महिला मतदारांचे

मतदार यादीमध्ये महिला मतदारांचे नोंदणीचे प्रमाण वाढविण्याची गरज - धीरजकुमार

नांदेड(अनिल मादसवार)लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एकूण लोकसंख्येमधील मतदार म्हणून नोंदणी केलेल्या महिलांचे प्रमाण कमी असून ते वाढविण्यासाठी जिल्ह्यातील मतदार महिलांनी आपली मतदार यादीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती विषयक स्वीप-2 हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून त्यासंबंधीच्या समितीची बैठक जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांची प्रमुख उपस्थित होती.

मतदार जागृती विषयक राबविलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, एकूण लोकसंख्येमधील महिलांचे प्रमाण एकूण मतदारांमधील महिलांचे प्रमाण सारखे असावे अशी भारत निवडणूक आयोगाची सूचना आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात जनगणनेप्रमाणे दर हजारी महिलांचे प्रमाण 943 आहे. मात्र मतदार यादी मध्ये हे प्रमाण 911 आहे. यामधील मोठी तफावत दूर करण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असून सर्व पातळीवर महिलांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करुन प्रोत्साहित केले पाहिजे. शहरी भागात महानगरपालिका व नगरपालिका आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद, महिला व बालकल्याण विभाग व शिक्षण विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे. महिलांच्या बचत गट, अंगणवाडी, आरोग्य कर्मचारी या सारख्या ग्रामीण स्तरावरील घटकामार्फत मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेण्यात यावा. यामध्ये स्वयंसेवी संस्था, उद्योग घटक आणि सहकारी संस्थांची ही मदत घेण्यात यावी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी मतदार जागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करावे, असे सांगून त्यांनी टपाली मतदानाचे व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला.

विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांकडून संकल्पपत्रे भरुन घेण्याची कार्यवाही सर्व शाळांमध्ये पूर्ण करावी असे सांगून जिल्हाधिकारी यांनी मतदार नोंदणी व जागृतीचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. या बैठकीस माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी, जिल्हा सहकार निबंधक विनायक कहाळेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. शिंगणे, एमआयडीसीचे विभगीय व्यवस्थापक संतोष पाटील, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, आदि समिती सदस्य उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी