बिनपदाची एक्सप्रेस अन्‌ लंगडे प्रवाशी

बिनपदाची एक्सप्रेस अन्‌ लंगडे प्रवाशी

नांदेड(रमेश पांडे)'पाटीलबुवा लगीन करा, तर म्हणे तुम्हीच बायकु व्हा!’ या अस्सल मराठमोळ्या उक्तीप्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची अवस्था त्यांच्या टीमने केली आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर दिसत असतानाही अशोकरावांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्याशिवाय जिल्ह्यातला एकही पुढारी पुढे येताना दिसत नाही. ‘चलो बुलावा आया है...’ असे करता करता तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी त्यांच्या पदरी निराशाच आली.

गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघावर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी अशोकरावांनी जिवाचे रान केले.ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही, जनसंपर्क नाही, अशांनाही अशोकरावांनी संपुर्ण ताकद लावून त्यांना विधानसभेत पाठवले. दरम्यानच्या काळात आदर्शच्या जाळ्यात अडकलेल्या अशोकरावांना या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. संकाटवर संकटे अशी स्थिती निर्माण झाली असतानाच जिल्ह्यातील त्यांच्या समर्थक पुढार्‍यांना मात्र याचे ना सोयर ना सुतक. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापले मतदारसंघ ‘ङ्गिक्स’ रहावेत यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु असल्याचे दिसते. त्यासाठी काही आमदारांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांच्या शुभारंभाचा धूमधडाका सुरु केला आहे. नांदेड उत्तर, नांदेड दक्षिणसह कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघासह लोहा-कंधार या सहकारी राष्ट्रवादी पक्षाच्या आणि नायगाव या कॉंग्रेस समर्थक अपक्ष उमेदवाराच्या विजयासाठी अशोकरावांनी संपुर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यावर या मतदारसंघातील पुढारी त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढे येतील, असे वाटत होते. परंतु त्यांची ही टीम अखेर ‘लंगडी’ ठरली. अन्य जिल्ह्यातील कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी अशोकरावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करीत असताना नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका मात्र ‘थंड’ दिसते आहे.

खासदारासह जिल्ह्यातील सर्व आमदार व इतर पुढार्‍यांनी मराठवाड्यातील स्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन दबाव गट तयार केला असता तर अशोकरावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला असता. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींवर दबाव आणून वेळप्रसंगी राजीनामे देण्याची तयारी दर्शविणे आवश्यक होते. तसे झाल्यास आपणच अडचणीत येऊ या भितीपोटी स्वार्थी लोकप्रतिनिधींना तेही जमले नाही. अशोकरावांशिवाय निवडणूक, अशी कल्पनाही जिल्ह्यातील कॉंग्रेसजनांना करता येणार नाही, असे असताना आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्त्वाखाली लढवणार? हा मुख्य मुद्दा आहे. लोकसभाचा कॉंग्रेसचे उमेदवार अशोकराव असतील किंवा ते ठरवतील तो असेल, परंतु सध्या त्यांच्यावर असलेले आरोप घेऊन जनतेपुढे जाणे म्हणजे धाडसाचेच ठरणार नाही का? खासदार कॉंग्रेसचा, पालकमंत्री, जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचे अधिराज्य, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कॉंग्रेसचा, विधान परिषद सदस्य कॉंग्रेसचा, बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर कॉंग्रेसचे वर्चस्व असताना अशोकरावांची बिनपदाची एक्सप्रेस रुळावर धावण्यासाठी या पुढार्‍यांनी वैयक्तिक अथवा सामूहिक प्रयत्न केले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो. अनेकांना पदांची लयलूट करण्यासाठी अशोकरावांनीच प्रयत्न करायचे आणि स्वतःच्या पुनर्वसनासाठीही त्यांनीच प्रतिष्ठा पणाला लावायची? असा या पुढार्‍यांचा हेतु दिसतो. या स्थितीला ‘पाटील बुवा लगीन करा...’ असेच म्हणणे संयुक्तिक ठरेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी