उद्या घोषणा..?

खतगावकरांच्या उमेदवारीची उद्या घोषणा..?

नांदेड(रमेश पांडे)उमेदवारीसाठी दिल्लीत गेलेले विद्यमान खा. भास्करराव पाटील खतगावकर तिकीट घेऊनच परतणार, असे निश्चित मानले जात असून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. दोन दिवसांत त्यांच्या नावाची घोषणा होईल, असे दादांच्या कार्यालयीन सुत्रांनी सांगितले.

नांदेडचा लोकसभेचा उमेदवार कोण? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच गुरुवारी त्यांची उमेदवारी ङ्गिक्स झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. उमेदवार निश्चितीच्या पहिल्या टप्प्यात भास्करराव खतगावकरांना उमेदवारी न देण्याचा विचार कॉंग्रेस श्रेष्ठींनी केला होता. त्यांच्याऐवजी अशोकराव चव्हाण, पालकमंत्री डी.पी.सावंत आणि सौ.अमिता चव्हाण यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु होती. अशोकरावांनी लोकसभेसाठी इच्छूक नसल्याचे प्रारंभी स्पष्ट केल्यानंतर सौ.अमिता चव्हाण आणि डी.पी.सावंत यांच्याच नावाची चर्चा होती. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणचे उमेदवार कॉंग्रेसने निश्चित केल्यानंतरही नांदेडबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवला होता. रविवारी भास्करराव खतगावकर अचानक दिल्लीकडे रवाना झाले आणि त्यांचेच नांव पुन्हा चर्चेत आले. रविवारपासून दिल्लीत तळ ठोकून असलेले खतगावकर तिकीट घेऊनच परतणार, अशीही चर्चा सुरु झाली.

बुधवारी (दि.5) औरंगाबाद येथे झालेल्या राहूल गांधी यांच्या सभेत व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण विराजमान झाल्याने अशोकरावांचे पुनर्वसन आता निश्चित होणार असे वाटत असतानाच या सभेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मिडियाने ‘आदर्श’चे भूत पुन्हा जागे केले आणि अशोकरावांच्या आशेवर पाणी ङ्गेरले. परिणामी नांदेड लोकसभेसाठी अशोकराव चव्हाण यांना उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरु असतानाच खतगावकरांचे पारडे जड झाले आणि त्यांच्या उमेदवारीवर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त नांदेडमध्ये धडकले. याबाबत खतगावकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नसले तरी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता दादांच्या उमेदवारीची शुक्रवार अथवा शनिवारी घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले. दादांना उमेदवारी मिळाल्याचे संकेत प्राप्त होताच त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले परंतु कॉंग्रेस उमेदवार निवडीच्या या नाट्यमय घडामोडीत दादांना कौल मिळाल्याचे मानले जात असले तरी चव्हाण गट मात्र अद्याप अस्वस्थतेतून बाहेर पडला नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी