कॉंग्रेस पक्षाने जिंकणाऱ्या घोड्यावर बेट लावली

स्वत:ची प्रतिष्ठा पणाला असतांना अशोकराव हे राजीव सातव व दत्तात्रय बनसोडेंना तारतील काय?
कॉंग्रेस पक्षाने जिंकणाऱ्या घोड्यावर बेट लावली

नांदेड(प्रतिनिधी)लोकसभेची जागा जिंकणे आणि त्यासाठी जिंकण्याची शक्यता असलेला उमेदवार म्हणूनच नांदेडला अशोकराव चव्हाण यांना उमेदवारी दिली असली तरी 16.86 लाख मतदाता यामुळे आश्चर्य चकीत झाले आहेत.

नांदेडच्या लोकसभा मतदार संघात अशोकराव चव्हाण यांचे भाऊजी भास्करराव पाटील खतगावकर विद्यमान खासदार असतांना त्यांना खो देवून काँग्रेस पक्षाने अशोकराव चव्हाण यांना उमेदवारी दिली. यामागे त्यांच्या जिंकण्याची शक्यता पाहिली गेली. तसेच हिंगोली व लातूर मतदार संघात तेथील काँग्रेस उमेदवारांना ते जिंकण्यासाठी मदत करतील अशीही अपेक्षा काँग्रेस पक्षाला आहे. खतगावकरांच्या घरी 2 एप्रिल रोजी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक झाली असे काही लोकांनी सांगितले. त्या बैठकीत काय रणनिती ठरली हे स्पष्ट झाले नसले तरी भास्करराव पाटील खतगावकर इनकम्पसी फॅक्टर काही अंशी का होईना चुकीचा दाखविण्याचा प्रयत्न अशोकराव करीत आहेत हे खरे आहे.

अशोकराव चव्हाण यांचा विश्वास नांदेडमध्ये विधानसभा मतदान संघाचा झालेला लोकसभा मतदार संघ आणि नांदेड जिल्ह्यात असलेल्या 9 विधानसभा मतदार संघातील 6 व 1 अपक्ष असे 7 आमदार काँग्रेस पक्षाचे 2 आमदार राष्ट्रवादी पक्षाचे हा आहे.खरे तर माधवराव पाटील बेटमोगरेकर यांच्याबाबत वरकरणी ते काँग्रेसचे दिसत असतील तर खऱ्या अर्थाने अशोकराव चव्हाण यांचे समर्थक आहेत काय? हा खरा प्रश्न आहे. तसेच हदगावचे आ.माधवराव पाटील जवळगावकर हे मागे निवडून आले तेव्हा हदगाव तालुक्यातील राजकारण त्याला कारणीभूत होते. खऱ्या अर्थाने तो काँग्रेसचा विजय मानता येणार नाही. अशोकराव चव्हाण सांगतात वडिलांच्या पुण्याईने जुनी पिढी माझ्याशी जोडली गेली. पण याच हदगाव तालुक्यातील बापूराव पाटील आष्टीकर हे जुन्या पिढीतील व्यक्ती व प्रतिष्ठित व्यक्तीमत्व त्यांच्या विरोधात आहे. हिच परिस्थिती बेटमोगरेकरांच्या मुखेड मतदार संघाची आहेत. रविवारी झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेत मुखेडचे माजी आ.किशनराव राठोड हे भाजपमय झाले. तसेच भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये आलेले मुदखेडचे राम चौधरी पुन्हा भाजप या स्वगृही परतले आहेत. यावरून अशोकरावांचा जुनी पिढी माझ्यासोबत असल्याचा दावा फोल ठरतो.

नांदेडच्या 9 विधानसभा मतदार संघापैकी कंधार,लोहा लातूर लोकसभा मतदार संघात आहे तर हदगाव,किनवट हे दोन विधानसभा मतदार संघ हिंगोली लोकसभा मतदार संघात आहेत. हदगाव येथे विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांचे बाहुल्य आहे. तर किनवट येथे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक आहेत. आणि ते राष्ट्रवादीच्या नेत्या सूर्यकांताताई पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. आता प्रश्न असा आहे की, गेल्या पूर्ण विधानसभा कार्यकाळात माधवराव पाटील जवळगावकर यांनी किती प्राबल्य मिळवले. आणि ते नसेल तर हिंगोलीच्या राजीव सातव यांना कशी मदत होईल. तसेच किनवट येथे सूर्यकांताताई पाटील प्रदीप नाईक यांना राजीव सातवची मदत करू देतील काय हा ही प्रश्न आहे. कारण हिंगोली येथून राष्ट्रवादीचा पत्ता कट करून ती जागा कॉंगे्रसने घेतली आहे. हा भाग वरिष्ठ नेत्यांनी ठरविला असला तरी मागील लोकसभा निवडणुकीत हरलेल्या सूर्यकांताताई पाटील यांच्या मनातील शल्य कमी होईल काय? नायगाव विधानसभा मतदार संघात बापूसाहेब गोरठेकर यांचेही मोठे वजन आहे.मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी हारावे म्हणून अशोकरावांनी केलेले प्रयत्न ते साडेचार वर्षात विसरले असतील काय. या प्रश्नांचे उत्तर अशोकरावांकडे काहीच नाही.

लोहा-कंधार मतदार संघात प्रतापराव पाटील चिखलीकर, मनसेचे रोहिदास चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आ. शंकरअण्णा धोंडगे या तीन दिग्गजांचा सामना अशोकराव चव्हाणांना करायचा आहे. लोहा नगर परिषदेमध्ये मनसेचे प्राबल्य आहे. हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे. तरी पण या भागातून अशोकराव चव्हाण यांच्या भरवशावर लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार दत्तात्रय बनसोडे गुरूजी यांना कशी मदत होईल हा प्रश्न आहे.मागील लोकसभेेचे खासदार जयवंतराव आवळे यांनी सुद्धा लोहा-कंधारमध्ये विकासाची काहीच कामे केली नाहीत. तेव्हा काँग्रेस पक्षाला तेथील मतदारांसमोर जाणे अवघड आहे.

लातूरमध्ये तर कॉंगे्रस महिला कार्यकर्तीवर तिच्यावर बलात्कार करून खून केल्या प्रकरणी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक झाली असून त्यामुळे काँग्रेसची प्रतिमा लातूर लोकसभा मतदार संघात मलीन झाली आहे. आणि या मलीन प्रतिमेला स्वच्छ करण्याची प्रक्रिया अशोकराव करतील काय हा ही मोठा प्रश्न आहे. यापेक्षा जास्त ज्या कै.विलासराव देशमुखांमुळे अशोकरावांची खूर्ची गेली ते सुद्धा अशोकराव विसरले असतील काय.याचा विचार काँग्रेस पक्षाने केलेला दिसत नाही.

नांदेड लोकसभा मतदार संघात दलित,मुस्लिम,मराठा,शिख आणि इतर मागासवर्गीय सर्वच प्रवर्गातील मतदार एक चांगली संख्या असणारे आहेत.या सर्व समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत.नांदेड जिल्ह्यात युवा कॉंग्रेस पासून काम केल्याचा दावा करणाऱ्या अशोकराव चव्हाणांनी कधी तरी या प्रवर्गांच्या समस्यांमध्ये डोकावून पाहिले आहे काय? ज्यामुळे या प्रवर्गांना त्यांच्या बद्दल आपुलकी वाटेल. याचे उत्तर अशोकरावांकडे नक्कीच नाही.

अरविंद केजरीवालांच्या आप पार्टीच्या वतीने नांदेडमधील नरेंद्रसिंघ ग्रंथी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचा विचार ऐकला तर बरेच काही लिहिण्यासारखे आहे. पण ज्या दिवशी अशोक चव्हाण यांनी आपला लोकसभा उमेदवारी अर्ज भरला आणि वर्कशॉप कॉर्नर ते जुना मोंढा अशी रॅली काढली होती. त्या रॅलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेली घाण आपचे उमेदवार नरेंद्रसिंघ ग्रंथी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साफ केली होती.याचा बराचसा परिणाम सुज्ञ मतदारांवर नक्कीच झाला असेल.नांदेडमध्ये इतरांना शिवाजीनगर उड्डाण पुलावरून परवानगी नाही पण अशोकरावांच्या रॅलीला प्रशासनाने दिलेली परवानगी बऱ्याच नांदेडकरांच्या मनावर एक वेगळाच नकारात्मक प्रभाव पाडून गेली आहे.

नांदेडमध्ये 75 नगरसेवक असलेल्या महानगर पालिकेत 13 नगरसेवक एमआयएम पक्षाचे आहेत.या पक्षाने आंध्र प्रदेशमध्ये कॉंगे्रस पक्षासोबत युती केल्याने नांदेडमध्ये त्यांनी एमआयएम पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणुकीत दिला नाही. हेच जर सत्य असेल तर दोन दिवसांपूर्वी एका काँग्रेस कार्यकर्त्याला एमआयएम कार्यकर्त्यांनी करबला भागात चांगलाच चोप दिला होता.आणि तो सुद्धा काँग्रेस पक्षाची सभा करबला भागात का घेतली म्हणून यावरून काय बोध घेता येईल तो काँग्रेस पक्षाने घ्यावा.

2002 च्या गुजरात दंग्यांना आजही भाजप विरोधात रान पेटविणारे काँग्रेसजन आपल्या कार्यकाळात आपल्या कार्यकाळात दंगली झाल्या याचा कधीच उल्लेख करत नाही. नांदेेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी सन 2007 मध्ये झालेल्या दंगलीत काँग्रेस नेत्यांनी नवी आबादी भागात मुस्लिमांवर पोलिसांकरवी केलेला अन्याय विसरलेले नाहीत. काही सुज्ञ मतदार त्यातही काही मुस्लिम बांधव सुद्धा सांगतात की,खरे तर सत्ता बदल हवा. मोदी पंतप्रधान झाले तर काय मुस्लिमांच्या कबरी बांधल्या जातील ? एकदा त्यांनाही पंतप्रधान होवू द्या,पाहुया मोदी काय करतील. एखाद्या राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर आपल्यावर आलेले संकट हे सांगणे खूप सोपे आहे, पण स्वत:चे आत्मपरिक्षण करून पाहायला हवे की आपले काय चुकले आहे.यात अशोकरावांच्या आसपास जमलेले कोंडाळे त्यांना हा विचारच करू देत नाहीत.

काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक असलेल्या अशोकराव चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली असतांना ते हिंगोलीचे राजीव सातव आणि लातूरचे दत्तात्रय बनसोडे यांना किती मदत करतील हा ही मोठा प्रश्न काँग्रेससमोर असायला हवा.पण दिल्लीत बसलेेले काँग्रेस नेते हे कधी पाहतील देव जाणे.

अशोकराव अडकले शब्दगुंडांच्या जाळ्यात

नांदेड जिल्ह्यात काही पत्रकार मंडळींना आम्ही नेत्यांना आपल्या मर्जीने वागवता असा गोड गैरसमज झाला आहे. अशोकराव चव्हाणांनी या वृत्तीला चांगलेच ओळखले आहे. आणि त्यानुसार अशी वृत्ती बाळगणाऱ्या काही पत्रकारांना त्यांची जागा सुद्धा दाखविली होती.दुर्भाग्य लोकशाही, लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचे की,आज पुन्हा एकदा टाकून दिलेल्या पत्रकारांच्या दावणीला अशोकराव बांधले गेले आणि त्यांचा गोड गैरसमज पुन्हा एकदा खरा ठरला. आपल्या गालावर सुरेख अशी खळी पाडून लोकांच्या त्रासावर हसणाऱ्या आणि आपली तुबंडी भरणाऱ्या त्या पत्रकाराच्या खलबतात अशोकराव अडकले आणि त्याच्याच सांगण्या आधारावर बातम्या प्रसारित करण्याचे काम सुरू आहे. या पत्रकारांच्या नाळाला ओळखणारे अशोकराव हे का विसरतात.किंबहुना त्यांना विसरायला लावले जाते. हे पाणी कुठे मुरते आहे हे सुद्धा अशोकरावांनी शोधले तर त्यांच्या घराभोवती फिरणारे बिभिषण खऱ्या अर्थाने कळतील.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी