आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे
केंद्रीय निवडणूक निरीक्षक नवीन राज सिंह यांचे आवाहन


नांदेड (मिडिया सेंटर)नांदेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवार व त्‍यांच्‍या प्रचारकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करुन निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे. निवडणूक काळात असलेल्‍या वेगवेगळ्या चिंतांची यादी करुन माझ्याकडे द्यावी. त्‍यावर योग्‍य तो निर्णय घेतला जाईल. मतदानासाठी मतदान यंत्र तयार करण्‍याची सूचना सर्व उमेदवारांना लेखी कळविण्‍यात येईल. मतदान यंत्र तयार करताना उमेदवार किंवा त्‍यांचे प्रतिनिधी यांनी स्‍वतः व्‍यक्‍तीशः हजर राहावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक नवीन राज सिंह यांनी निवडणूक लढवणा-या उमेदवारांच्‍या आयोजित बैठकीत केले.

जिल्‍हा निवडणू‍क निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी धीरजकुमार यांनी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्‍या उपस्थितीत निवडणूक लढवणा-या उमेदवार व त्‍यांच्‍या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक परमजीतसिंह दहिया, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, आचारसंहिता कक्ष प्रमुख राजेंद्र खंदारे, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी संतोष पाटील, प्रचार खर्च विभागाचे लेखाधिकारी पाचंगे यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना श्री. सिंह म्‍हणाले, निवडणूक लढवणा-या उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेदरम्‍यान जी चिंता आहे, त्‍याची लेखी स्‍वरुपात यादी (वरी लिस्‍ट) तयार करुन जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच माझ्याकडे द्यावी. उमेदवारांच्‍या सर्व शंकेचे समाधान करता येईल. सर्व उमेदवारांनी निवडणूक शांतता, निर्भय व मुक्‍त वातावरणात होण्‍यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्‍यांनी केले.

जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी धीरजकुमार यांनी उमेदवारास मार्गदर्शक सूचना केल्‍या. उमेदवारांनी आचारसंहिता भंगाबाबत तक्रार असेल तर 02462-247247 या क्रमांकावर संपर्क करावा. प्रचारासाठी आवश्‍यक असलेल्‍या सर्व परवानग्‍या वेळेत दिल्‍या जातील. त्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात मनपा क्षेत्रासाठी तसेच संबंधित पोलिस ठाण्‍यात एक खिडकी कक्ष सुरु करण्‍यात आला आहे. मतदान प्रक्रिया संपण्‍याच्‍या 48 तास अगोदर अर्थात दि. 15 एप्रिल 2014 रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार बंद करावा लागणार आहे, असे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी उमेदवारांनी उपस्थित केलेल्‍या विविध शंकेचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक तसेच जिल्‍हा निवडणूक अधिका-यांनी निरसन केले

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी