पानबळीची वाट पाहतेय काय..?

प्रशासन पानबळीची वाट पाहतेय काय..? ग्रामस्थांचा सवाल 
हंडाभर पाण्यासाठी पिछोंडीवासियांचा जीव धोक्यात..
विहिरीत पडून एकजन गंभीर जखमी..
तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याच्या तयारीत 




हिमायतनगर(अनिल मादसवार)मौजे पिछोंडी येथील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यातही भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, याबाबतचे वृत्त प्रकाशित करूनही प्रशासनाला पाझर फुटेनासा झाला आहे. परिणामी ग्रामस्थांना भांडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. आता तरी प्रशासन येथील पाणी प्रश्न सोडवील कि पाणी बळी जाण्याची वाट पाहिलं..? असा खडा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तात्काळ पाणी प्रश्न सोडविण्यात आला नाही तर येथील तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.

५०० च्या वर लोकसंख्या असलेल्या मौजे पिछोंडी गावाचा कारभार कारला येथील सरपंच रामेश्वर यमजलवाड व ग्रामसेवक गर्दसवार हे पाहतात. मागील वर्षभरापासून सरपंच महाशयाने पिछोंडी गावात भेटच दिली नाही. त्यामुळे पिछोंडी गावाच्या समस्यांनी डोके वर काढले आहे. दरवर्षीप्रमाणे पाणी टंचाईची समस्या भेडसावत असताना, यावर्षी विहिरीचे अधिग्रहण केले नाही. परिणामी पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. या गावात असलेले बोअरची पाणी पातळी खाली गेल्याने पाईप टाकून पाणी काढावे लागत आहे. हे पाणी सर्वाना मिळणे कठीण असल्याने गावातील नागरिकांना भांडेभर पाण्यासाठी ३ ते ४ कि.मी.पर्यंत रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचे भयावह चित्र आहे. असाच काहीसा अनुभव दि.०६ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास एवढ्या दूरवरून पाणी आणणे कठीण असल्याने गावातील आटलेल्या विहीरितून पाणी काढताना गणेश गोविंदराव कोळेकर वय ४० वर्ष हा इसम तोल जाऊन विहिरीत कोसळल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्यांना हिमायतनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. पाठीला जबर मार लागून गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत त्यांच्या प्रकृती गंभीर असल्याचे समजले.

पानबळीनंतर पाणी समस्या सोडविणार काय..?

पाणी टंचाई सोडविण्यासाठी अधिग्रहण करणे गरजेचे होते मात्र याकडे सरपंच - ग्रामसेवकाने जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून गट ग्रामपंचायतीच्या पिछोंडी गावाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी प्रमाणे विहीर अधिग्रहण केले असते तर ग्रामस्थांवर हि वेळ आली नसती. याबाबत आवाज उठूनही ग्रामस्थांनी तहान भागविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे येथे एखादा पंबली झाल्याशिवाय पाणी टंचाईची समस्या सुटणार नाही काय..? असा सवाल माजी सरपंच भुरजी धनवे, शेषकलाबाई डुडुळे, धुपाताबाई धनवे, रुखामिनाबाई मिराशे, रामू बेले, नीलाबाई धनवे, लक्ष्मीबाई बनसोडे, कमलबाई धनवे, तानाबाई डुडुळे, मंजुळाबाई देशमुखे, पंजाबी देशमुखे, मंगलाबाई बोडखे, पार्वताबाई डुडुळे, तुळसाबाई बनसोडे, चांगुणाबाई भिसे, रुखमाबाई बोडखे यांच्यासह शेकडो महिलांनी उपस्थित करून तातडीने पाणी टंचाई सोडवा अन्यथा आगामी काळात तहसील कार्यालयावर गावकर्यांच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.

विहिरीचे कठडे उंच करावे

येथील जुनाट विहिरीची पाणी पातळी खोलवर गेली आहे, सध्या या विहीत येथील एका बोराचे पाणी तासाभरानंतर सोडले जात आहे, मात्र त्याची पाणी पातळी खोल गेल्याने गावकर्यांना पाणी जमा होण्याची वाट पहावी लागत आहे. या परिस्थितीत तहान भागात नसल्याने बहुतांश ग्रामस्थ ३ -४ कि.मी.दूरच्या रानातून पाणी आणून तहान भागवीत आहेत. विहिरीचे कठडे उंच नसल्यामुळे काल रात्रीला विहीरितून पाणी काढताना गणेश गोविंदराव कोळेकर इसमाचा तोल गेल्याने गंभीर जखमी झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी विहिरीचे कठडे उंच करण्याकडे गरम पंचायतीने लक्ष देणे  गरजेचे आहे.

याबाबत ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, अधीग्रहानाचा प्रस्ताव दाखल  केलेला असून, वरिष्ठ कार्यालयाकडून अधिग्रहनाबाबत कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याने अधिग्रहण करण्यात आले नाही. सध्या ग्रामसेवक संघटनेचा संप चालू असून, मी कामावर नसलो तरी जखमीची विचारपूस करून परिस्थितीची पाहणी करणार आहे.

याबाबत सरपंच यमजलवाड यांच्याशी संपर्क साधला असता मी गावाला गेलो आहे, एक महिन्या पासून पिछोंडी गावाला भेट दिली नाही असे सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी