3 लाख 76 हजाराचा सोन्याचा हार पोलिसांनी चोर महिलेकडून जप्त केला
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)महिला वकीलाच्या घरी राहून तिचे आदरातिथ्य स्विकारून तिच्या घरातून 3 लाख 76 हजार रूपयाचा सोन्याचा हार पळविणाऱ्या महिलेला वजीराबाद पोलिसांनी त्या संपूर्ण हारसह पकडले आहे.
दि.20 जानेवारी रोजी शुभांगी श्रीकांत देशमुख वय 50 ही महिला नांदेडच्या ऍड.सावित्री जोशी यांच्याकडे आली.शुभांगीने ऍड.जोशी यांच्या घरी राहून मुक्काम केला.दुसऱ्या दिवशी 22 जानेवारीला सावित्री जोशीनेच शुभांगीला बसस्थानकात सोडले.त्यानंतर 23 जानेवारीला ऍड.सावित्री जोशी यांच्या लक्षात आले की,आपल्या कक्षातील आलमारीत असलेला 3 लाख 76 हजार रूपयांचा सोन्याचा हार चोरीला गेला आहे.
23 जानेवारी रोजी तक्रार देण्यात आली.पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे व वजीराबादचे पोलिस निरीक्षक रघुनाथ कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शोध पथके तयार केली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक तात्या भालेराव, पोलिस कर्मचारी बालाजी रावळे यांचे एक पथक अंबेजोगाई बीडकडे रवाना झाले. तर दुसरे पथक पोलिस उपनिरीक्षक वैभव मेटके,पोलिस हवालदार केशव गुट्टे आणि महिला पोलिस गंगू नारतावार हे नागपूरकडे गेले. नागपूरमधून त्यांनी चोरी करणाऱ्या शुभांगी देशमुखला पकडले आणि नांदेडला आणले. दरम्यान पोलिसांनी शुभांगीने चोरलेला हार ऍड.सावित्री जोशी यांना दाखविला. तो हाच हार असल्याचे ऍड.सावित्री जोशी यांनी पोलिसांना सांगितले आहे. न्यायालयाने चोर असणाऱ्या शुभांगी देशमुखला सध्या तुरूंगात पाठविले असून पुढील तपास तात्या भालेराव करीत आहेत.