तात्काळ उपाययोजना

पंचायत समितीचे ढिसाळ नियोजन
१७७ पैकी १७० गावातील बोर - विहिरी आटल्या
२०० फुटाची सवलत ३०० फुटापर्यंत करावी
ग्रामसेवक हे लबाड बोलून हात झटकतात
 

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना केल्या जातील व तालुक्यातील नागरिकांना कदापि पाणी टंचाई जणू देणार नाही असे आश्वासन हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले. ते हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात आयोजित पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

यावेळी तहसीलदार शरद झाडके, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, पोलिस निरीक्षक श्री गिरी, प.स.सभापती आडेलाबाई हातमोडे, उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, माजी सभापती वामनराव वानखेडे, प.स.सदस्य पंडित रावते, बालाजी राठोड, पाणी पुअरवथ विभागाचे उपअभियंता भोजराज, स्वीय सहाय्यक बंडू पाटील आष्टीकर, रामभाऊ ठाकरे, विजय वळसे, चंद्रकला गुड्डेटवार, सिधुताई मेरगेवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियांता नीळकंठ, अभियंता गायकवाड आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीने उध्वलेल्या पाणी टंचाई कृती आढावा बैठकीचे दि.२७ शनिवारी पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अल्प पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील ५२ ग्राम पंचायतीतील १७७ वाडी - तांडे गावांपैकी १७० ग्रामीण भागातील गावात विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नोव्हेंबर मधेच कोरडीठाक पडल्याने पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. विशेषतः नदी काठावरील गावातील नागरिकाना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करून भांडेभर पाणी आणावे लागत आहे. तसेच अनेक गावात राबवण्यात आलेल्या भारत निर्माण योजनेच्या कामात भ्रष्टाचार व अर्धवट राबविल्या गेल्या तर काही ठिकाणी तोकड्या प्रमाणात राबविल्याने अनेकांनी तक्रारी केल्या. तसेच अनेक ठिकाणी नळ योजनेचे प्रस्ताव मंजुरीसाठी जी.प.सदस्य टक्केवारी मागत असल्यामुळे योजना मंजूर होत नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. 

एकघरी रमनवाडी ग्रामपंचायतीला ४८ लाख रुपयाची नळयोजना मंजूर झाली. मात्र सरसम जी.प.गटाचे जी.प.सदस्य हे टक्केवारी मागत असल्याने अडथळे निर्माण होत असल्याचे ग्रा.प.सदस्य प्रकाश उदा जाधव यांनी बैठकीत सांगितल्याने टक्केवारीचा मुद्धा चांगलाच गाजला. एकंबा येथील नालायोजानेला पाणी असताना मोटार बंद असल्याने व तीन हात पंपाची दुरुस्ती केली गेल्या नसल्याने नागरिकांना पाणी टंचाई चा सामना कराव लागत असल्याचे पिटलेवाड यांनी सांगितले. 

तसेच हिमायतनगर येथील २.१८ लाखाची नळयोजना अपहाराच्या कारणाने रखडली असल्याची तक्रार देवूनही चौकशी होत नसल्याचा मुद्दा सरदार खान यांनी उपस्थित केला. त्यामुळे शहरातील बार्हाली तांडा, फुले नगर, रोयाल नगर, मुर्तुजा कॉलनी, जनता कॉलनी, नेहारी नगर यासह शहरातील अनेक वस्त्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या प्रकारांची चौकशी करून रखडलेले काम पूर्णत्वास न्यावे अशी मागणी केली. या बाबतचे उत्तर देताना अक्षरश्या ग्रामसेवकाची भम्भेरी उडाली होती. तर पोटा येथील युवक पुलेवाड यांनी तर या अगोदरच्या काळात पाणी टंचाईचा अहवाल हा बंद खोलीत होत होता त्यामुळेच आम जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करून चालू असलेल्या मोटारी महावितरण कंपनीच्या बेजाबदार कर्मचार्यामुळे सुद्धा बंद पडून पाणी टंचाई उद्भवत असल्याचे सांगितले. 

सवना ज. येथील सरपंच गोपतवाड यांनी पाणी टंचाई बरोबर बोअरसाठी शासनाकडून देण्यात आलेली २०० फुटाची सवलत वाढवून ३०० फुटापर्यंत करावी अशी मागणी करून, त्यासाठीचा निधी थेट ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा असे सुचविले. कारण ठेकेदाराकडून यात केली जाणारी दिरंगाई, व बसविण्यात येणारे हलक्या कंपनीचे मोटार पमाप यामुळे दरवर्षी पाणी समस्येसाठी सरपंच व ग्रामसेवकांना हैराण व्हावे लागते असे सांगितले. त्यांच्या या सूचनेला उपस्थित सर्व सरपंच व प.स.साड्यांनी अनुमोदन दिले. तसेच येथील ग्राम पंचायत सदस्य मधुकर पंडित यांनी दलित वस्तीत घन पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करून मागील काळातील केलेल्या खर्चाचा तपशील सदर करावा अशी मागणी केली. यावेळी सरपंच यांनी शुद्ध पाणी मिळत नसल्याचे मान्य करून अडगळीत आलेल्या पाणी पुरवठ्याच्या टाकीचा मुद्दा मांडून नव्याने टाके बांधण्याची मागणी केली. 

तसेच तालुक्यातील सिबदरा येथील नळ योजनेचे काम अर्धवट असून, या विहिरीला भरपूर पाणी आहे, परंतु येथील काही राजकीय पुढारी या विहिरीचे पाणी स्वतःच्या शेतीला घेवून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करायला लावतात असा आरोप येथील युवक लाखां जयस्वाल यांनी केला. सिरपल्ली - शेलोडा, टाकाराळा, पिछोंडी, बोरगडी, पारवा बु., यासह अनेक ठिकाणच्या स्वजलधारा नळयोजना अर्धवट करून संबंधितानी यात अपहार केल्याने नागरिकांना पाणी टंचाई सोसावी लागत आहे. याबाबत अनेकदा संबंधित अभियंता यांना सूचना करूनही ते कामावर येत नाहीत असे म्हणत अनेकांनी पाणी पुरवठा अभियंता यांना धारेवर धरले होते. तर काहींनी संबंधीत ग्रामसेवक हे लबाड बोलून हात झटकण्याचे काम करीत आहेत असे सांगितले. त्यांच्या कडून मिळाले उत्तर व पंचायत समिती कार्यालयातील संभाव्य बोअर, हातपंप चालू - बंदचा अहवाल पाहता मोठ्या प्रमाणात तफावत दिसत असल्याने आ.आष्टीकर यांनी नाराजी व्यक्त करीत येथे सर्व मुर्खांचा बाजार भरला आहे, अश्या शब्दात अधिकार्यांना खडसावून कोणत्याही गावाला पाणी टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेवून तात्काळ पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मात्र तालुक्यातील हिमायतनगर, कामारी, सरसम जी.प.गटाचे तीनही सदस्य व काही प.स.सदस्य, हिमायतनगर येथील सरपंच, दाबदरीचे ग्रामसेवक भारती, घारापुर व सोनारीचे ग्रामसेवक, महावितरणचे अभियंते -कर्मचारी अनुपस्थित दिसून आले. यावरून निवडून दिलेल्या सदस्यांना सामान्य नागरिकांच्या महत्वाच्या पाणी टंचाईच्या समस्येचे काही देणे घेणे नाही असे उपस्थित चर्चा होत असल्याचे जाणवले. याप्रसंगी ग्रामसेवक, सरपंच, पत्रकार नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. 

पंचायत समितीचे ढिसाळ नियोजन 
-------------------------------------- 
पाणी टंचाई कृती आराखडा बैठकी दरम्यान उपस्थित सरपंचाना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था करण्यात आली नसल्याने पंचायत समिती गटविकास अधिकार्यांना उपस्थित सरपंचाचा रोष पत्करावा लागला. त्यामुळे काही वेळ बैठकीत गोंधळ निर्माण झाला. तेंव्हा खुद्द आमदार महोदयांनी उपस्थितांची अधिकारी -कर्मचार्यांच्या वतीने माफी मागून ढिसाळ नियोजनाबाबत खेद व्यक्त केला. त्यांनतर सदर बैठक सुरळीत व शांततेत संपन्न झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी