो. काहींना अगदी लहान वयात हा आजार होतो. याचे मुख्य कारण आहे जंक फूड, व्यायामाचा अभाव. एकदा का ते या आजाराला बळी पडले की तो आयुष्यभर तुम्हाला सतावतो. या समस्‍येवर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करायला आम्हाला आवडेल. हा जागतिक आरोग्याचा प्रश्न आहे आणि त्यावर आपल्याला उपाय शोधायला हवेत. मी आणि पंतप्रधानांनी इबोला, फ्ल्यू, पोलिओ यांसारख्या आजारांवर चर्चा केली आणि या आजारांचे निदान लवकर होऊन त्यावर उपचार करून तो पसरणार नाही यासाठी चांगली इशारा प्रणाली विकसित करण्याबाबत चर्चा केली. यासाठी जागतिक स्तरावर पायाभूत आरोग्य सुविधा सुधारण्याची गरज आहे. या समस्यांवर लक्ष केंद्रीत करून पंतप्रधान चांगली कामगिरी करत आहेत असे मला वाटतं. सार्वजनिक आरोग्य क्षेत्र सुधारण्यासाठी अन्‍य देशांना शिकवण्यासारखे भारताकडे खूप आहे. याचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होतो. कारण मूल आजारी पडले तर ते शाळेत लक्ष केंद्रीत करू शकत नाही आणि मागे पडते. संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होतो. म्हणूनच आम्हाला वाटते की इथे खूप प्रगती करता येईल आणि अध्यक्षपदाचा कार्यभार संपल्यानंतर या कामाचा विचार करण्याच्या शक्यतेबद्दल मी उत्सुक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी :

मला श्री. अर्जुन यांनी प्रश्न विचारला आहे. खूपच चित्तवेधक प्रश्न आहे. त्यांनी विचारले आहे की मी व्हाईट हाऊसच्या बाहेर एक पर्यटक म्हणून तुमचे एक जुने छायाचित्र पाहिले आहे. जेव्हा तुम्ही सप्टेंबरमध्ये तिथे गेलात, तेव्हा तुम्हाला कुठली गोष्ट हृदयाला भिडलीही गोष्टी खरी आहे की, मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेलो होतो, तेव्हा व्हाईट हाऊसला भेट देणे नशिबात नव्हते. तेव्हा व्हाईट हाऊसबाहेर दूर लोखंडाच्या जाळ्या लावल्या होत्या. जाळीबाहेर उभे राहून मी छायाचित्र काढले होते. मागे व्हाईट हाऊस दिसत होते. आता पंतप्रधान झाल्यावर ते छायाचित्रही लोकप्रिय झाले. मात्र, तेव्हा मी कधीही विचार केला नव्हता की, मला कधी आयुष्यात व्हाईट हाऊसला जाण्याची संधी मिळेल. मात्र, जेव्हा मी व्हाईट हाऊसला गेलो, तेव्हा एक गोष्ट माझ्या मनाला भिडली आणि मी ती कधीही विसरू शकत नाही. बराक यांनी मला एक पुस्तक दिले, जे त्यांनी खूप मेहनत घेऊन शोधून आणले होते. 1894 मध्ये ते पुस्तक प्रकाशित झाले होते. स्वामी विवेकानंद जे माझे प्रेरणास्रोत आहेत, ते शिकागो येथे गेले होते. विश्व धर्म परिषदेसाठी गेले होते आणि तिथे केलेल्या भाषणाचा तो संग्रह होता. ते पुस्तक त्यांनी माझ्यासाठी शोधून आणले ही घटनाच माझ्या हृदयाला भिडणारी होती. फक्त एवढेच नाही तर या पुस्तकातली पाने उघडून त्यात काय काय लिहिले आहे, हे त्यांनी मला दाखवले. म्हणजेच पूर्ण पुस्तक त्यांनी पाहिलेले होते. आणि मोठ्या अभिमानाने मला म्हणाले की, मी शिकागोहून आलो आहे, जेथे स्वामी विवेकानंद आले होते. या गोष्टी माझ्या मनाला भिडून गेल्या. आणि आयुष्यभर मी त्यांना ठेवा मानेन. कधी व्हाईट हाऊस पासून दूर उभे राहून छायाचित्र काढणे. व्हाईट हाऊसमध्ये जाऊन, ज्यांच्यावर श्रद्धा आहे, त्यांचे पुस्तके मिळवणे, तुम्ही कल्पना करू शकता, की हे सर्व मनाला किती स्पर्शून जाणारे आहे. बराक, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. पंजाबमधल्या लुधियाना येथील हिमानी यांचा.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा :

प्रश्न आहे, तुम्ही दोघांनी कल्पना केली होती का, तुम्ही या पदावर पोहोचालपंतप्रधान तुम्ही आताच तुमच्या पहिल्या व्हाईट हाऊस भेटीचे वर्णन केले. ते माझ्याबाबतीतही खरे आहे. मी प्रथम व्हाईट हाऊसला भेट दिली, तेव्हा मी देखील त्या लोखंडी जाळ्यांच्या कुंपणाबाहेर उभा होतो आणि आत पाहत होतो आणि मी कल्पनाही केली नव्हती की मी आत जाईन आणि तिथे वास्तव्य करीन. मला वाटते दोघांना असामान्य संधी मिळाल्या. मी विचार करतो की अमेरिकेत काय चांगले आहे किंवा भारतात काय चांगले आहे. तेव्हा समजते की एक चहा विक्रेता किंवा एकेरी मातृत्वाच्या पोटी जन्माला आलेलो मी आज या देशांचे नेतृत्व करीत आहोत. आपल्या दोघांना प्रोत्साहित करणारी गोष्ट म्हणजे लाखो मुले आहेत, ज्यांच्यात गुणवत्ता आहे, पण त्यांना शिक्षण मिळत नाही, संधी मिळत नाही आणि म्हणूनच अशा मुलांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांचे आरोग्य चांगले राखणे, यावर भर देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सर्व मुली, मुले तसेच सर्व धर्माच्या मुलांना संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. कारण पुढला पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष कोण असेल हे आपल्याला माहित नाही. तुम्ही त्यांना संधी दिलीत तर ते नक्कीच तुम्हाला आश्चर्यचकित करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी :

धन्यवाद बराक!  हा प्रश्न हिमानी यांनी मलाही विचारला होता की, तुम्ही कधी या पदावर पोहोचाल अशी कल्पना केली होती कानाही, मी कधीच कल्पना केली नव्हती कारण बराक म्हणाले त्याप्रमाणे मी अत्यंत सामान्य कुटुंबातून आलो आहे. मात्र मी बरीच वर्षे सांगत आलोय की काहीतरी बनण्याचे स्वप्न पाहू नका. स्वप्न पाहत असाल, तर काहीतरी करण्याचे स्वप्न पहा. जेव्हा काही करतो, तेव्हा आनंद मिळतो आणि आजही  काही बनण्याचे  स्वप्न डोक्यात नाही, मात्र काहीतरी करण्याचे स्वप्न  नक्कीच आहे,  भारतमातेची  सेवा करणे, सव्वाशे कोटी देशबांधवांची सेवा करणे याहून मोठे स्वप्न कोणते असू शकते, तेच करायचे आहे. मी हिमानीचा आभारी आहे. बराक यांच्यासाठी राजस्थानच्या झुंझुनू येथील ओमप्रकाश यांचा प्रश्न आहे. ते जवाहरलाल नेहरु विद्यापीठात संस्कृत शिकतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष -  बराक ओबामा :

हा रंजक प्रश्न आहे. त्यांनी विचारले आहे की नवीन पिढीचा तरुण हा जागतिक नागरिक  आहे. त्याला स्थलकालाचे बंधन नाही. अशा परिस्थितीत आपल्या नेत्याचा, सरकारचा आणि एकंदर समाजाचा काय दृष्टिकोन असायला हवा मला वाटते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी जेव्हा या नवीन पिढीकडे पाहतो, तेव्हा तुमच्या आमच्या कल्पनेच्या  बाहेर ही मुले जग ओळखतात. त्यांच्या बोटांच्या टोकावर हे जग आहे. ते मोबाईल फोनचा वापर करुन माहिती मिळवतात. याचाच अर्थ मला वाटते की, केवळ धोरणे आखून सरकार चालवता येत नाही, तर लोकांपर्यंत पोहोचून, त्यांच्याशी चर्चा करुन पारदर्शक पध्दतीने  सरकार चालविण्याची  आवश्यकता आहे. भारत आणि अमेरिका  यांच्याबाबत  महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली समाजव्यवस्था खुली आहे. आपल्याकडे विश्वास आहे. नवीन कल्पनांचे आदान-प्रदान  होते. यातूनच स्थिर समाज उदयाला येतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी :

जो प्रश्न बराक यांना विचारला गेला, त्यावर मी देखील बोलावे अशी ओमप्रकाश यांची इच्छा आहे. बराक यांनी खूपच छान उत्तर दिले. ते प्रेरणादायी होते. मी एवढेच म्हणेन की एके काळी विशेषकरुन कम्युनिस्ट विचाराने प्रेरित  लोक होते ते आवाहन करायचे की, जगभरातील मजुरांनो एक व्हा. अनेक दशके हा नारा चालला. मला वाटते, आजच्या युवकांची  जी शक्ती आहे ती पाहून  मी म्हणेन की युवकांनो जगाला एकत्र आणा. मला माहित  आहे की त्यांच्यात ताकद आहे, आणि ते करु शकतात. पुढचा प्रश्न विचारला आहे मुंबईच्या सी.ए. पिकाशु मुथा यांनी. त्यांनी विचारले आहे की तुम्ही कोणत्या अमेरिकन नेत्यामुळे प्रेरित आहात लहान होतो तेव्हा भारतातल्या वृत्तपत्रांमध्ये केनेडी यांचे छायाचित्र पाहायचो. त्यांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी होते. तुम्ही विचारलेत कोणी तुम्हाला प्रभावित केले लहानपणी मला वाचनाची आवड होती आणि मला बेंजामिन फ्रँकलिन यांचे  जीवनचरित्र  वाचण्याची संधी मिळाली होती. 17व्या शतकातला त्यांचा काळ ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नव्हते. मात्र त्यांचे ते चरित्र इतके प्रेरणादायी आहे. एक व्यक्ती आपले जीवन बदलण्यासाठी समजदारपणे कसे प्रयत्न करते, झोप कमी करण्याच्या  पध्दती, कमी खाण्याच्या सवयी, काम करताना नाराज होणे आदी छोटया छोटया विषयांवर  त्यांनी या आत्मचरित्रात लिहिले आहे. मी सर्वांना सांगतो की बेंजामिन फ्रँकलिन यांचे आत्मचरित्र वाचा. बहुआयामी व्यक्तिमत्व होते त्यांचे. ते राजकारणी होते,विचारवंत होते, सामाजिक कार्यकर्ते होते आणि सामान्य कुटुंबातून आले होते. शिक्षणदेखील पूर्ण झाले नव्हते. मात्र त्यांनी आजही अमेरिकेच्या जीवनावर आपल्या विचारांची छाप राखली आहे. मला त्यांचे जीवन खरोखरच प्रेरणादायी वाटते. तुम्हाला तुमच्या जीवनात बदल आणायचा असेल तर यातून तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. मला जेवढी प्रेरणा मिळाली, तुम्हालाही तेवढीच प्रेरणा मिळेल. आणि पुढला प्रश्न बराक यांच्यासाठी मोनिका भाटिया हिचा.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा :

प्रश्न आहे दोन  मोठया जागतिक अर्थव्यवस्थेचे  नेते म्हणून तुम्हाला कशातून प्रेरणा मिळते आणि कामाच्या वाईट दिवसाच्या अखेरीस तुमच्या चेहऱ्यावर कशामुळे  हास्य फुलते ?

हा खूपच चांगला प्रश्न आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की माझ्या टेबलवर येणारा प्रश्न हा दुसरा कोणीही सोडवू शकत नाही. सोपे प्रश्न असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी  कुणीतरी सोडवले असतील. असेही दिवस येतात, जेव्हा खूप खडतर  काळ असतो.  दररोज मला एक व्यक्ती भेटते आणि मला म्हणते तुम्ही माझ्या आयुष्यात बदल  घडवून आणलात. ते म्हणतात, तुम्ही आणलेल्या आरोग्य सेवा कायदयामुळे माझ्या मुलाचा प्राण वाचला. त्यांनी डॉक्टरांकडून निदान करवून घेतले आणि टयूमरवर उपचार झाले. आता तो व्यवस्थित आहे. किंवा ते म्हणतील,"तुम्ही आर्थिक संकटात आमचे घर वाचवले," किंवा तुमच्या कार्यक्रमामुळे मला महाविद्यालयात शिक्षण घेता आले. कधीकधी तुम्ही चार-पाच वर्षांपूर्वी केलेल्या कामाबद्दल तुम्हाला धन्यवाद देतात, तर कधी कधी त्या गोष्टी तुम्हाला आठवत देखील नाहीत. तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, जर तुम्ही केवळ कार्यालयात बसून न राहता कृतीवर भर दिला तर त्यातून मिळणाऱ्या समाधानाची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. सेवेबद्दल चांगली गोष्ट म्हणजे ती कुणीही करु शकते. तुम्ही कुणाला मदत केलीत तर त्यातून मिळणारे समाधान अन्य कोणत्याही आनंदापेक्षा अधिक असेल आणि यातूनच मला अधिकाधिक काम करण्याची आणि आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येकाच्याच आयुष्यात कामाच्या ठिकाणी वाईट दिवस येतो. मात्र त्यातून तुम्ही कसे बाहेर पडता यावर तुमचे यश अवलंबून असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी :

खरेच, बराक यांनी अगदी मनातली गोष्ट सांगितली. आम्ही कोणत्याही पदावर असलो तरी आम्ही देखील मनुष्यच आहोत. अशा छोटया छोटया गोष्टी  आम्हाला प्रेरणा देतात.  मलाही माझ्या आयुष्यातली एक घटना तुम्हाला सांगावीशी वाटते. मी आयुष्यात बरीच वर्ष एक प्रकारे भिक्षुका सारखे जगलो. लोकांच्या घरी मला जेवायला मिळायचे. जो मला बोलवायचा, तो खायला घालायचा. एकदा  एक कुटुंब मला वारंवार घरी जेवायला येण्यासाठी आग्रह  करत होते, पंरतु मी जात नव्हतो. यासाठी नाही की ते गरीब कुटुंब होते म्हणून, मला वाटायचे मी जेवायला गेलो तर त्यांच्यावर अधिक बोजा पडेल. मात्र त्यांचे प्रेम, त्यांचा आग्रह इतका होता की मला त्यांच्यापुढे झुकावेच लागले आणि मी त्यांच्या घरी जेवायला गेलो. एक लहान झोपडी होती. मी जेवायला बसल्यावर त्यांनी मला बाजरीची भाकरी आणि दूध  दिले . मात्र त्यांचा लहान मुलगा दुधाकडे पाहत होता असे वाटत होते की त्या मुलाने कधी दूध पाहिले नव्हते. मी त्वरित दुधाची वाटी त्या मुलाच्या हातात दिली आणि त्याने एका क्षणात ते दूध पिऊन टाकले. त्याच्या घरचे लोक नाराज झाले की तो दूध प्यायला म्हणून. आणि मला वाटले की त्या  मुलाने आईच्या दुधाशिवाय कधीही दूध प्यायले नसेल. मला चांगले खाऊ घालण्याच्या हेतूने त्यांनी दूध आणले होते. यातून मला  प्रेरणा मिळाली की गरीब झोपडीत राहणारी व्यक्ती माझ्यासाठी एवढी चिंता करते. मलादेखील माझे आयुष्य अशा लोकांसाठी जगायला हवे.  तर याच गोष्टी आहेत, ज्या प्रेरणा देतात. बराक यांनीही अतिशय सामान्य  मनाला काय काय वाटते ते सांगितले. मी बराक यांचा आभारी आहे, त्यांनी आपला एवढा अमूल्य वेळ दिला. मन की  बात ऐकणाऱ्या देशवासियांचाही मी आभारी आहे. मला माहित आहे भारतात प्रत्येक घरात, प्रत्येक गल्लीत रेडियो पोहचलेला आहे. आणि ही खास मन की बात हा आवाज कायम घुमत राहील. माझ्या मनात विचार आला आहे, जो मी तुमच्यासमोर मांडतो. माझ्यात आणि ओबामा यांच्यात जो  संवाद झाला, त्यांचे ई-बुक काढावे. माझी इच्छा आहे की जे "मन की बात" कार्यक्रमाचे आयोजन करतात, त्यांनी ई-बुक काढावे मी तुम्हा श्रोत्यांनाही सांगेन की ज्यांनी हा कार्यक्रम ऐकला आहे, त्यांनी यात सहभागी व्हावे. यातून जे सर्वोत्तम शंभर विचार मिळतील, त्यांनाही  या पुस्तकात जोडून ई-बुक  काढावे. माझी इच्छा आहे की तुम्हाला ट्विटर, फेसबुक, ऑनलाईन लिहायचे असेल तर हॅश येस  वी कॅन  या हॅश टॅगच्या मदतीने आम्हाला लिहा. एलिमिनेट पॉवर्टी  हॅश येस वी कॅन, क्वालिटी हेल्थ केअर टू ऑल हॅश येस वी कॅन यूथपॉवर विथ एज्युकेशन हॅश येस वी कॅन, जॉब फॉर ऑल हॅश येस वी कॅन, ग्लोबल पीस अँड  प्रोग्रॅम हॅश येस वी कॅन या टॅगलाईनसह तुम्ही  आपले विचार, अनुभव भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. यातील सर्वोत्तम शंभर विचार आम्ही निवडू आणि मी आणि बराक  यांनी जे विचार मांडले, त्यात ते जोडू. आणि मला वाटते ही "मन की बात" आपली "मन की बात"बनेल. मी पुन्हा एकदा  बराक यांचे खूप खूप आभार मानतो. तुम्हा सर्वांचे खूप आभार आणि 26 जानेवारीच्या या पवित्र दिनी बराक यांचे येथे येणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

                                                                                   खूप खूप धन्यवाद !

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी