महिलांनी पुढाकार घ्‍यावा

उघड्यावर शौच्चास जाण्याचे चित्र बदलण्‍यासाठी
महिलांनी पुढाकार घ्‍यावा - प्रणिताताई देवरे


नांदेड(प्रतिनिधी)घरातील योग्‍य संस्‍कार तसेच संस्‍कृतीची शिकवण देण्‍याची परंपरा जोपासतांना मुलिंना आणि सुनेला मात्र शौचाला उघडयावर जावे लाग‍ते ही मोठी शोकांतीक असून हे चित्र बदलण्‍यासाठी महिलांनाच पुढाकार घ्‍यावा लागेल असे प्रतिपादन सौ प्रणिताताई देवरे यांनी केले. कंधार तालुक्‍यातील बाबुळगाव येथे 27 जानेवारी रोजी स्‍वच्‍छतेविषयी घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या.

सरपंच गयाबाई अर्जूनराव भंगारे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात आंचोलीच्‍या सरपंच अर्चनाताई मोरे, हाडोळीच्‍या सरपंच कल्‍पना तोंडचिरे, गट विकास अधिकारी विवेक देशमुख, जनसंपर्क अधिकार मिलिंद व्‍यवहारे, स्‍वच्‍छतातज्ञ विशाल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, महिला उघडयावर शौच विधीसाठी जात असल्‍यामुळे त्‍यांना पोटाच्‍या आजारांचा सामाना करावा लागतो. आपली मुलं मोठी व्‍हावित असे स्‍वप्‍न पाहणा-या मातांना गरोदरपणात शौचास उघडयावर जावे लागत असल्‍यामुळे तिच्‍या आरोग्‍यावर परिणाम होतो, शिवाय उघडया हागणदारीमुळे मुलांचा विकास मातेच्‍या पोटातच खुंटत आहे. यासाठी प्रत्‍येकाच्‍या घरात शौचालयाची गरज आहे. मुलगा-मुलगी समान मानतांना मुलींवर अनेक वेळा बंधने टाकली जातात. महिलांनी डोक्‍यावरचा पदर खाली पडू देवूनये, मोठया व्‍यक्‍तींना नमस्‍कार करावा, अशा कितीतरी संस्‍काराची बिजे रुजवि-या अनेक घरातील महिला उघडयावर शौचास जातांना दिसतात, तेव्‍हा हे संस्‍कार कुठे जातात असा सवाल त्‍यांनी यावेळी केला. गावस्‍तरावरील परिस्थिती बदण्‍यासाठी व महिलांच्‍या संस्‍काराची खरी जोपासना करण्‍यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्‍यास गाव निर्मल होईल असे प्रतिपादन प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले.

प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्‍या प्रतिमेचे पुजन करण्‍यात आले, त्‍यानंतर ग्रामपंचायतीच्‍यावतीने उपस्थितांचा शॉल व पुष्‍पहार देवून सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे यांनीही गावक-यांना मार्गदर्शन केले, ते म्‍हणाले, स्‍वच्‍छ भारत अभियानात बेलाईन सर्वेनुसार शौचालय नसलेल्‍या प्रत्‍येक पात्र कुटूंबांना बारा हजार रुपयाचे प्रोत्‍सहानपर बक्षीस देण्‍यात येते. दारिद्रय रेषे खालील सर्व कुटूंब तसेच दारिद्रय रेषेवरील अल्‍पभूधारक, भूमिहिन शेतकरी, महिला प्रधान व अपंग कुटूंब यांनाही या योजनेचा लाभ देण्‍यात येईल. ज्‍या कुटूंबांचे नाव बेलाईनमध्‍ये नाही अशा कुटूंबांचा समावेश एप्रिलमध्‍ये होणा-या सर्वेक्षणात करण्‍यात येणार आहे असे त्‍यांनी सांगीतले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मिनी बिडीओ गोविंद मांजमकर यांनी केले. यावेळी शौचालय बांधकाम केलेल्‍या 27 लाभार्थ्‍यांना प्रत्‍येकी बारा हजार रुपयाच्‍या धनादेशाचे प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांच्‍याहस्‍ते वाटप करण्‍यात आले. या कार्यक्रमाला मिनी बिडीओ डी.व्‍ही.मोरलवार, ग्रामसेवक एस.एस.घोरपडे, उप सरपंच गोविंदराव बोराळे, संगीता गिते, गंगासागर वाघमारे, बाबूराव भंगारे, पोलिस पाटील संग्राम बोराळे, दिलीपराव तोंडचिरे, रामदास गिते, शेख दैलत, विजय गीते, दिलीप तोंडचिरे यांच्‍यासह गावकरी, महिला व बचत गटातील सदस्‍य यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी