सक्तमजुरी

दलित विवाहितेची छेड काढणाऱ्यास सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)एक दलित विवाहिता घरात एकटी आहे पाहून तिचा विनयभंग करणाऱ्यास येथील दुसरे जिल्हा न्यायाधीश एस.बी.म्हस्के यांनी एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये रोख दंड ठोठावला.

अर्धापूरजवळील मौजे पार्डी मक्ता येथे दि.20 ऑगस्ट 2011 रोजी दुपारी बाराच्या सुमारास एक विवाहिता आपल्या घरात एकटीच आहे हे हेरुन गावात फर्निचरचे काम करणारा शितलसिंह गणेशसिंह परमार (35) हा त्या घरात गेला आणि त्या विवाहितेला अश्लिल बोलू लागला. तिने आरडाओरड करताच परमार पळून गेला आणि नंतर आपल्यासोबत झालेली घटना वीस वर्षीय विवाहितेने आपल्या नवऱ्याला सांगितली आणि सासू, सासरे आल्यावर पोलीस ठाणे अर्धापूर येथे तक्रार दिली. अर्धापूरचे पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांनी शितलसिंह परमारविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम 354,451 व ही विवाहिता दलित असल्याने ऍट्रासिटी ऍक्टसह गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक यशवंत सोळंके यांनी करुन शितलसिंह विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयात या प्रकरणी सहा साक्षीदार तपासण्यात आले. आणि उपलब्ध पुरावाआधारे न्यायाधीश म्हस्के यांनी शितलसिंह परमारला भादंविच्या कलम 354 नुसार सहा महिने सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंड, कलम 452 नुसार सहा महिने कैद आणि पाचशे रुपये दंड तसेच अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या सर्व शिक्षा शितलसिंहला एकत्र भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.सय्यद मैनोद्दीन यांनी मांडली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी