दुसर्या दिवशी १२ वाजले तरी गैरहजर...

मुजोर जनावर डॉक्टरची अरेरावी...म्हणे बातम्या आल्यावर काय फरक पडणार..!
दुसर्या दिवशी १२ वाजले तरी गैरहजर....
शेतकऱ्यांनी फोनवरून केला संताप व्यक्त  


हिमायतनगर(प्रतिनिधी)येथील पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्याचा मनमानी कारभार वाढल्यामुळे काल जखमी हरीनास उपचारा अभावी पाच तास विव्हळावे लागले अश्या आशयाच्या बातम्या वृत्त पत्रातून प्रकाशित होताच पित्त खवळलेल्या डॉक्टर बिरादार यांनी अरेरावी करत बातम्या आल्याने माझे काही वाकडे होणार नाही. असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा मुजोरीचे दर्शन घडवीत जनावराच्या डॉक्टरचे वागणे जनावरा सारखेच असल्याचा प्रत्यत आणून दिला आहे.

काल दि.१९ गुरुवारी २०१४ रोजी सिरंजनी येथील काही युवकांनी कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या हरणाच्या पिल्लाचा बचाव करून हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले होते. परंतु या ठिकाणी सकाळी ७ वाजता उपस्थित होऊनही रुग्णालय कुलूप बंद असल्यामुळे तब्बल पाच तास उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. त्यामुळे उप - डाऊन करणाऱ्या अधिकायाच्या मनमानी काभाराबाबत पशुपालक व वन्य प्रेमी युवकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.  सदरील घटनेचे वृत्त काही पत्रकार बांधवांनी प्रकाशित केल्याने या जनावर डॉक्टरचे पित्त खवळले आणि कर्तव्यात कसूर करूनही अश्या बातम्यांनी माझे काही वाकडे होणार नाही या अविर्भावात सलग दुसर्या दिवशी हि दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णालयात हजर झालेच नाही. आज दि.२० रोजी पळसपूर, कारला पी, हिमायतनगर, यासह अनेक ग्रामीण बहुल भागातील बहुतेक शेतकरी आपली जनावरे उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले होते. मात्र १०.३० वाजले तरी रुग्णालयास कुलूप होते. 


काल झालेल्या प्रकारामुळे तर या ठिकाणी सदर डॉक्टरने नोटीस लाऊन अकलेचे तारेच तोडले आहेत. राष्ट्रीय गर्भपात नियंत्रण कार्यक्रमामुळे रुग्णालय सकाळी ७ ते १० पर्यंत बंद राहील. अत्यावश्यक सेवेसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. तसेच शुल्लक कारणावरून फोन करून, कामात व्यत्यय आणू नये असे सुचित केले आहे. या नोटिशीवर कोणताही दिनांक टाकला नसल्याने काहीं पशुपालकांनी डॉक्टरांशी थेट संपर्क करून उपचार करण्यासाठी येण्याची विनंती केली. मात्र मुजोर डॉक्टरांनी वेळेवर येणे तर सोडाच पेपरमध्ये बातम्या आल्याच्या संतापाच्या भरात  दूरध्वनीवरून पशु पालकांना शिवीगाळ करून मुजोरीचे दर्शन घडून दिले. यावेळी निवृत्ती देवसरकर, व्यंकटराव गंगाराम, किशन कदम, राजू बनसोडे, विठ्ठल यांच्यासह काही पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. याच वेळेत वर्णउपचारक श्री बोइवार यांनी रुग्नालयात दाखल होऊन उपचारासाठी आलेल्या पशूंची तपासणी केली.  

सध्या पेरणीची धामधूम सुरु असून, शेतकरी बांधवासाठी वेळ फार महत्वाचा आहे. शेती कामासाठी पशु धनाची निगराणी व आजारापासून मुक्ती मिळून देणे यासाठी त्यांची तळमळ वाढलेली आहे. शेती कामासाठी वापरण्यात येणारी बैलजोडी, गुरे, वासरे, शेळ्या आदींना अचानक अपघात, फऱ्या, हगवण, लाळ गाळणे, सर्पदंश असे आजार उद्भवल्यास व वेळेवर उपचार न मिळाल्यास मोठ्या नुकसानीची भीती आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांना आता मुजोर डॉक्टरी संकटाचा सामना करावा लागत असल्याची संतप्त प्रतिकिया उपस्थित शेतकर्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. 

अश्या प्रकारे कर्तव्यात कसूर करून, भोकर येथे राहून मनमानी पद्धतीने उप - डाऊन करून १२ - १२ वाजेपर्यंत रुग्णालयात हजार न होणार्या पशुधन अधिकारी डॉक्टर बिरादार यांची तात्काळ हकालपट्टी करून पोटाच्या पोराप्रमाणे पशूना जपणाऱ्या शेतकर्यांना न्याय देण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकायाची नेमणूक या ठिकाणी करावी अशी मागणी होत आहे.        

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी