चव्हाण गटात अस्वस्थता

‘दादां’च्या दिल्लीवारीने चव्हाण गटात अस्वस्थता

नांदेड(रमेश पांडे)लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात कॉंग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार? असा सवाल उपस्थित होत असतानाच उमेदवारीच्या चर्चेतून बाद झालेले विद्यमान खा. भास्करराव पाटील खतगावकर थेट दिल्लीत डेरेदाखल झाल्यामुळे अशोकराव चव्हाण गटात अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर करण्याच्या शेवटच्या प्रक्रियेत खा. खतगावकर यांच्या मागे पडलेल्या नावाने पुन्हा उसळी घेतल्याचे मानले जात आहे.

नांदेडमधून भारतीय जनता पक्षाने डी.बी.पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी कॉंग्रेस उमेदवार कोण? याबाबत जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली. कॉंग्रेस श्रेष्ठीने यावेळी भास्कररावांना निवडणूक रिंगणातून बाद करण्याचा निर्णय घेतला आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमिता चव्हाण यांची नांवे समोर आली. तथापि खुद्द अशोकरावांनी लोकसभा लढविण्यास असमर्थता दर्शविल्याने सौ.अमिता चव्हाण यांचे नांव निश्चित होईल, असे वाटत असतानाच रविवारी सायंकाळी भास्करराव पाटीलांनी नांदेडहून हैद्राबादमार्गे विशेष विमानाने दिल्ली गाठली.

उमेदवारी धोक्यात आल्याने अस्वस्थ झालेले खा. भास्कररावांनी अखेरचा उपाय म्हणून दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली. यात खा. भास्करराव पाटील यशस्वी ठरतील किंवा नाही, हे स्पष्ट होईलच. खा.खतगावकर रविवारी सायंकाळच्या सुमारास दिल्लीकडे रवाना झाल्याने अशोकराव चव्हाण यांच्या गटात मात्र अस्वस्थता निर्माण झाली होती. युवराज राहूल गांधी यांनी पक्षातील युवा ब्रिगेडला पसंदी दिल्यामुळे खा. खतगावकरांची डाळ शिजेल का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच खतगावकरांना दिल्लीत बोलावणे आल्याने त्यांच्याच गळ्यात उमेदवाराची माळ पडणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतो आहे.

अशोकरावांकडे प्रचाराची धुरा?

दरम्यान मागील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले अशोकराव चव्हाण यांनी लोकसभा न लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्याकडे राज्यातील पक्ष प्रचार समिती प्रमुखपदाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे सादर केल्याची माहिती असून केंद्रीय समिती लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहे. 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार प्रमुखाची धुरा विलासराव देशमुख यांच्याकडे होती. विलासरावांच्या निधनानंतर ही जबाबदारी आता अशोकरावांकडे दिली जाणार असल्याचे समजते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी