वादळी वाऱ्यासह गारपीट

हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट
रब्बी पिकांचे अतोनात नुकसान व जनावरांचे बेहाल

हिमायतनगर(अनिल मादसवार)सोमवारी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीतील गहू, हरभरा, करडी, आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गारांचा मार लागल्याने जनावरांच्या अंगावर गाठी झाल्या आहेत. खरीप हंगामात अतिवृष्टी रब्बी हंगामात गारपीट झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

तालुक्यातील मंगरूळ, धानोरा, बोरगडी, बोरगडी तांडा न.१,२, कोठा तांडा, एकंबा, सिरंजणी सह परिसरात दि. ०३ सोमवारी सायंकाळी अचानक विजांचा गडगडाट व सुसाट वार्याने हजेरी लावली. त्यातच वार्याच्या जोराने जोरदार पावसाच्या सारी पडल्यामुळे काढणीला आलेला गहू, करडी, कापून ठेवलेला हरभरा अस्ता - व्यस्त झाला. तर झाडाला लगडलेली आंब्याची कैरी व मोहोर व संत्र मोसंबीचे फळे वादळी वार्याने गळून जमिनीवर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या वादळी वार्याने फळ बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हाताशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले आहे. या बाबीची शासनाने दाखल घेवून नुकसान ग्रस्त शेतकर्यांना मदतीचा हातभार लावावा अशी मागणी केली जात आहे.

धानोरा - मंगरूळ परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे बाहेर असलेल्या जनावरांना याचा मोठा फटका बसला असून, दुभत्या गाई म्हशींना लिंबा एवढ्या गारांचा जबर मार लागल्याने जनावरांच्या अंगावर गाठी झाल्या असल्याचे शेतकर्यांनी नांदेड न्युज लाइव्ह्शि बोलताना सांगितले.

सायंकाळी ८ च्या नंतर हिमायतनगर शहरासह तालुका परिसरातील सरसम, पळसपूर, डोल्हारी, कारला, सवना, टेंभी, खडकी बा., वडगाव, जीरोणा, पवना, एकघरी यश ग्रामीण भागात पावसाची सुरुवात झाली होती. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी