हवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त

स्वयंचलित हवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त
जिल्हाधिका-यांकडून महापालिकेच्या प्रकल्पाचे कौतुक

नांदेड(प्रतिनिधी)महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन प्रादेशिक केंद्राअंतर्गत उभारलेले हवामान केंद्र शेतकरी व प्रशासनाला वातावरणाच्या बदलाची जाणीव करून देण्यासाठी उपयुक्त आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून नांदेड शहराच्या दहा किलोमीटर परिसरातील हवामानाची माहिती शेतक-यांना त्यांच्या मोबाईलवर कळविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शनिवारी (दि.8) या केंद्राच्या उदघाटनप्रसंगी केले.

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रातर्गत असलेल्या नांदेड शहराच्या उत्तर विभागासाठीच्या स्वंयचलित हवामान केंद्राचे उद्घघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मनपा आयुक्‍त जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी होते. याप्रसंगी एम.जी.एम. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सौ. गीता लाठकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रविण फुलारी सहाय्यक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, समन्वयक श्रीनिवास औंधकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्याला विविध प्रकारच्या हवामान बदलामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. मराठवाडा विभागात उन्हाळयातील सर्वात जास्त तापमान नांदेडला असते आणि हिवाळयात हेच तापमान कमालीचे घसरते. मान्सुन पुर्व व परतीच्या मान्सुन काळात जिल्हयावर आकाशातील विजांच्या कडकडाटासह मोठया संख्येने विजा कोसळतात. यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होत असते.

वातावरणातील विविध घटक व परिणामांचा अभ्यास करणारी कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही. त्याकरिता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राने शहरातील एम.जी.एम. महाविद्यालयातील खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्रामध्ये प्रादेशिक आपत्ती हवामान केंद्र सुरु केले आहे.या प्रकल्पाअंतर्गत शहरातील उत्तर विभागासाठी एम.जी.एम. महाविद्यालयामध्ये व दक्षिण विभागासाठी साई मंगल कार्यालय, हडको येथे दोन स्वंयचलित हवामान केंद्रे कार्यान्वीत करण्यात येत आहेत.

महापालिकेच्या वतीने सुरु केलेल्या या स्वंयचलित हवामान केंद्राव्दारे शहरातील तापमान, आर्द्रता, वा-याचा वेग, वा-याची दिशा, अतिनिल स्थिरांक, वातावरणाचा दाब, सुर्याची प्रकाश तीव्रता, पर्जन्यमान या संदर्भातील सर्व माहिती संकलित करता येणार आहे. तसेच सर्व माहीती अनॉराईड व इंटरनेटची सुविधा असलेल्या मोबाईलवर निश्चित वेळेत पाहणे शक्य होणार आहे. त्यासाठी वेगळे अप्लिकेशन विकसीत करण्यात आल्याचे औंधकर यांनी यावेळी सांगितले.अशा प्रकारची यंत्रणा उभारणारी नांदेड महानगरपालिका मुंबईनंतर संपुर्ण महाराष्ट्रात पहिलीच महापालिका असुन येणा-या काही दिवसामध्ये सदरील यंत्रणा प्रादेशिक विभागातील हिंगोली व परभणी येथेही उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पायलट प्रकल्प म्हणून चालवावा, जेणेकरुन त्याचे परिणाम दिसतील, असा सल्ला मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी यावेळी दिला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी