लाचखोर तलाठ्यामुळे....

लाचखोर तलाठ्यामुळे वारंगटाकळी येथील शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित..

हिमायतनगर(वार्ताहर)गतवर्षीच्या खरीप हंगामातील जुलै - ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या भरपाईची शासनाची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून धानोरा ज.सज्याच्या तलाठ्याने शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपयाची लाच घेवूनही जाणीवपूर्वक मदतीपासून वंचित ठेवल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. तलाठ्याच्या कारभारामुळे नुकसानीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या वारंगटाकळी येथील शेतकर्यांनी सदर तलाठ्यावर कार्यवाही करून नुकसानीचे अनुदान मिळवून देण्याची मागणी केली आहे.

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात मुसळधार पाउस झाल्याने पैनगंगा नदीला तीन वेळा पूर आला होता. या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये शिरल्याने शेतजमिनीसह पिके पूर्णतः खरडून गेलि होती. याबाबतचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हने सातत्याने प्रकाशित करून प्रशासनाला जागे केले. त्याची दाखल घेत राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेशधस, सूर्यकांता पाटील, हदगाव - हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील यांनी डझनभर अधिकाऱ्यांसह संबंधित बुडीत क्षेत्राची पाहणी करून हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळवून देण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला दुजोरा दिला होता. त्याप्रमाणे संबंधित सज्जाचे तलाठी यांना शेतकऱ्यांचा नुकसान क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आल्या होत्या. परंतु काही तलाठी महाशयांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत मोठ्या प्रमाणात आर्थिक जमवा - जमाव करत पंचनामे केले. त्यात नदीकाठावर असलेल्या धानोरा ज. सज्जाचे तलाठी महाशयाने प्रत्यक्षात नुकसान झालेल्या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र दाखवून वारंगटाकळी येथील खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले. सर्वेच्या सुरुवातील त्यांनी गावात येवून तुम्हाला जर नुकसानीची मदत मिळवायची असेल तर प्रत्येकी ५०० रुपये द्यावे लागेल अन्यथा तुमचे नाव यादीत येणार नाही असे फर्मान सोडले होते. अगोदरच नुकसानीने मेटाकुटीस आलेल्या बळीराजाने शेतकर्यांनी प्रत्येकी ५०० रुपये जमा करून जवळपास २०ते २१ हजारची रक्कम दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण घेवाण करूनही सदर महाशयाने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या खऱ्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित ठेऊन मद्याच्या टाळूवरील लोणी खाण्या जोग प्रकार केला आहे. हा प्रकार नुकत्याच येथील ग्राम पंचायतीत लावण्यात आलेल्या यादीवरून उघड झाला आहे.

या प्रकारातून तलाठी महाशयाने शेतकर्यांना आमिष दाखवून शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवल्याच्या आरोप पैनगंगेच्या काठावरील शेतकर्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार हिमायतनगर, जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्याकडे केला आहे. यावर सोनबा मोहीते, राजू यादवे, बिरबल वायकोळे, तानाजी देवकते, अवधूत हाके, अर्जुन आडे, सागरबाई आंबेपवाड, रामराव कांबळे, भास्कर मस्के, मारोती पुपलवार, सुरेश तोकलवाड, माधव पवार, नामदेव प्रधान यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी