आर.के. लक्ष्मण अनंतात विलीन

आर.के. लक्ष्मण यांचे स्‍मारक उभारणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे(प्रतिनिधी)जगविख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांची स्मृती जपणारे स्मारक राज्य शासनामार्फत उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. त्यांच्या निधनामुळे देशाचे वैभव हरपले असून कला तसेच समाज जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या. 

मुख्यमंत्र्यांनी आज सिम्बॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रांगणात आर.के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही आर.के. लक्ष्मण यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

मुख्यमंत्री म्हणाले की, आर.के. लक्ष्मण देशाचे वैभव होते. त्यांच्या जाण्याने समाजाच्या बहुविध क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी निर्माण केलेला कॉमन मॅन जगाच्या अंतापर्यंत कायम राहील. या कॉमन मॅनचे भाष्य राजकीय, शासकीय, सामाजिक व्यवस्थेला कायम अंकुशाप्रमाणे भासत राहील. आर.के. लक्ष्मण यांचे कार्य पुढील पिढीस कळावे यासाठी राज्य शासन त्यांचे यथोचित स्मारक उभे करेल.

यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी आर.के. लक्ष्मण यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
पालकमंत्री गिरीश बापट यांची आदरांजली व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या निधनाने साऱ्या आयुष्यभर कुंचल्याच्या माध्यमातूनकॉमन मॅनच्या भाव-भावनांचे चित्रण करणाऱ्या जगविख्यात व्यंगचित्रकाराला आपण आज मुकलो आहोत, अशा भावना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे व्यक्त केल्या.

पालकमंत्री गिरीश बापट यांनीयेथील वैकुंठ स्मशान भूमी येथे आर.के.लक्ष्मण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी लक्ष्मण यांना आदरांजली वाहताना वरील भावना व्यक्त केल्या. लक्ष्मण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय वने आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी, जयदेव गायकवाड यांनीही लक्ष्मण यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, जागतिक किर्ती प्राप्त केलेल्या लक्ष्मण यांच्या कलेचा केंद्रबिंदू कायमच कॉमन मॅन राहिला. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा समाजाच्या विविध क्षेत्रातील पुढाऱ्यांना त्यांनी आपल्या व्यंगचित्रकलेच्या माध्यमातून चिमटे घेतले. त्यांच्या व्यंगचित्रात कमालीचे सामर्थ्य होते. कसल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी नेहमी समर्पित भावनेतूनच समाजाचे प्रबोधन केले. त्यांच्या निधनामुळे आपण जगविख्यात व्यंगचित्रकाराला गमावले आहे. यावेळी सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार, प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, पुणे शहरचे उपविभागीय अधिकारी सोनाप्पा यमगर, हवेलीच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल बर्गे, पोलीस उपायुक्त श्रीकांत बापट यांनीही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी