बालकुमारांसाठी कवीसंमेलन

'उजाड उघड्या रानावरची आम्‍ही रानफुले' ग्रंथोत्‍सवात रंगले बालकुमारांसाठी कवीसंमेलन 

नांदेड(अनिल मादसवार)'आभाळाचे छत डोईवर, जे दैवाने दिले, उजाड उघड्या रानावरची आम्‍ही रानफुले, या आणि अशा कितीतरी बालकवितांनी कवीसंमेलन रंगत गेले आणि मुलांचा उत्‍साह कवितेगणिक वाढत गेला. निमित्‍त होते नांदेड ग्रंथोत्‍सवानिमित्‍त आयोजित बालकुमारांसाठी कवीसंमेलनाचे. कवीसंमेलनाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रसिद्ध कवी डॉ. सुरेश सावंत यांची उपस्थिती होती, तर कवीपिठावर जेष्‍ठ बालकवी सुधाकर गाजरे, शं. ल. नाईक, शंकर वाडेवाले, माधव चुकेवाड, प्रा. रवीचंद्र हडसनकर, अरुणा गर्जे, ललिता शिंदे, अशोक कुरुडे, वीरभद्र मिरेवाड, शेषराव जाधव यांची उपस्थिती होती.

महाराष्‍ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य व संस्‍कृती मंडळ, जिल्‍हा परिषद नांदेड व जिल्‍हा माहिती कार्यालय नांदेड यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित 'नांदेड ग्रंथोत्‍सव-2014' निमित्‍त बालकुमारांसाठी कवीसंमेलनाचे आयोजन जिल्‍हा परिषदेच्‍या कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृहात करण्‍यात आले होते.

सुरुवातीला बालकांना चंद्राची सफर करवून आणताना बालकवी शेषराव जाधव यांनी कविता सादर केली. 'चला मुलांनो बांधुया चंद्रावरती घर, जागा नाही घरे बांधयला गर्दीचे शहर ', जेष्‍ठ कवी शं. ल. नाईक यांनी 'प्राण्‍यांची शाळा सुरु झाली, लगबग सारी गोळा झाली ' ही कविता सादर करुन बच्‍चेकंपनीला खूश केले. कवी माधव चुकेवाड यांनी बालरसिकांना गुदगुल्‍या करणारी 'फार फार वर्षांपूर्वी कुत्रा होता फारच खोडी, तेंव्‍हापासून झाली शेपूट त्‍याची वाकडी ' ही कविता सादर केली. कवयित्री ललिता शिंदे यांनी 'झिमपोरी झिम, झिम..झिम..झिम ' आणि 'चला मुलांनो चला मुलींनो शाळेत जाऊ' या नवयुगाचे ज्ञान जगाचे मंत्र दाऊया ' ही कविता गाऊन मुलांना ठेका धरायला लावला. कवियित्री अरुणा गर्जे यांनी 'शारदाई माझी शारदाई, शब्‍दसुरांची तू आई, कुणी म्‍हणती वेदवजी कुणी सरस्‍वती ' ही कविता सादर केली. शंकर वाडेवाले यांनी 'वा-या रे वा-या ' ही कविता मुलांना गायला लावत सादर केली. 'वा-या रे वा-या मार जरा फे-या, बागेत जरासा येशील का, सुगंध घेऊन जाशील का '. यावेळी अशोक कुरुडे यांनी 'आई अमर जगती ' ही रचना सादर केली. जेष्‍ठ कवी सुधाकर गाजरे यांनी पावसाची कविता सादर केली. 'येरे येरे पावसा, तुला देणार नाही पैसा '. प्रा. रवीचंद्र हडसनकर यांनी खेड्यातल्‍या मुलांच्‍या वेदना दर्शवणारी रचना सादर केली. 'बगळ्या बगळ्या पाटी दे, गरीब दुबळ्यांसाठी दे, गगनाच्‍या त्‍या भेटी दे, पुस्‍तकांची पेटी दे ' या कवितेला बालरसिकांनी भरभरुन दाद दिली. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालक आणि नव्‍या दमाचे बालकवी वीरभद्र मिरेवाड यांनी सुरेख सूत्रसंचालन करतानाच 'आई म्हणाली ताईला घासून फरशी पूस, संस्‍कृती बिघडली म्‍हणून निघून गेली घूस ' ही रचना सादर करुन सभागृहात खसखस पिकवत ठेवली. मिरेवाड यांच्‍या 'सरांच्‍या छडीचा केला त्‍यानं साप.. सर पळत म्‍हणाले बाप रे बाप ' ह्या 'जादुगार ' रचनेला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

संमेलनाचे अध्‍यक्ष अणि प्रसिद्ध बालकवी डॉ. सुरेश सावंत यांनी उपदेशपर आणि रंजन करणा-या कविता सादर केल्‍या. त्‍यांनी सादर केलेली 'सूर्यपत्र व्‍हा ' या कवितेला रसिकांनी उत्‍स्‍फुर्त दाद दिलीच. त्‍यांनी सादर केलेल्‍या 'आभाळाचे छत डोईवर, जे दैवाने दिले, उजाड उघड्या रानावरची आम्‍ही रानफुले ' या रचनेला बालरसिकांनी मोठी दाद दिली. कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन वीरभद्र मिरेवाड यांनी केले.

प्रारंभी दीपप्रज्‍वलनानंतर जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, विजय होकर्णे, पद्माकर कुलकर्णी, व्‍यंकट कल्‍याणपाड, अलका पाटील, आशा बंडगर, के. आर. आरेवार आदींनी मान्‍यवर कवींचे स्‍वागत केले. याच कार्यक्रमात कवयित्री अरुणा गर्जे यांच्‍या 'छोट्या दोस्‍तांसाठी काय पणं ' या काव्‍यसंग्रहाचे प्रकाशनही संपन्‍न झाले. उपस्थितांचे आभार दिपक महालिंगे यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी