विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

अंदेगाव येथील मुख्याध्यापकाचे मनमानी कारभाराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान 


हिमायतनगर(अनिल मादसवार)येथून जवळच असलेल्या मौजे अंदेगाव येथील जी.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार वाढल्यामुळे सदरील शाळा वादाच्या भोवर्यात सापडली असून,विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे.

चालू शैक्षणिक वर्षात जी.प.शाळांचा शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून, अनेक विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी शिक्षकच नाहीत तर असलेल्या ठिकाणी शिक्षक शाळेवर येत नाहीत किंवा शिकवत मनाहित असे विदारक चित्र हिमायतनगर तालुक्यातील शाळांचे झाले आहे. शेतकरी , कष्टकरी, शेतमजुरांची मुले शिकणाऱ्या या शाळांकडे मात्र जी.प.प्रशासनाचे म्हणावे तसे लक्ष नसल्याने सबंध तालुक्यात जवळपास ९० हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

निवडून दिलेले लोकप्रतिनिधी गुत्तेदारीत व्यस्त असल्याने शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राकडे पाहण्यास त्यांना वेळ नाही. गत वर्षापासून  तालुक्यात शिक्षकांची वानवा चालू असताना एकही शिक्षक तालुक्यात आला नसल्याने शिक्षणा विषयीची त्यांची अनास्था दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून कि काय..? आहेत तेवढ्या शिशाकांवर भर लादून येथील शिक्षकांकडून काम करून घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.  

वर्ग चार आणि शिक्षक दोन कुठे वर्ग सात तर शिक्षक तीन, कुठे चार उठे पाच अशी तालुक्यातील शाळांची अवस्था झाली आहे. मौजे अन्देगाव येथे वर्ग चार व शिक्षक दोन अशी अवस्था असून, आळीपाळीने शाळा करण्याचा नियम मुख्याध्यापक बळीराम वानखेडे यांनी जणू स्वतःच बनविला असून, कधी सहकारी तर कधी मुख्याध्यापक असा शालेय परिपाठ चालू असल्याने येथील जवळपास निम्म्याहून अधिक विद्यार्थी संख्या घटली आहे. सदरील मुख्याध्यापकाची व सहकार्याची तातडीने बदली करून कर्तव्य दक्ष शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. विशेष म्हणजे याच गटाचा जी.पं.सदस्य व जिल्हा शिक्षण समितीचा सदस्य सुभाष राठोड हे असताना  सुद्धा या परिसरातील शाळांची अशी अवस्था आहे. याबाबत त्यांचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे गावातील नागरिकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी १० तारेखेची डेडलाईन दिली आहे. मागणी मान्य न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा नागरिकांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांच्याशी संपर्क साधला असता रिक्त पदाचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. लवकरच शिक्षक मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तेंव्हा तात्काळ ज्या ठिकाणी आवश्यक असेल तिथे शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येतील असे ते म्हणाले. 

तालुक्यात एकूण ८२ जागा रिक्त आहेत, आज घडीला वारंग टाकली, वडगाव ज, पवना, दिघी, अन्देगाव या शाळांना कुलूप लागल्याची परिस्थिती आहे. शिक्षक दिल्याशिवाय कुलूप काढणार नाही असा गावकर्यांचा निर्धार आहे. खासदार, आमदार, जी.प.अध्यक्ष, जी.प.सदस्य, प.स.सभापती हे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, राज्यकर्ते असताना ग्रामीण भागातील वाडी - तांड्यावर शिक्षकांच्या रिक्त जागा राहणे हि खेदाची बाब असून, यातून राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा दिसून येत नाही काय..? असा सवाल पं.स.सदस्य बालाजी राठोड यांनी दिली.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी