जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठकीत आढावा

प्रशिक्षण, मतदान केंद्रावरील व्यवस्थेबाबत
जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठकीत आढावा

नांदेड(प्रतिनिधी)मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांची चोख व्यवस्था करावी, तसेच पोलचिट्सचे वेळेत वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. धीरज कुमार यांनी आज येथे दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 साठी नांदेड लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रीयेच्या पुर्वतयारी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक प्रशिक्षण व स्वीप व्यवस्थापन प्रमुख दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक खर्च निरीक्षण कक्ष प्रमुख एस. आऱ. चन्ना, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, राष्ट्रीय सुचना केंद्राचे राजेश भुसारी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरु आहे. तसेच काही मतदान केंद्रांच्या प्रत्यक्ष इमारत-स्थळांबाबतही बदल केले जात असल्याची माहिती श्री. पिनाटे यांनी यावेळी दिली. तसेच मतदार याद्या तसेच पोलचिट्सचे वितरण, मतदार ओळखपत्रांचे वाटप याबाबतही त्यांनी काही सुचना केल्या.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. धीरजकुमार म्हणाले की, मतदान केंद्रांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीज, चांगली प्रकाश व्यवस्था, विकलांगासाठीचे रँम्प, ऊन्हापासून बचावासाठीची व्यवस्था तसेच स्वच्छतागृह याबाबींचा आढावा घेण्यात यावा. त्याबाबतचे नियोजन व व्यवस्था वेळीच करण्यात यावी. मतदारांना पोलचिट्सचे वाटप ही संकल्पना पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. त्यामुळे त्याबाबत कुठेही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियेबाबत मतदान कर्मचाऱ्यांच्या विविध टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रमाचाही आढावा घेतला. टपाली मतदान आणि कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी द्यावयाच्या सुविधेबाबतही चर्चा झाली.

संवेदनशील मतदान केंद्राबाबत विशेषतः जिथे मतदार ओळखपत्रांचे प्रमाण मतदार संख्येच्या तुलनेत कमी आहे, तिथे सातत्यपुर्ण व्हिडीओ चित्रीकरण आणि मतदाराची ओळख पटवण्यासाठीचे सर्व उपाय योजले जावेत, असेही श्री. धीरज कुमार यांनी सांगितले. आचारसंहिता पालनाच्या मुद्यावर निवडणूक खर्चाचे लेखे व अहवाल वेळेत दाखल व्हावेत यासाठीही त्यांनी निर्देश दिले. मतदान यंत्राबाबतचे प्रशिक्षण तसेच मतदान यंत्र आणि त्याच्या सुरक्षा व देखभालीबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी