स्‍वच्‍छतेसाठीही स्‍पर्धा करावी

चैनिच्‍या वस्‍तूबरोबरच महिलांनी स्‍वच्‍छतेसाठीही स्‍पर्धा करावी - देवरे


नांदेड(प्रतिनिधी)चैनेच्‍या वस्‍तू मिळविण्‍याची स्‍पर्धा करण्‍याबरोबरच महिलांनी स्‍वच्‍छतेसाठीही स्‍पर्धा कराव्‍यात असे प्रतिपादन सौ प्रणिताताई देवरे यांनी केले. 26 जानेवारी रोजी लोहा तालुक्‍यातील मारतळा येथे कै. मुंजाजी पाटील सार्वजनिक वाचनालय, ग्राम पंचायत व महिला मंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने महिला जागृती मेळावा घेण्‍यात आला, त्‍यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून त्‍या बोलत होत्‍या. पार्वतीबाई व्‍यंकटराव पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात लोहा पंचायत समितीच्‍या सभापती सोनालीताई शंकरराव ढगे, अंजाबाई संभाजी पाटील, किशनबाई गोविंदा डापरवाड, नागरबाई मारोती येडे, सुभद्राबाई भुजंगराव बोरीकर, लक्ष्‍मीबाई नागोराव गजभारे, गयाबाई माधव गजभारे यांची मंचावर उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, महिला शक्‍ती ही फार मोठी शक्‍ती आहे, या शक्‍तीचा उपयोग महिलांनी चांगल्‍या गोष्‍टीसाठी करावा. आज पुरुषांबरोबर महिलांना बरोबरीचे स्‍थान मिळाले आहे. यामुळे महिलांनी प्रत्‍येक क्षेत्रात पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. आजचा काळ स्‍पर्धेचा काळ आहे. या स्‍पर्धेत टि‍कण्‍यासाठी मुलिंना उच्‍च शिक्षण द्यावे जेणे करुन भविष्‍यकाळात तिच्‍या पायावर भक्‍कमपणे ती उभी राहू शकेल असे प्रतिपान करुन त्‍या म्‍हणाल्‍या की, ग्रामीण भागात आरोग्‍य संपन्‍न जिवन जगण्‍यासाठी स्‍वच्‍छतेची गरज आहे. आज आपण भौतिक सुवेधेसाठी चैनेच्‍या वस्‍तू खरेदी करण्‍यासाठी स्‍पर्धा करतो. शेजारणीच्‍या घरात ज्‍या वस्‍तू आहेत, त्‍यापेक्षा चांगल्‍या वस्‍तू खरेदी करण्‍यावर आपला भर असतो, संसारात या गोष्‍टीची गजर आहेच पंरतु याचबरोबर स्‍वच्‍छता टिकवून ठेवण्‍यासाठीही स्‍पर्धा होण्‍याची आवश्‍यकता आहे. तिच्‍यापेक्षा माझे घर कसे स्‍वच्‍छ राहिल अशी स्‍पर्धा महिलांनी ठेवली तर गावात स्‍वच्‍छतेचे वातावरण निर्माण होण्‍यास वेळ लागणार नाही. या जोडीला प्रत्‍येक घरात शौचालय असेल तर महिलासह वृध्‍दांचेही आरोग्‍य चांगले राहिल शिवाय लहान मुलांवरही स्‍वच्‍छतेचे संस्‍कार रुजतील असे प्रतिपादन सौ प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले.

प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्‍वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पंचायत समितीच्‍या सभापती सौ सोनालीताई शंकरराव ढगे यांनी केले. त्‍या म्‍हणाल्‍या, स्‍वच्‍छतेसाठी महिलांनी पुढाकार घ्‍यावा. शौचालय बांधलेल्‍या पात्र लाभार्थ्‍यांना पंचायत समिती मार्फत बारा हजार रुपयाचे अनुदान लाभार्थ्‍यांना देण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.

या कार्यक्रमाला आयोजक संभाजी पाटील, सरपंच माधवराव ढेपे, जिल्‍हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे, स्‍वच्‍छता तज्ञ विशाल कदम, संजय पाटील, आनंदराव माली पाटील, रामराव ढेपे, चेअरमन रामराव पाटील, अशोक पाटील, ग्राम सेवक एन.डी. सोनकांबळे यांच्‍यासह ग्रामस्‍थ व महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी