मुस्लिम मतदारात नाराजी



हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात उमेदवारांनी प्रचाराचा धुराला उडवायला सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात मतदानाची तारीख अवघ्या पाच दिवसावर येउन ठेपली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख ठिकाणी सभा, ग्रामीण भागात कॉर्नर बैठका, तर दररोदार मतदारांच्या गाठी भेटी घेऊन मतदारांची मने वळविन्यावर सर्वानीच भर दिला आहे. एकूण पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारावरून पंचरंगी लढतीचे चिन्ह दिसत असले तरी खरी लढत काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारात होणार आहे.

दरम्यान हिमायतनगर येथे दि.०८ रोजी आठवडी बाजारच्या दिवशी खा. राजीव सातव यांची जाहीर सभा आयोजित केली होती. संपन्न झालेल्या प्रचार सभेत वक्त्यांच्या भरकटलेल्या भाषणबाजीने मुस्लिम मतदारामध्ये नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून येत आहे. परिणामी हा वर्ग अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे तथा बि.एस.पी.चे.उमेदवार जाकेर चाऊस यांच्याकडे वळण्याची शक्यता बळावली आहे. काँग्रेसच्या सभेत अनेक वक्त्यांनी आपली भाषणे करून विरोधकांवर टीकेचा भडीमार केला. काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या एका नूतन कार्यकर्त्याने तर भाषणबाजी केली, जाता जाता मात्र त्यांनी शेवटी आम्ही भी पाटील आहोत आमच्या नादाला लागल्याने काय होईल सांगता येणार नाही असा दम भरल्याने उपस्थित मुस्लिम समाज बंधावात निरुत्साह पसरला आहे. नेहमीच येथील मुस्लिम समाज हा भाजपा, शिवसेना बाबत नाराजी व्यक्त करीत काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करतात. मात्र सदर वक्त्याच्या मराठाशाही वक्तव्याने काँग्रेस उमेदवाराला आमची मते नको आहेत का..? अशी चर्चा शहरात सुरु आहे.

एवढेच नव्हे प्रमुख वक्ते खा. राजीव सातव यांचे भाषण झाले. त्यांच्या मार्मिक भाषणात मोदीवर चांगलेच टीकास्त्र सोडले तसेच बोर्डरवर पाकीस्थान गोळ्यांच्या फैरी झाडत असताना मोदी मात्र इकडे प्रचारात गुंतल्याचा आरोप केला. मोदी यांनी शपथ विधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावले, त्यांच्याच बाजूला सेनेचे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे बसले असे सांगत खिल्ली उडविली. यावेळी थोडे भाषण भरकटत जावून मुस्लिम विरोधी सूचक वक्तव्य त्यांच्या तोंडूनही ऐकावयास मिळाले. मात्र तेंव्हाच त्यांनी सारवासराव करत " सिंघम रिटर्न .. माधवराव सुद्धा रिटर्न.. हिंगोली मतदार संघातील जनता भारी आणि हदगाव - हिमायतनगरची जनता तर लई भारी.." असे म्हणून जवळगावकर यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. परंतु सातव यांच्या या डायलोग बाजीच्या वक्तव्यामुळे समजदार को इशारा काफी है.. या उक्तीप्रमाणे पहिल्यांदा माधवराव यांचा पराभव झाला होता..त्याच पद्धतीने या निवडणुकीतही त्यांचा पराभव होईल असे तर त्यांना म्हणायचे नाही ना.. या बाबत सुजाण मतदारांमध्ये खल सुरु आहे.

खरे पाहता अनेक वर्षापासून काँग्रेस पक्ष व मुस्लिम मतदार असे समीकरण राहत आले आहे. काँग्रेसवाले मुस्लिमांची मते आपल्या घरचीच असल्याचे समजतात, परंतु सत्तेतील वाटा देण्यासाठी त्यांच्याकडून तत्परता दाखविली जात नाही. असा आजवरचा अनुभव जाणकारांचा आहे. म्हणूनच कि काय ..? काँग्रेसचे मातब्बर पुढारी तथा जी.प.सदस्य समद खान यांनी काँग्रेस मध्ये असताना सुद्धा बि.एस.पिचे उमेदवार जाकेर चाऊस यांचा पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी यावेळी मुस्लिम, ओबीसी, व बहुजनांची मते कमी होणार असल्याचे चिन्ह दिसून येत असल्याने जवळगावकर पराभवाच्या छायेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यासाठी काँग्रेस उमेदवारासोबत असलेले काही बिभीषणाची भूमिका वठविणारे कार्यकर्ते यास कारणीभूत ठरणार असल्याची चर्चा मतदारांच्या तोंडून ऐकू येत आहे.

फोडाफोडीची स्पर्धा सुरूच
--------------------------
दरम्यान या सभेत हिमायतनगर, वडगाव, खडकी येथील बर्याच्या शिवसैनिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर टेंभूर्णी व पवना तांडा, बोरगडी, यासह वाडी - तांड्यातील बर्याच काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागेश पाटील यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला. या दोन मातब्बर नेत्यामध्ये लागलेल्या या फोडाफोडीच्या चढा ओढीने २०१४ ची विधानसभा निवडणुकी अतिशय चुरशीची होणार आहे. तसेच बी.एस.पी.चे उमेदवार जाकेर चाऊस व भारीप बहुजन महासंघाचे उमेदवार डॉ.बळीराम भुरके या दोघानासुद्धा जातीय समीकरणाचा मोठा फायदा होणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप देशमुख, भाजपच्या लता कदम, मनसेचे सुरेश सारडा यांनि सुद्धा प्रचारात आघाडी घेतली असून, जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून विजयी होण्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणता उमेदवार विजयी होईल याचा उलगडा १५ अक्टोबरच्या मतदानानंतर व १९ रोजीच्या निकालानंतर समोर येणार आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी